-
उज्जैन येथे भारत रक्षा मंचच्या वतीने बांगलादेशी घुसखोरीच्या विरोधात संमेलन !
-
देशपातळीवर घुसखोरीविरोधी कठोर कायदा करण्याची आग्रही मागणी !
उज्जैन : मुसलमानधर्मीय कुराणला (त्यांच्या धर्माला) समोर ठेवून, तर ख्रिस्ती लोक बायबलला (त्यांच्या धर्माला) समोर ठेवून आंदोलन करतात. त्यामुळे त्यांना यश येते. त्या तुलनेने हिंदुत्वनिष्ठ संघटना चळवळ आणि आंदोलन करतांना हिंदु धर्माला केंद्रबिंदू ठेवून लढा देत नाहीत. त्यामुळे त्यांना अपेक्षित यश मिळत नाही. हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी आपल्या धर्मावर निष्ठा ठेवून आणि धर्म हा केंद्रबिंदू धरून कार्य केल्यास त्यांना निश्चित यश मिळेल, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी येथे केले. भारत रक्षा मंच या हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या वतीने बांगलादेशी घुसखोरीच्या विरोधात उज्जैन येथील केळकर परिसरात नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. बांगलादेशी मुसलमानांची घुसखोरी रोखण्यासाठी जन दबाव (जनतेचा दबाव), राजकीय दबाव, कायदेशीर दबाव आणि प्रसिद्धीमाध्यमांद्वारे दबाव आणण्यासाठी भरवण्यात आलेल्या या संमेलनात पू. डॉ. चारूदत्त पिंगळे हे जन दबाव सत्राचे अध्यक्ष म्हणून बोलत होते.
या वेळी भारत रक्षा मंचचे राष्ट्रीय संयोजक श्री. सूर्यकांत केळकर, श्री. मुरली मनोहर शर्मा, वन्देे मातरम् संघटनेचे श्री. हर्षद मेहता, सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता राजेश सांगले, ग्वालेर उच्च न्यायालयाचे अधिवक्ता भगवान पांडे, इंदूर उच्च न्यायालयाचे अधिवक्ता पेंडसे, श्री. राजकुमार शर्मा आणि अन्य संघटनांचे प्र्रमुख उपस्थित होते.
पू. डॉ. पिंगळे पुढे म्हणाले, एकीकडे मुसलमान इस्लामी राष्ट्रासाठी, तर ख्रिस्ती ख्रिस्ती राष्ट्रासाठी प्रयत्नरत असतांना बहुतांश हिंदुत्वनिष्ठ संघटना केवळ राष्ट्ररक्षणासाठी कार्य करतात; पण त्यांनी हिंदु राष्ट्र स्थापनेचे ध्येय ठेवून कार्य केल्यास त्यांना भरघोस यश मिळू शकते. स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रज हा शत्रू डोळ्यांपुढे असतांना धर्मनिरपेक्षवाले आणि धर्म मानणारे हिंदु स्वातंत्र्यलढ्यात एकत्रितपणे कार्य करत होते; मात्र स्वातंत्र्यानंतर काँग्रेस सत्तेत आल्यानंतर हिंदु धर्मनिरपेक्ष आणि धर्मपरायण असे विभाजित होऊन कार्य करत होते. आता हिंदुत्वनिष्ठ विचारांचे शासन सत्तेत आले आहे. आता खर्या अर्थाने हिंदूंची परीक्षा आहे. हिंदुत्वनिष्ठ म्हणवून घेणारे शासन जर धर्मरक्षणासाठी आणि राष्ट्र रक्षणासाठी काही ठोस पावले उचलत नसेल, तर शासनाला त्यांची चूक दाखवून देण्याचे धैर्य हिंदुत्ववादी संघटनांनी दाखवले पाहिजे. जशी महाभारत काळात कौरवांच्या सभेत विदुराने वस्त्रहरणासारख्या अधर्माला विरोध करण्याची भूमिका स्वकियांसमोर भर राज्यसभेत घेतली होती, तशी भूमिका हिंदुत्वनिष्ठांनी हिंदुत्ववादी म्हणावणार्या शासनाच्या चुकीच्या निर्णयांविषयी घेतली पाहिजे.
देशपातळीवर घुसखोरीविरोधी कठोर कायदा करावा ! – श्री. सूर्यकांत केळकर, भारत रक्षा मंच
भारतात एका षड्यंत्राद्वारे लपून-छपून घुसलेल्या बांगलादेशी मुसलमान घुसखोरांना हाकूलन देण्यासाठी एक व्यापक आणि कठोर घुसखोरीविरोधी कायदा केंद्रशासनाने सिद्ध करावा, अशी मागणी भारत रक्षा मंचचे राष्ट्रीय संयोजक श्री. सूर्यकांत केळकर यांनी केली. या वेळी श्री. मुरली मनोहर शर्मा यांनी वर्षभर करावयाच्या कृती आराखडा सर्वांसमोर मांडला.
दुसरा गाल पुढे करणारे गांधी हिंसेला उद्युक्त करणारे नव्हे का ? – पू. डॉ. चारुदत्त पिंगळे
पू. डॉ. चारुदत्त पिंगळे म्हणाले, मोहनदास गांधी किंवा गांधीवाद्यांना अहिंसा कळलीच नाही. उज्जैन शहरातील विनोबा भावे आणि गांधी यांच्या एका अनुयायाने सांगितले की, गांधी हे अहिंसेचे समर्थक होते; कारण एका गालावर कुणी चापट मारल्यावर त्यास प्रतिकार न करता ते दुसरा गाल पुढे करून मार खाण्यास सिद्ध होते. त्यावर त्यांना लक्षात आणून देत सांगावे लागले की, एका गालावर चापट खाल्यावर शांत राहून निघून गेले तर ठीक; परंतु दुसरा गाल पुढे केल्यावर गांधी अहिंसावादी कसे ठरणार ? कारण जेव्हा दुसरा गाल पुढे करता, तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीला हिंसा करण्यासाठी एकप्रकारे उद्युक्त करता. या अर्थाने गांधी तर हिंसेला उद्युक्त करणारे ठरतात. खरे तर अहिंसा हा शब्द मूळ शब्द नाही. हिंसा हा शब्द मूळ आहे आणि हिंसेचे निराकरण करण्यासाठी जे जे केले जाईल, ते खर्या अर्थाने अहिंसा ठरते. अन्यथा आतंकवादी आणि शत्रू यांचे निर्दालन करणारे पोलीस दल किंवा सैनिक समाज अन् देशाचे रक्षणकर्ते नव्हे, तर गांधीवाद्यांच्या दृष्टीने हिंसेचे समर्थक ठरतील.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात