-
‘वक्फ बोर्ड’चे पाशवी अधिकार काढून घेण्यासाठी आवाज उठवा ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती
-
युवकांची संघटनशक्ती आणि सळसळता उत्साह यांमुळे हिंदु राष्ट्र-जागृती सभेत जागवले धर्मतेज !
सोलापूर – हलालच्या आर्थिक जिहादप्रमाणे मुसलमानांच्या ‘वक्फ बोर्डा’कडून लँड जिहाद चालू आहे. वक्फ बोर्डाला वक्फ कायद्याच्या माध्यमातून हिंदूंची घरे, दुकाने, शेती, भूमी आणि धार्मिक स्थळे यांसह सरकारची संपत्ती बळकावण्याचे पाशवी अधिकार देण्यात आले आहेत. देशातील अनेक जिल्ह्यांत हिंदूंची भूमी ‘वक्फ बोर्ड’ने गिळंकृत केली आहे. वर्ष २००९ मध्ये वक्फ बोर्डाकडे ४ लाख एकर असलेली भूमी आज ८ लाख ६० सहस्रांहून अधिक एकर झाली आहे. एवढी भूमी वक्फ बोर्डाकडे कशी आली ? ‘भारतीय सेने’कडे सर्वाधिक १८ लाख एकर भूमी, तर ‘भारतीय रेल्वे’कडे १२ लाख एकर भूमी आहे. या दोघांच्या नंतर देशभरात तिसरी सर्वांत मोठी संपत्ती वक्फ बोर्डाकडे आहे. वक्फ कायदा रहित केला नाही, तर काही वर्षांत भारतातील सर्वाधिक भूमी वक्फ बोर्डाची झालेली असेल. त्यामुळे देश बळकावू पहाणार्या ‘वक्फ बोर्ड’चे पाशवी अधिकार काढून घेण्यासाठी संघटितपणे आवाज उठवा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि गुजरात राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी केले. ते १५ फेब्रुवारी या दिवशी भवानी पेठ येथील जयभवानी प्रशालेच्या मैदानात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती सभेत ते बोलत होते.
या सभेसाठी सहस्रोंच्या संख्येने हिंदूंनी उपस्थिती दर्शवून हिंदु राष्ट्राचा उद्घोष केला. या सभेत सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये, तसेच हिंदु जनजागृती समितीचे अधिवक्ता संघटक अधिवक्ता नीलेश सांगोलकर यांनीही मार्गदर्शन केले. या सभेसाठी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि राजकीय पक्ष यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांसह आजूबाजूच्या गावातील धर्माभिमानी हिंदू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी शंखनादानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण केला. ‘अखिल भारतीय पद्मशाली पुरोहित संघा’चे राष्ट्रीय अध्यक्ष वेदमूर्ती वेणुगोपाल (पंतुलु), जिल्हाध्यक्ष देवीदास यंगलदास, देवीदास कुरापाटी (पंतुलु) आणि पुरोहित केदारी राचर्ला यांनी वेदमंत्रपठण केले. हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा आढावा सोलापूर जिल्हा समन्वयक श्री. राजन बुणगे यांनी मांडला. सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन समितीचे श्री. विपुल भोपळे यांनी केले.
वंदनीय उपस्थिती
सनातनच्या पू. श्रीमती इंदिरा नगरकर, पू. दीपाली मतकर, धर्माचार्य बालयोगी महाराज
उपस्थित मान्यवर
भाजप आमदार विजयकुमार देशमुख, सोलापूरच्या माजी महापौर श्रीकांचना यन्नम, माजी नगरसेविका सौ. राधिका पोसा, सौ. अंबिका पाटील, माजी नगरसेविका सौ. रोहिणी तडवळकर, माजी नगरसेवक सुरेशअण्णा पाटील, माजी नगरसेवक श्री. शिवानंद पाटील, माजी नगरसेवक श्री. संजय कोळी, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्री. पेंटप्पा गड्डम, वीरशैव लिंगायत समाजाच्या अध्यक्षा सौ. पुष्पा गुंगे
सभेतील संत आणि मान्यवर यांचे ओजस्वी विचार !
हिंदूंनो, संघर्ष करूनच हिंदु राष्ट्र मिळवावे लागेल ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रसारक, सनातन संस्था
हिंदु राष्ट्र स्थापायचे असेल, तर आध्यात्मिक सामर्थ्य आणि हिंदुसंघटनशक्ती या दोन्हींची आवश्यकता आहे. हिंदूसंघटन करतांना हिंदूंच्या रक्षणासाठी ‘शक्तीची उपासना’ करण्याच्या जोडीला हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी साधना करून ‘उपासनेची शक्ती’ही वाढवण्याची आवश्यकता आहे. पांडव संख्येने पाचच असूनही त्यांनी शस्त्रबळ आणि संख्याबळ अधिक असलेल्या कौरवांना नमवले. याचे कारण पांडवांच्या पाठीशी साक्षात् जगद्गुरु भगवान श्रीकृष्ण होते. त्यामुळे हिंदूंनो, हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कितीही संघर्ष करावा लागला, तरी त्याची सिद्धता ठेवा.
औरंगजेबाचे उदात्तीकरण करणार्यांना हिंदूंनी त्यांची जागा दाखवून द्यावी ! – मनोज खाडये
आज देशावर विशेष करून महाराष्ट्रावर आक्रमण करणार्या, तसेच छत्रपती संभाजी महाराज यांचे हाल करून ठार मारणार्या क्रूरकर्मा औरंगजेबाचे राज्यात उदात्तीकरण चालू आहे. ज्या औरंगजेबाने स्वत:च्या पित्याला आणि भावांना सोडले नाही अशा औरंगजेबाच्या महालाच्या संवर्धनाची मागणी काही लोकप्रतिनिधी करत आहेत. त्यामुळे अशा प्रकारे मोगलांची पाठराखण करणार्यांना आता त्यांची जागा दाखवून देण्याचे काम हिंदूंना करावे लागेल.
‘धर्मांतर हेच राष्ट्रांतर’ असल्याने धर्मांतर रोखण्यासाठी कठोर कायदा करा ! – अधिवक्ता नीलेश सांगोलकर
१. देशात धर्मांतराची मोठी समस्या हिंदूंसमोर आहे. देशातील ९ राज्यांत हिंदू धर्मांतरित होऊन अल्पसंख्य झाले आहेत, इतकी गंभीर स्थिती आहे. या संदर्भात अधिवक्ता (श्री.) अश्विनी उपाध्याय यांनी सर्वाेच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. यावर सध्या सुनावणी चालू असून सर्वाेच्च न्यायालयाने ‘धर्मांतराचे सूत्र गंभीर असून याला राजकीय रंग देऊ नका’, अशी टिपणी केली आहे.
२. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सांगितल्याप्रमाणे ‘धर्मांतर हेच राष्ट्रांतर’ आहे. अशा प्रकारे धर्मांतर केलेले काही लोक राष्ट्रविघातक कार्यात सहभागी असतात. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे हरियाणा राज्यात करनाल येथे मूळ हिंदू असलेले आणि आता ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या ५ जणांनी गायीच्या चार्यात ‘सल्फास’च्या गोळ्या घालून गायींना ठार मारले. हे लोक गायींना ठार मारून त्यांची त्वचा, हाडे, तसेच चरबी विकण्याचा व्यवसाय करतात. यावरून धर्मांतराचे सूत्र किती गंभीर आहे हे लक्षात येते. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी यावर राजकारण न करता प्रबळ इच्छाशक्ती दाखवून धर्मांतरबंदी कायदा केला पाहिजे.
३. नांदेड जिल्ह्यातील किनवट येथे इस्लापूर पोलीस ठाण्यात गोरक्षक युवकांना अर्धनग्न करून अमानुष मारहाण करण्यात आली. या प्रकरणी तेथील साहाय्यक पोलीस निरीक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. पोलीस प्रशासनाने हे लक्षात ठेवले पाहिजे की, हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकारानेच पोलीस प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे अशा प्रकारे हिंदूंवर, गोरक्षकांवर अत्याचार करणार्यांच्या विरोधात, कायद्याचा अपवापर करणार्यांच्या विरोधात योग्य ती कारवाई होण्यासाठी तक्रार प्रविष्ट केली पाहिजे.
उपस्थित पक्ष-संघटना-संप्रदाय
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, भाजप, शिवसेना (उद्धव ठाकरे आणि शिंदे गट), विश्व हिंदु परिषद, बजरंग दल, वारकरी संप्रदाय, हिंदु राष्ट्र सेना, विविध स्थानिक संघटना-संप्रदाय
धर्मविरांचा सत्कार
सातत्याने राष्ट्र आणि धर्म जागृतीच्या कार्यात सहभागी असणारे धर्मप्रेमी सौ. भाग्यश्री धपाटे, सर्वश्री अविनाश मदनावाले, देवीदास सत्तारवाले, किशोर बिरबनवाले, राहुल वडनाल, विनायक वंगारी, यश मुगड्याल, श्रीकांत बिंगी, श्रीविलास गायकवाड, आनंद गोस्की, रामचंद्र पवार, राजशेखर आंदोडगी, संदेश देशपांडे आणि गणेश यलगेटी यांचा या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
हे पहा –
सभेचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा –
सिद्धरामेश्वरांच्या पावन नगरीत हिंदु जनजागृती समिती आयोजित,
विराट हिंदु राष्ट्र-जागृती सभा !
https://www.facebook.com/jagohindusolapur/videos/879730069764875
पहा आणि इतरांनाही पहायला द्या ?
क्षणचित्रे
१. हिंदु राष्ट्र प्रतिष्ठानचे कार्यकर्ते भव्य भगवे ध्वज घेऊन घोषणा देत सभास्थळी उपस्थित होत होते. यांसह अनेक भागांतील युवक ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘भारतमाता की जय’, ‘जय श्रीराम’ यांसह अन्य घोषणा देत सभास्थळी उपस्थित होते.
२. सभेसाठी महिला, युवती यांची लक्षणीय उपस्थिती होती. सभा चालू होण्याच्या अगोदरपासूनच महिला, युवती उपस्थित होत होत्या.
३. प्रारंभी श्री सिद्धेश्वर तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वाजवलेल्या ढोल-ताशांच्या गजरात वक्त्यांची मिरवणूक काढली.
४. सभास्थळी भगवे ध्वज, भगवे फेटे, महिलांनी परिधान केलेल्या भगव्या साड्या यांमुळे सर्वत्र उत्साह निर्माण झाला होता.