दौंड (पुणे): आज पाश्चात्त्य कुसंस्कृतीचे अनुकरण वाढल्याने हिंदु हा धर्म आणि संस्कृती यांपासून दूर होत चालला आहे. परिणामी देशात अनैतिकता, गुन्हेगारी आणि अत्याचार यांचे प्रमाणही वाढत चालले आहे, हे रोखण्यासाठी हिंदूंंना धर्मशिक्षणाची नितांत आवश्यकता आहे. त्यासाठी हिंदु धर्मप्रसार आणि संस्कृती रक्षणासाठी आज प्रत्येक हिंदूने कृतीशील होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समिती प्रणित रणरागिणी शाखेच्या कु. क्रांती पेटकर यांनी केले. केडगाव येथे ‘स्वातंत्र्यवीर सावरकर युवा मंच’ आणि ‘समर्थ रामदासस्वामी क्रीडा प्रबोधिनी’ यांच्या वतीने आयोजित बुद्धीबळ स्पर्धेनिमित्त ‘हिंदु संस्कृतीचे महत्त्व आणि रक्षण’ या विषयावर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या वेळी कु. क्रांती पेटकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. १५० हून अधिक जणांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेतला.
भारतीय क्रीडा प्रकारांना चालना मिळावी, खेळाडू भविष्यात भारत देशाचे प्रतिनिधित्व करत असतात. बुद्धीबळ हाही भारतीय खेळ असून या माध्यमातून खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे, यासाठी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर युवा मंच’च्या वतीने १६ वर्षांपासून या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात येते. मागील २ वर्षे कोरोनाच्या महामारीमुळे स्पर्धा होऊ शकली नव्हती.
या वेळी केडगावचे सरपंच श्री. अजित शेलार पाटील, समर्थ रामदासस्वामी क्रीडा प्रबोधिनीचे अध्यक्ष श्री. संदीप टिंगले, दौंड तालुका क्रीडा संघटनेचे सचिव श्री. भिसे सर, स्व. सुभाषअण्णा बाबुराव कुल महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री. अशोक दिवेकर, श्री. विठ्ठल कोरपड आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वातंत्र्यवीर सावरकर युवा मंचचे अध्यक्ष डॉ. नीलेश लोणकर यांनी केले, तर सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रा. समीर गायकवाड यांनी केले.
वैशिष्ट्यपूर्ण
१. स्वातंत्र्यवीर सावरकर युवा मंचचे अध्यक्ष डॉ. नीलेश लोणकर यांनी पुढाकार घेऊन व्याख्यानाचे सर्व आयोजन केले होते. व्याख्यान झाल्यानंतर उपस्थित नागरिकांनी भेटून ‘विषय पुष्कळ चांगला झाला’, आणि असे विषय समाजापर्यंत पोचणे आवश्यक आहे, असे मत व्यक्त केले.
२. केडगाव येथील प्राध्यापक श्री. अशोक दिवेकर यांनी ते कार्यरत असलेल्या ‘स्व. सुभाषअण्णा बाबुराव कुल महाविद्यालयातही असे व्याख्यान घेऊया’, असे सांगितले.