सरकारी यंत्रणेला हाताशी धरून गडाचे इस्लामीकरण करण्यासाठी खोट्या नोंदी झाल्याचा प्रकार उघड !
ठाणे, १८ फेब्रुवारी (वार्ता.) – छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याचे पहिले आरमार जेथे निर्माण केले, तो दुर्गाडी गडावरील श्री दुर्गादेवीचे मंदिर हे ‘मैलिस-ए-मुशवरीन मशीद’ असल्याचा दावा करून त्याविषयीचा खटला वक्फ मंडळाकडे हस्तांतरित करण्याची मागणी काही स्थानिक मुसलमानांनी केली होती. कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली आहे; मात्र सरकारी यंत्रणेतील काही अधिकारी शासकीय कागदपत्रांमध्ये खोट्या नोंदी घुसडून दुर्गाडी गडाचे इस्लामीकरण करण्यासाठी साहाय्य करत असल्याचा धक्कादायक प्रकार आढळून आला आहे.
१. कल्याण येथील सरफुद्दीन मोईनुद्दीन कर्टे, महंमद फारीद, महंमद चौधरी, सुहैल फारीद, मोनाफ डोलारे यांनी कल्याण जिल्हा न्यायालयात केलेल्या याचिकेत दुर्गाडी गडावरील श्री दुर्गादेवीच्या मंदिराचा खटला वक्फ मंडळाकडे हस्तांतरित करण्याची मागणी केली आहे.
२. ३ एप्रिल या दिवशी याविषयीची पुढील सुनावणी होणार आहे. न्यायालयाने स्थानिक मुसलमानांची मागणी फेटाळून लावली असली, तरी गडाविषयीच्या शासकीय नोंदीमध्ये दुर्गाडी गड इस्लामी असल्याचे प्रयत्न होत आहेत. यामध्ये गडाच्या मागच्या बाजूला असलेल्या भिंतीला ईदगाह असल्याचे भासवून मागील अनेक वर्षांपासून तेथे ईदच्या दिवशी नमाजपठण केले जात आहे. त्यानंतर काही वर्षांपूर्वी गडाच्या बाजूला असलेल्या रस्त्याला ‘ईदगाह मार्ग’ या नावाचा फलक लावण्यात आला होता. स्थानिक हिंदुत्वनिष्ठांनी केलेल्या तक्रारीनंतर सध्या हा फलक काढून टाकण्यात आला आहे.
पोलिसांच्या नोंदीमध्ये ‘ईदगाह’चा उल्लेख ! – सुरेंद्र भालेकर, अध्यक्ष, त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव किल्ले दुर्गाडी
ईदच्या दिवशी दुर्गाडी गडावर नमाजपठणाच्या कालावधीत पोलिसांकडून मला नोटीस देण्यात येते, त्यामध्ये गडावरील भिंतीचा ‘ईदगाह’ असा उल्लेख करण्यात येतो. वर्ष २००५ पूर्वी असा उल्लेख करण्यात येत नव्हता; मात्र त्यानंतर शासकीय नोटिसीमध्ये ‘ईदगाह’ असा उल्लेख केला जात आहे. याविषयी मी वेळोवेळी जिल्हाधिकार्यांकडे तक्रार केल्या आहेत; मात्र त्यामध्ये पालट केला जात नाही.
न्यायासाठी आणखी किती वर्षे वाट पहावी लागणार ?
वर्ष १९७० मध्ये ठाणे जिल्हाधिकार्यांनी गडावरील वास्तू मंदिर असल्याचा निर्णय दिला आहे. त्यानंतर मुसलमानांनी याविषयी कल्याण जिल्हा न्यायालयाकडे याचिका केली. २२ मार्च १९७३ या दिवशी गडावरील श्री दुर्गादेवीच्या मंदिराविषयी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला होता. तत्कालीन महसूलमंत्री भाऊसाहेब वर्तक यांनी त्या वेळी गडावरील वास्तू ‘मंदिर’ असल्याचे स्पष्ट सांगितले. सद्यःस्थितीत स्थानिक मुसलमान मंदिरावर दावा करण्यासाठी उच्च न्यायालयाकडे जाण्याच्या सिद्धतेत आहेत. दुर्गाडी गडावरील वास्तू हे मंदिर असल्याचे अनेक ऐतिहासिक पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले असूनही कल्याण जिल्हा न्यायालयात वर्षानुवर्षे हा खटला रखडला. आता उच्च न्यायालयात गेल्यास ‘न्यायासाठी आणखी किती वर्षे वाट पहावी लागणार ?’, असा प्रश्न या खटल्यातील हिंदुत्वनिष्ठांकडून उपस्थित केला जात आहे.
गडावरील भिंत ईदगाह असल्याचा कोणताही पुरावा मुसलमानांना सादर करता आलेला नाही, तरीही प्रशासनाकडून गडावर वर्षातून २ वेळा नमाजपठण करण्यासाठी अनुमती दिली जाते. मुसलमानांनी ‘ईदगाह’ असल्याचा दावा केल्यामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून गडावर होणार्या नवरात्रोत्सवाला मात्र प्रशासनाकडून अनुमती नाकारण्यात येत आहे.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात