Menu Close

येत्‍या अधिवेशनात ‘लव्‍ह जिहाद’विरोधी आणि ‘धर्मांतरबंदी’ कायदे पारित करावेत !

  • हिंदु जनजागृती समितीकडून रत्नागिरी जिल्‍ह्यातील आमदारांकडे निवेदनाद्वारे मागणी

  • अभ्‍यास करून अधिवेशनात सूत्र मांडण्‍याचे आमदारांकडून आश्‍वासन !

खेड येथील आमदार योगेश कदम यांच्‍याशी चर्चा करतांना हिंदु जनजागृती समितीचे शिष्‍टमंडळ

चिपळूण – ‘राष्‍ट्रीय गुन्‍हे नोंदणी विभागा’च्‍या अहवालानुसार देशात स्‍त्रिया आणि मुले हरवण्‍याच्‍या घटनांत महाराष्‍ट्र राज्‍य प्रथम क्रमांकावर आहे. महाराष्‍ट्रातून हरवलेल्‍या स्‍त्रियांचे काय झाले ? त्‍यांतील काही स्‍त्रियांचा श्रद्धा वालकरप्रमाणे बळी गेला का ? ‘लव्‍ह जिहाद’चा भस्‍मासुर रोखण्‍यासाठी ९ राज्‍यांत कायदा लागू करण्‍यात आला आहे. महाराष्‍ट्रातही हा कायदा लागू करण्‍यात यावा. राज्‍यात धर्मांतराच्‍या घटनाही मोठ्या प्रमाणात घडत आहेत. निवृत्त न्‍यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्‍या समितीने केलेल्‍या शिफारसींनुसार महाराष्‍ट्र शासनाने तात्‍काळ कार्यवाही करून ‘धर्मांतरबंदी कायदा’ लागू करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने निवेदनाद्वारे करण्‍यात आली. हे निवेदन खेड-दापोली विधानसभा क्षेत्राचे बाळासाहेबांची शिवसेनेचे आमदार श्री. योगेश कदम आणि चिपळूण-संगमेश्‍वर विधानसभा मतदारसंघाचे राष्‍ट्रवादी काँग्रेसचे आमदार श्री. शेखर निकम यांना देण्‍यात आले. या वेळी या समस्‍यांविषयी उपलब्‍ध माहितीची कागदपत्रेही सादर करून चर्चा करण्‍यात आली.

सावर्डे (चिपळूण) येथील आमदार शेखर निकम यांना निवेदन देतांना समितीचे शिष्‍टमंडळ

या चर्चेनंतर आमदार योगेश कदम आणि आमदार शेखर निकम यांनी याविषयी सकारात्‍मक प्रतिसाद देत उपलब्‍ध माहितीचा अभ्‍यास करून अधिवेशनात या विषयावर सूत्रे मांडण्‍याचे आश्‍वासन दिले.

हे निवेदन देतांना खेड येथे धर्मजागरण तालुका संयोजक श्री. महेश सातपुते, पंचायत समितीचे माजी उपसभापती रामचंद्र आईनकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. विलास भुवड, श्री. संदीप तोडकरी, श्री. अनंत तांबिटकर, तसेच सावर्डे येथे श्री संतकृपा सेवा संस्‍थेचे ह.भ.प. भागवताचार्य शास्‍त्री किरण महाराज चव्‍हाण, समितीचे श्री. सुनील गांधी, श्री. सुरेश लाड, धर्मप्रेमी संतोष जंगम आणि डॉ. हेमंत चाळके उपस्‍थित होते.

थोर राष्‍ट्रपुरुष लोकमान्‍य टिळकांचे रत्नागिरीतील जन्‍मस्‍थान दुरवस्‍थेविषयी तातडीने पाठपुरावा करू !

आमदार योगेश कदम आणि आमदार शेखर निकम यांचे हिंदु जनजागृती समितीला आश्‍वासन

रत्नागिरी येथील लोकमान्‍य टिळकांचे जन्‍मस्‍थान अद्यापही उपेक्षित आहे. सदर जन्‍मस्‍थान हे महाराष्‍ट्र शासनाच्‍या रत्नागिरीच्‍या पुरातत्‍व विभागाच्‍या अंतर्गत येते. रत्नागिरीत उर्दू भवन उभारण्‍याची घोषणा केली जाते; मात्र वर्षानुवर्षे याच शहरात असलेल्‍या लोकमान्‍य टिळकांच्‍या जन्‍मभूमीच्‍या झालेल्‍या दुरवस्‍थेविषयी सरकार दरबारी अनास्‍थाच आढळून येते. याविषयी हिंदु जनजागृती समितीने माहिती अधिकार कायदा अंतर्गत प्राप्‍त माहिती आणि त्‍याविषयी राज्‍यभर केलेली आंदोलने अन् दिलेली निवेदने यांविषयीची कागदपत्रे आमदार योगेश कदम आणि आमदार शेखर निकम यांना दिली. याविषयी ‘जिल्‍हाधिकारी आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍याशी चर्चा करू’, असे त्‍यांनी सांगितले.

या वेळी खासगी वाहतूकदार यांच्‍याकडून अधिक रकमेचे तिकीट दर आकारले जात असून नागरिकांना भुर्दंड सोसावा लागत आहे. याविषयी शासनाने लक्ष घालून ही समस्‍या सोडवावी, अशी विनंतीही समितीच्‍या वतीने आमदार योगेश कदम यांना करण्‍यात आली.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *