…तर तो दिवस दूर नाही, जेव्हा पश्चिम बंगालमधील हिंदूंवर बांगलादेशमधील हिंदूंप्रमाणे अत्याचार होतील ! – श्री. तथागत रॉय, माजी राज्यपाल
बांगलादेशमध्ये हिंदूंवर सतत होणार्या अत्याचाराविषयी जगभरातून कोणीही बोलत नाही. ज्यांचे पूर्वज सध्याच्या बांगलादेशमधील हिंदू होते, अशा पश्चिम बंगालमधील बहुतांश हिंदूंवर डाव्या विचारसरणीचा प्रभाव असल्याने तेही बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचारांकडे दुर्लक्ष करत आहेत; मात्र तो दिवस दूर नाही, जेव्हा पश्चिम बंगालमधील हिंदूंवर बांगलादेशमधील हिंदूंप्रमाणे अत्याचार होतील ! सरकारने हिंदूंवरील आक्रमणे रोखण्यासाठी पुढे यायला हवे, तसेच बंगाल आणि भारतात अन्य ठिकाणी हिंदूंवर आक्रमणे होऊ नयेत, म्हणून हिंदूंमध्ये जागृती करायला हवी, असे प्रतिपादन त्रिपुरा आणि मेघालय या राज्यांचे माजी राज्यपाल श्री. तथागत रॉय यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘बांगलादेशमधील हिंदूंवर जिहादी आक्रमणे !’ या विषयावर आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवादात ते बोलत होते.
इतिहास आणि संस्कृती अभ्यासक तथा लेखक अधिवक्ता सतिश देशपांडे म्हणाले की, बांगलादेश वर्ष 1971 साली स्वतंत्र झाला; मात्र तेथील हिंदूंसाठी आपण काय केले ? तेथील हिंदू कुठल्या अवस्थेत जगत आहेत ? याविषयी भारतातील हिंदूंना काही देणेघेणे नाही. आता हल्लीच बांगलादेशमध्ये हिंदूंची 14 मंदिरे तोडण्यात आली. याविषयी भारताकडून काहीच प्रतिक्रिया दिली गेली नाही. हिंदू जागृत नसल्याने जगभरात अनेक ठिकाणी हिंदूंवर अत्याचार होत असतांनाही त्याविषयी काहीच आवाज उठवला जात नाही. हिंदूहितासाठी दुसरे कोणीतरी कार्य करेल, यावर अवलंबून न राहता हिंदूंना जागृत करण्यासाठी गावागावांत, शहरांत आंदोलने झाली पाहिजेत, तर कुठेतरी बांगलादेश किंवा अन्यत्र कुठेही हिंदूंवर अत्याचार झाल्यास त्याविषयी कारवाई करण्यासाठी सरकारवर दबाव निर्माण होईल.