Menu Close

योग, ध्यानधारणेमुळे अल्झायमरचा धोका टाळण्यास मदत

योग आणि ध्यानधारणेमुळे मानसिक आणि भावनिक अडचणींवर मात करणे सहज शक्य

yogaयोग आणि ध्यानधारणेमुळे मानसिक आणि भावनिक अडचणींवर मात करणे सहज शक्य असून त्यामुळे अल्झालयमरचा धोका टाळण्यास मदत होत असल्याचे नुकत्याच करण्यात आलेल्या अभ्यासात स्पष्ट झाले आहे. त्याचप्रमाणे ध्यानामुळे बौद्धिक क्षमतेच्या विकासास मोठय़ा प्रमाणात हातभार लागत असल्याचे संशोधकांना आढळून आले आहे. यासंबंधी करण्यात आलेल्या संशोधनानुसार तीन महिन्यांचा ध्यानधारणा कार्यक्रम मानसिक आणि भावनिक अडचणींवर मात करण्यास लाभदायक ठरतो. याच अडचणींमुळे अल्झायमरचा त्रास होत असल्याने पर्यायाने या आजाराला रोखण्यास मदत होते. त्याचप्रमाणे बौद्धिक क्षमतेचा विकास करण्यासही ध्यानधारणा आणि योग अत्यावश्यक असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.

कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधक हेलेन लाव्हरस्की म्हणाल्या की, योगा आणि ध्यानधारणेमुळे संपूर्ण शरीरावर योग्य प्रमाणात नियंत्रण ठेवता येणे शक्य होते. तसेच, मनाचा कल, चिंता, राग यांच्यावर संतुलन ठेवणे शक्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मानसिक दडपणाखाली वावरणाऱ्या व्यक्तींमध्ये अल्झायमर या आजाराची लक्षणे आढळून येतात, असेही संशोधकांनी सांगितले. ५५ पेक्षा अधिक वय असलेल्या २५ व्यक्तींचा संशोधकांनी अभ्यास केला. त्या वेळी त्यांच्या वागण्याबरोबरच त्यांच्या बौद्धिक क्षमतेचाही अभ्यास करण्यात आला. यामध्ये सहभागी झालेल्या व्यक्ती बौद्धिकदृष्टय़ा कमकुवत होत्या. नावे, ठिकाण, चेहरे अशा काही गोष्टी ते विसरून जात होते. त्यामुळे त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना योग आणि ध्यानधारणेच्या कार्यक्रमात नेण्यात आले. त्यानंतर १२ आठवडय़ांत या व्यक्तींच्या बौद्धिक क्षमतेत प्रगती पाहायला मिळाली. विविध उपक्रमांमध्ये या व्यक्तींनी प्रभावीपणे सहभाग नोंदविला. या अभ्यासाचा अहवाल अल्झायमर जनरलमध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे.

संदर्भ : लोकसत्ता

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *