दोंडाईचा (धुळे) येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेत हिंदु एकजुटीचा अविष्कार !
धुळे – शिवप्रतापदिनाच्या दिवशी प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफझलखानाच्या थडग्याच्या सभोवतालचे अतिक्रमण महाराष्ट्र शासनाने पाडले. याविषयी त्यांचे अभिनंदन ! आता विशाळगडासह राज्यातील सर्वच गडदुर्ग इस्लामी अतिक्रमणातून मुक्त करावेत. महाराष्ट्रात धर्मांतरबंदी आणि लव्ह जिहादविरोधी कायदे तात्काळ लागू करावेत. हिंदु धर्माला भेडसावणार्या समस्यांवर एकमेव उपाय आहे, तो म्हणजे हिंदु राष्ट्र ! त्यामुळे आपण सर्वांनी संघटितपणे यापुढे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कृतीप्रवण होऊया, असे प्रतिपादन श्री. सुनील घनवट यांनी केले. ते हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ८ फेब्रुवारी या दिवशी दोंडाईचा येथे दादासाहेब रावल मैदानावर आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत बोलत होते. या सभेला २ सहस्र ५०० हून अधिक धर्मप्रेमी उपस्थित होते.
या वेळी सनातनचे धर्मप्रचारक सद़्गुरु नंदकुमार जाधव, रणरागिणी शाखेच्या कु. रागेश्री देशपांडे यांनीही उपस्थित हिंदूंंना संबोधित केले. सभेसाठी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि राजकीय पक्ष यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांसह शहर, तसेच आजूबाजूच्या गावांतील धर्माभिमानी हिंदू सहस्रोंच्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी श्री. अमोल वानखडे यांनी केलेल्या शंखनादानंतर मान्यवर वक्त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण केला. वेदमूर्ती भागवताचार्य वेदशास्त्रसंपन्न श्री. हर्षल कुलकर्णी, वेदमूर्ती श्री. प्रवीण कुलकर्णी, वेदमूर्ती श्री. भूपेंद्र कुलकर्णी यांनी वेदमंत्रपठण केले. समितीच्या कार्याचा आढावा समितीचे श्री. राहुल मराठे यांनी मांडला. सूत्रसंचालन कु. श्रुती शिरसाठ यांनी केले. व्यासपिठावर भाजपचे आमदार जयकुमार रावल यांचा समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
क्षणचित्रे
१. सभेचे आयोजन, प्रसार या सेवा स्थानिक धर्मप्रेमींनी पुढाकार घेऊन केल्या.
२. वक्त्यांच्या हस्ते शिवस्मारक येथे छत्रपती शिवरायांच्या मूर्तीला माल्यार्पण करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात स्थानिक धर्मप्रेमींनी त्यांचे स्वागत केले.
त्रास सहन करावा लागला, तरी चालेल मात्र धर्माला प्राधान्य ! – जयकुमार रावल, आमदार, भाजप
१. पृथ्वीराज चौहान यांनी महंमद घोरीला ३ वेळा माफी दिली. छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, ‘अशा गद्दारांना कडेलोटाची शिक्षा द्या.’ पक्ष, संघटना वेगवेगळ्या असू शकतात; परंतु ज्यावेळेस देश आणि धर्म यांचा विषय येतो, त्या वेळी वाट्टेल तो त्याग करून देश आणि धर्म यांसाठी आपण संघटित होऊन लढा दिला पाहिजे.
२. शिक्षित झालेले सुसंस्कृत असतातच, असे नाही; म्हणून आपण सुसंस्कृत झालो पाहिजे. भारताला १५० वर्षे गुलाम बनवणार्या ब्रिटनचे पंतप्रधान आज भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे आहेत, ही आज अभिमानाची गोष्ट आहे.
३. दोंडाईचा शहरात भव्य पशूवधगृह चालू झाले होते. त्याला विरोध करतांना अनेक अडचणी आल्या, मला रात्री झोप लागत नव्हती. राजकारणात कितीही त्रास झाला, तरी धर्माला प्राधान्य द्यायला हवे, हे लक्षात घेऊन ते पशूवधगृह कायमचे बंद केले.