जळगाव येथे पत्रकार परिषद
जळगाव: हिंदूंना आध्यात्मिक बळ देणारी ‘भारतीय मंदिर संस्कृती’ आज धर्मविहीन ‘सेक्युलर’ शासनतंत्रामुळे धोक्यात आली आहे. आपल्याला मिळालेला हा दैवी वारसा जपणे, त्याचे संवर्धन आणि संरक्षण करणे, हे प्रत्येक हिंदूचे धर्मकर्तव्य आहे. याच उद्देशाने २ दिवसीय ‘महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदे’ला आलेल्या ३०० हून अधिक मंदिर विश्वस्त, पुरोहित, पुजारी, लेखापरीक्षक आणि अधिवक्ते यांनी एकत्र येत मंदिरांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी कटीबद्ध असल्याचे सांगितले. या परिषदेत मंदिर चळवळ उभारण्यासाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ची स्थापना उपस्थित विश्वस्तांच्या एकमताने करण्यात आली, अशी घोषणा हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी येथील पद्मालय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत केली. या वेळी ‘महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिल’चे माजी अध्यक्ष अधिवक्ता भरत देशमुख, सातपुडा निवासिनी श्री मनुदेवी सेवा प्रतिष्ठानचे सचिव श्री. नीळकंठ चौधरी, जळगावचे ग्रामदैवत श्रीराम मंदिराचे श्रीराम जोशी महाराज, हिंदु जनजागृती समितीचे जळगाव समन्वयक श्री. प्रशांत जुवेकर उपस्थित होते.
धर्मरक्षण आणि धर्मशिक्षण यांविषयीचे कार्य करण्यात येईल !
महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेत महाराष्ट्र मंदिर महासंघाची स्थापना झाल्याच्या क्षणी सर्व मान्यवर व्यासपीठावर हात उच्चावतांना दिसत आहेत.
‘मंदिरांची सुरक्षा, समन्वय, संघटन, संपर्क यंत्रणा आणि मंदिरे सनातन धर्मप्रचाराची केंद्र होणे, यांसाठी कार्य करण्याचा संकल्प केला. महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या माध्यमातून मंदिरांवरील सर्व प्रकारचे आघात, अडचणी आणि समस्या सोडवण्यासाठी संघटितपणे प्रयत्न केले जातील. मंदिरांचे सरकारीकरण होऊ न देणे, मंदिरांच्या प्रथा-परंपरा, धार्मिक कृत्ये शास्त्रीय पद्धतीने होण्यासाठी आग्रह धरणे, मंदिरांमध्ये कोणत्याही प्रकारे शासकीय-प्रशासकीय हस्तक्षेप होऊ न देणे, अशी भूमिका ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या स्थापनेच्या वेळी निश्चित करण्यात आली. मंदिरांमध्ये धर्मशिक्षणवर्ग चालू करणे, मंदिरांमध्ये धर्मशास्त्रानुसार वस्त्रसंहिता लागू करणे, समाजाचे संघटन होण्यासाठी मंदिरांत सामूहिक गुढीपाडवा, सामूहिक शस्त्रपूजन, हनुमानचालिसा पठण, महाआरती आदी उपक्रम चालू करणे, मंदिरांवरील आघातांच्या विरोधात व्यापक आंदोलन उभारणे आदी कार्य महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने करण्यात येईल’, अशी माहिती श्री. सुनील घनवट यांनी दिली.
मंदिर परिषदेच्या समारोपीय सत्रात ‘ॐ कारा’च्या उच्चारात एकमताने ठराव संमत करण्यात आले. या ठरावांचे निवेदन ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे तथा उपमुख्यमंत्री आणि विधी अन् न्यायमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना भेटून देण्यात येईल. या ठरावांसह ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या माध्यमातून प्रत्यक्ष कार्य करण्यासाठी पुढील कृती योजनाही ठरवण्यात आली असल्याची माहिती श्री. सुनील घनवट यांनी दिली.