कोल्हापूर, ४ फेब्रुवारी (वार्ता.) – विशाळगड ही मराठ्यांची अस्मिता आहे. या गडावर अवैध बांधकाम पाडून टाकण्याची मागणी शिवप्रेमी, गडसंवर्धन संघटना सातत्याने करत आहेत. महाशिवरात्रीपर्यंत विशाळगड अतिक्रमणमुक्त न झाल्यास शिवभक्त हा गड अतिक्रमणातून मुक्त करतील आणि याचे सर्व दायित्व प्रशासनावर राहील, अशी चेतावणी ‘विशाळगड संवर्धन समिती’च्या वतीने ३ फेब्रुवारीला झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. याप्रसंगी विशाळगड रक्षण आणि अतिक्रमण विरोधी कृती समितीचे श्री. बाबासाहेब भोपळे आणि श्री. शिवानंद स्वामी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. मधुकर नाझरे, ‘शिवदुर्ग आंदोलना’चे श्री. हर्षल सुर्वे, श्री. सुखदेव गिरी, शिवसेना (शिंदे गट) उपजिल्हाप्रमुख श्री. किशोर घाटगे, सर्वश्री इंद्रजित सावंत, प्रमोद सावंत, राम यादव, अमित अडसूळ, दिलीप देसाई यांसह अन्य उपस्थित होते.
१. ज्यांना या विशाळगडावरील अतिक्रमणाच्या विरोधातील कारवाईमध्ये करसेवक म्हणून सहभागी व्हायचे आहे, त्यांनी कोल्हापुरातील मिरजकर तिकटी येथे त्यांची नाव नोंदणी करून सामाजिक माध्यमांद्वारे देण्यात आलेल्या ‘लिंक’च्या माध्यमातून सहभागी व्हावे.
२. विशाळगडावर येणार्यांची बहुतांश संख्या ही कर्नाटकातील लोकांची आहे. कर्नाटकच्या ७ बस या विशाळगडच्या पायथ्याशी मुक्कामी असतात. यातूनच कर्नाटकातून मद्य-कोंबड्या यांची अवैध वाहतूक केली जाते. या संदर्भात एस्.टी. प्रशासनाने कारवाई न केल्यास आम्ही आमच्या पद्धती करू.
३. विशाळगडाच्या मुंडाद्वारा शेजारील रणमंडळ या टेकडीवर शिवछत्रपतींचे एक भव्य स्मारक उभे करावे, अशी आमची मागणी आहे. या स्मारकाला संबंधित सर्व यंत्रणांनी कुठलीही आडकाठी न आणता त्वरित संमती द्यावी आणि सर्व महाराष्ट्रातील सगळ्या शिवप्रेमींच्या भावनेला साथ द्यावी.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात