पंचमहाभूत लोकोत्सवाचा दुसरा दिवस प्रथम सत्र ‘आकाशतत्त्व-युवा’ चर्चासत्र
कोल्हापूर – जिथे विज्ञान संपते, तिथे अध्यात्म चालू होते. विज्ञानाने कोणताही नवीन शोध लावला नसून आपल्या प्राचीन ऋषीमुनींनी जे शोध लावले आहेत, केवळ त्याचे ‘डिकोडींग’ करत आहोत. आपल्या प्रत्येकाला काळजी आहे की, पर्यावरणाचे यापुढील काळात कसे होईल; मात्र भारताला सनातन धर्माचा पाया असल्याने आपण एक दिवस जगात सर्वश्रेष्ठ होऊ, असा विश्वास इस्रोचे शास्त्रज्ञ एस्.व्ही. शर्मा यांनी व्यक्त केला. ते पंचमहाभूत लोकोत्सवात २१ फेब्रुवारीला ‘आकाशतत्त्व-युवा’ चर्चासत्रात बोलत होते.
या प्रसंगी राष्ट्रीय हरित लवादाचे ए.के. गोयल, ‘एन्.सी.एस्.टी.’चे अध्यक्ष हर्ष चौहान, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, अक्षय कृषी परिवाराचे डॉ. गजानन डांगे, राजस्थान येथील पू. अभयदासजी महाराज, पेजावर येथील विश्वप्रसन्न तीर्थ स्वामीजी यांनीही त्यांचे मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी व्यासपिठावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी उपस्थित होते.
एस्.व्ही. शर्मा आपल्या मार्गदर्शनात म्हणाले,
१. मी गेली ३५ वर्षे रॉकेट विज्ञान या क्षेत्रात असून १७० पेक्षा अधिक रॉकेट आम्ही अंतराळात सोडले आहेत. मी वैज्ञानिक आणि आध्यात्मिक दृष्टी असलेला मनुष्य आहे. मी प्रार्थना करतो, देवळात जातो, तसेच अध्यात्माचा प्रचारही करतो.
२. आम्ही ३ वर्षांपूर्वी एक संशोधन प्रसिद्ध केले. त्यामध्ये ‘सूर्यापासून निघणारा आवाज हा ‘ओम’ असा आहे’, असे ध्वनीमुद्रित करण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत.
३. आपण केवळ ४५० कोटी रुपये इतक्या अल्प मूल्यात मंगळयान यशस्वी केले. त्याचा व्यय केवळ ८ रुपये प्रतिकिलोमीटर आहे.
४. मी जगात सर्वत्र प्रवास करतो आणि जगात सर्वत्र भारताला आदराचे स्थान आहे, असेच मला दिसून आले. आपण ‘सनातन धर्मामध्ये आहोत’, याचा अभिमान बाळगला पाहिजे.
५. भारतीय संस्कृती ही नेहमी इतरांचा विचार करते. आकाशतत्त्वाशी छेडछाड केल्यामुळेच आपल्याला ‘कोरोना’सारख्या रोगांना सामोरे जावे लागले.
या प्रसंगी राजस्थान येथील पू. अभयदासजी महाराज म्हणाले, ‘‘इथे सहभागी लोक भाग्यवान आहेत की, अशा कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी त्यांना मिळाली. श्री क्षेत्र सिद्धगिरीचे कार्य अद्भूत असून संत काय करू शकतात, याची प्रचीती या निमित्ताने येते.’’
राष्ट्रीय हरित लवादाचे ए.के. गोयल म्हणाले, ‘‘आज देशातील ६० टक्के लोकांना पिण्याचे शुद्ध पाणी नाही, अशी स्थिती आहे. देशात सर्वत्र आज कचर्याचे डोंगर उभे राहिले आहेत. देहलीसारख्या ठिकाणी ३ अतिभव्य कचर्याचे डोंगर आहेत. सरकार काही करेल, अशी अपेक्षा ठेवण्यापेक्षा आता नागरिकांनाच पुढाकार घेऊन कृती करावी लागेल.’’
‘एन्.सी.एस्.टी.’चे अध्यक्ष हर्ष चौहान म्हणाले, ‘‘आदिवासी लोकांसाठी निसर्ग आणि समाज हे वेगळे नसून ते एकच समजतात. ते कधीही भूमीचे तुकडे पाडत नाहीत. पंचमहाभूतांचे संवर्धन केल्यानेच विश्वाचे कल्याण होणार आहे.’’
पेजावर येथील विश्वप्रसन्न तीर्थ स्वामीजी म्हणाले, ‘‘पंचमहाभूतांचे रक्षण करण्याचे दायित्व आपल्यावर आहे. आपण आकाशात अनेक उपग्रह पाठवले; मात्र त्यातील अनेकांचे काम झाल्याने ते आता कचरा म्हणून अवकाशात आहेत. तरी अशा गोष्टींवर आपण योग्य त्या उपाययोजना काढल्या पाहिजेत.’’
या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, ‘‘तरुणांनी पृथ्वीसारखे सगळ्यांना आधार देणारे, अग्नीसारखे तेजस्वी, वायूसारखे प्रवाही, आकाशासारखे सगळ्यांना सामावून घेणारे असे व्यापक व्हावे.’’
शास्त्रज्ञ एस्.व्ही. शर्मा यांनी त्यांच्या भाषणाचा प्रारंभ ‘गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु..’ या श्लोकाने केला
स्रोत: दैनिक सनातन प्रभात