Menu Close

राज्यात द्वेष आणि जातीयवाद पसरवणार्‍यांचा बंदोबस्त करा – हिंदु जनजागृती समिती

पू. अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराला विरोध जातीयवादातून !

‘श्री समर्थ संप्रदाया’चे सर्वेसर्वा तथा पद्मश्री पूज्य अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र शासनाने वर्ष 2022 चा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर केला आहे; खरे तर या पुरस्काराने ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराची उंची वाढलेली आहे. असे असतांना त्याला काही जातीयवादी संघटनांनी विरोध केला आहे. पूजनीय अप्पासाहेब धर्माधिकारी यांचे समाजसेवेचे कार्य पिढ्यानपिढ्या चालत आलेले आहे. त्यांनी व्यसनमुक्ती, स्वच्छता, सदाचार शिकवून लाखो लोकांना सन्मार्गाला लावले आहे. ‘दासबोधा’च्या शिकवणीतून अनेक सुसंस्कारित पिढ्या घडवल्या आहेत. अशा थोर विभूतीला ज्यांचा इतिहास केवळ तोडफोड आणि धमक्यांचा आहे, तसेच समाजहिताचे कोणतेही कार्य नाही अशा संघटनेने विरोध करणे, हे हास्यास्पद आहे. अशा द्वेष आणि जातीयवाद पसरवणार्‍यांचा बंदोबस्त महाराष्ट्र शासनाने करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांचे संघटक श्री. सुनील घनवट यांनी केली आहे.

‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराला विरोध करणार्‍या संघटनांनी राज्यात आतापर्यंत केवळ जातीयवादच पसरवला आहे. असाच विरोध शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनाही ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर झाल्यावर झाला होता. ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराची निवड ही संबंधित व्यक्तीचा पूर्ण अभ्यास करून शासकीय निवड समितीद्वारे केली जाते. पूज्य धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार दिल्याने कोकणातील ‘शेकाप’, ‘शिवसेना’, ‘भाजप’, ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ आदी सर्व पक्ष तथा सामाजिक संघटनांनी त्यांचे मनापासून स्वागत केले आहे. पूज्य अप्पासाहेब धर्माधिकारी हे दासबोध आणि समर्थ रामदासस्वामी यांच्या विचारांचा प्रसार करतात, हे खरे विरोधाचे कारण आहे. जातीभेद मिटवण्याचे कार्य करणार्‍या संतांना ‘वर्णभेद आणि अंधश्रद्धा पसरवणारे म्हणणे’, हा सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे. देशभरात विविध सिने क्षेत्रातील नट-नट्यांना पुरस्कार जाहीर होतात. त्यांतील काहींवर तर गंभीर गुन्हे वा आरोपही असतात. तेव्हा ही मंडळी कुठे जातात? त्यामुळे अशा जातीयवादाचे उच्चाटन करण्यासाठी समाजानेही संघटित झाले पाहिजे, असेही श्री. घनवट यांनी म्हटले आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *