पाकमध्ये महिलांना घरातून बाहेर निघण्याची अनुमती नाही, सणही घरातच साजरे केले जातात ! – सिंहस्थक्षेत्री आलेले पाकमधील हिंदू
उज्जैन : सिंहस्थक्षेत्री प्रथमच पाकिस्तानाहून १८३ हिंदू पर्वणीचा लाभ घेण्यासाठी आले आहेत. या वेळी त्यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, पाकिस्तानमध्ये महिलांना एकटीने घरातून बाहेर पडण्याची किंवा पाश्चात्त्य वस्त्र परिधान करायची अनुमती नसते. त्या केवळ पुरुषांसह घराबाहेर पडू शकतात. हिंदूंच्या मिरवणुकांना अनुमती नसते. अनुमती दिलीच, तर ती काही ठराविक मार्गांवरच असते. पाकमध्ये केवळ जुनी मंदिरे आहेत. नवीन मंदिर बांधण्याची अनुमती नाही.
केवळ महिलांचा समावेश असलेला परी आखाडा हा ढोंगी आखाडा ! – महंत गौरीशंकर दास महाराज, अखिल भारतीय श्री पंच निर्वाणी अनि आखाडा
उज्जैन : केवळ महिलांचा समावेश असलेला परी आखाडा ढोंगी आहे. आम्ही अशा कोणत्याही आखाड्याला ओळखत नाही, अशी प्रतिक्रिया अखिल भारतीय श्री पंच निर्वाणी अनी आखाड्याचे राष्ट्रीय महासचिव महंत गौरीशंकरदासजी महाराज यांनी दिली. सिंहस्थपर्वात झालेल्या पहिल्या अमृत (शाही) स्नानाच्या वेळी परी आखाड्याला स्नानाची संधी देण्यात आली नव्हती.
उज्जैन सिंहस्थक्षेत्री केवळ महिलांना पूजन करण्यास तात्पुरत्या गजासीन शनि मंदिराचे निर्माण !
सिंहस्थक्षेत्री असलेल्या मंगलनाथ क्षेत्रामध्ये खाक चौक रामजनार्दन मंदिराजवळ तात्पुरते गजासीन शनि मंदिर बनवण्यात आले आहे. या मंदिरात सिंहस्थपर्वाच्या कालावधीत केवळ महिलांना पूजन करण्याची अनुमती देण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या शनिशिंगणापूर मंदिरात महिलांना प्रवेश देणे आणि तेथे पूजा करू देणे, यांविषयी मागणी करण्यात आली. यानंतर देशभरात निर्माण झालेले वातावरण पहाता हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती अलका घगुरे यांनी दिली. या मंदिराच्या शुभारंभाच्या प्रसंगी बांसवाडा येथील संत उत्तम महाराज, जैन संत रवींद्रसूरी महाराज, महंत विजयदास आणि महंत यजत्रदास उपस्थित होते.
किन्नर आखाडा स्वत:चे १० महामंडलेश्वर निर्माण करणार !
किन्नर आखाड्याचे संस्थापक ऋषि अजयदास यांनी सांगितले की, किन्नर आखाडा त्यांचे १० महामंडलेश्वर घोषित करणार आहे. या कार्यक्रमासाठी देशभरातून ५ सहस्त्र किन्नर येणार आहेत. साधूसंतांनी धर्माला व्यवसायिक स्वरूप देऊन धर्माला काळीमा फासला आहे. त्यामुळे आता आम्हीच धर्माचा प्रसार करणार आहोत. या उद्देशाने आम्ही सिंहस्थपर्वामध्ये आलो आहोत. धर्माच्या प्रचारासाठी आमचे १० महामंडलेश्वर हवेत. त्यासाठी आम्ही आमचे महामंडलेश्वर स्वत:च निवडून त्यांची घोषणा करणार आहोत. या कार्यक्रमाला १३ आखाड्यांपैकी १० आखाड्याचे संत उपस्थित असणार आहेत.
किन्नर आखाड्याला मान्यता नाही ! – अ.भा. आखाडा परिषदचे अध्यक्ष, स्वामी नरेंद्रगिरीजी महाराज
सर्वांना ठाऊक आहे की, सिंहस्थपर्वामध्ये केवळ १३ आखाड्यांची परिषद कार्य करते. तसेच अन्य कुणालाही मान्यता नसते. धर्माच्या रक्षणास साधू-संत सदैव कार्यरत आहेत. किन्नर आखाड्याला आम्ही मान्यता दिलेली नाही.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात