‘जय महाराष्ट्र’ वृत्तवाहिनीवरील विशेष कार्यक्रमात अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर आणि शिवप्रेमी मल्हार पांडे यांची मुलाखत !
मुंबई, १५ फेब्रुवारी (वार्ता.) – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाचा इतिहास सांगणार्या महाराष्ट्रातील गड-दुर्गावरील इस्लामी अतिक्रमण हे ठरवून केले जात आहे. ते रोखण्यासाठी पुरातत्व विभागाने काम करण्याची आवश्यकता आहे, असे मत हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर आणि शिवप्रेमी श्री. मल्हार पांडे यांनी ‘जय महाराष्ट्र’ या वृत्तवाहिनीवरील ‘जे एम् विशेष’ या कार्यक्रमात मांडले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील यशवंत गडाचे ढासळणारे बांधकाम आणि गडाच्या बाजूला होत असलेले अतिक्रमण यांविषयी १३ फेब्रुवारीला ‘यशवंत गडाला कोण वाचवणार ?’, हा विशेष कार्यक्रम दाखवण्यात आला.
सौजन्य जय महाराष्ट्र न्यूज
या कार्यक्रमात स्थानिक शिवप्रेमींच्या मुलाखती दाखवण्यात आल्या. त्यामध्ये शिवप्रेमींकडून गडावर स्वच्छता मोहीम राबवली जाते. गडाच्या जवळ काही हॉटेल व्यावसायिकांकडून अवैध बांधकाम चालू आहे. याविषयी पुरातत्व विभागाकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत; मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना शिवप्रेमींनी व्यक्त करत अतिक्रमण हटवण्याची मागणी केली.
या वेळी अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर म्हणाले की
१. राज्य पुरातत्व विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ आणि निधी नाही. राज्य पुरातत्व विभागाचे स्वत:चे संकेतस्थळही नाही, तसेच लोकांशी संवाद साधण्यासाठी ‘टोल फ्री’ क्रमांकही नाही. राज्य पुरातत्व विभागाला काम करायचेच नाही, याचे हे लक्षण आहे.
२. यशवंतगड, तसेच विशाळगड, सिंहगड यांवरील अतिक्रमण पहाता अतिक्रमण ही जणू दैनंदिन गोष्ट झाली आहे. शासनकर्त्यांचेही याकडे दुर्लक्ष होत आहे. अधिकारी वेतन घेतात आणि गडांची स्वच्छता मात्र शिवप्रेमी करतात. पुरातत्व विभागाने याविषयी काम करण्याची आवश्यकता आहे.
सरकारने पाठिंबा दिला, तर गडदुर्गांचा इतिहास जगापुढे ठेवता येईल ! – मल्हार पांडे, शिवप्रेमी
गड-दुर्ग यांवरील इस्लामी अतिक्रमण ठरवून केले जात आहे, याविषयी काहीही शंका नाही. गड-दुर्ग हा छत्रपती शिवरायांचा इतिहास आहे. कोणत्या ना कोणत्या मार्गाने तो नष्ट करण्याचे काम होत आहे. गड-दुर्गांवरील अतिक्रमणाविषयी शिवप्रेमींनी दक्ष रहाणे आवश्यक आहे. अन्यथा ही ऐतिहासिक स्थळे भविष्यात हातातून निघून जातील. सरकार शिवप्रेमींसमवेत ठामपणे उभे राहिले, तर महाराष्ट्रातील गड-दुर्गांचा वैभवशाली इतिहास जगापुढे ठेवता येईल. गडावर पर्यटक म्हणून न जाता आपला दैदिप्यमान इतिहास अनुभवण्यासाठी जा. नागरिकांनी गड-दुर्ग यांचे ऐतिहासिक महत्त्व समजून घेणे आवश्यक आहे.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात