Menu Close

‘महाकवी कालिदास संस्‍कृत साधना’ पुरस्‍काराच्‍या रकमेत वाढ करावी – सुनील घनवट, राज्‍य संघटक, महाराष्‍ट्र आणि छत्तीसगड

हिंदु जनजागृती समितीची सरकारकडे मागणी !

अखिल विश्वाचे ज्ञान सामावलेल्या संस्कृत भाषेचे पुनुरुज्जीवण भारताला गतवैभव प्राप्त करून देईल ! -संपादक

श्री. सुनील घनवट

मुंबई – महाराष्‍ट्र शासनाकडून संस्‍कृत भाषेचा प्रचार-प्रसार करण्‍यासाठी संस्‍कृत पंडित, वेदमूर्ती, संस्‍कृत शिक्षक, संस्‍कृत प्राध्‍यापक, संस्‍कृत भाषेसाठी काम करणारे कार्यकर्ते यांना ‘महाकवी कालिदास संस्‍कृत साधना’ पुरस्‍कार प्रदान केला जातो. मागील १० वर्षांत या पुरस्‍काराच्‍या रकमेत १ रुपयाचीही वाढ करण्‍यात आलेली नाही. काँग्रेस सरकारच्‍या काळात संस्‍कृत भाषेची अवहेलना झाली; मात्र या सरकारने  पुरस्‍काराच्‍या रकमेत समाधानकारक वाढ करून संस्‍कृत भाषेचा सन्‍मान वाढवावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्‍ट्र आणि छत्तीसगड संघटक श्री. सुनील घनवट यांनी सरकारकडे केली. २३ फेब्रुवारी या दिवशी समितीच्‍या वतीने याविषयीचे निवेदन उच्‍च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांना देण्‍यात आले.

या निवेदनात श्री. सुनील घनवट यांनी म्‍हटले आहे की, २७ जुलै २०१२ या दिवशी सरकारने याविषयीचा शासन आदेश काढला आहे. या आदेशानुसार प्रतिवर्षी ८ जणांना हा पुरस्‍कार प्रदान करण्‍यात येतो. प्रत्‍येक पुरस्‍काराची रक्‍कम २५ सहस्र रुपये अशी निश्‍चित करण्‍यात आली आहे. राज्‍यशासनाकडून उर्दू भाषेच्‍या प्रचारासाठी वर्षभरात १२ हून अधिक उपक्रम राबवले जातात. त्‍यांवर पुरस्‍कार आणि प्रोत्‍साहनपर निधी यांसाठी वर्षभरात १ कोटी रुपयांहून अधिक खर्च केला जातो. याउलट संस्‍कृत भाषेच्‍या उत्‍कर्षासाठी वर्षभरात केवळ एकच पुरस्‍कार दिला जातो आणि त्‍याची रक्‍कमही मागील १० वर्षांत वाढवलेली नाही.

संस्‍कृतदिनी दिला जावा पुरस्‍कार !

प्रतिवर्षी संस्‍कृतदिनाच्‍या (नारळी पौर्णिमेच्‍या) दिवशी या पुरस्‍काराचे वितरण करावे, असे शासन आदेशात आहे. प्रत्‍यक्षात एकदाही संस्‍कृतदिनाच्‍या दिवशी हे पुरस्‍कार दिले गेले नाहीत. संस्‍कृतदिनी पुरस्‍कारांची घोषणाही करण्‍यात येत नाही. सरकारच्‍या सवडीनुसार या पुरस्‍कारांचे वितरण केले जात आहे. मागील काही वर्षांत ३-४ वर्षांचे पुरस्‍कार एकाच वेळी दिले जात आहेत. वर्ष २०२१ चा पुरस्‍कार अद्यापही घोषित करण्‍यात आलेला नाही. ही एकप्रकारे संस्‍कृत भाषेची अवहेलना आहे. याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, असे निवेदनामध्‍ये श्री. सुनील घनवट यांनी म्‍हटले आहे.

समितीच्‍या सरकारकडे मागण्‍या !

१. ‘महाकवी कालिदास संस्‍कृत साधना’ पुरस्‍कार संस्‍कृतदिनीच दिला जावा.

२. या पुरस्‍कारासाठी देण्‍यात येणार्‍या रकमेमध्‍ये समाधानकारक वाढ करावी.

३. शाळा आणि महाविद्यालये यांमध्‍ये विविध स्‍पर्धांचे आयोजन करून विद्यार्थ्‍यांना पुरस्‍कार द्यावेत.

४. संस्‍कृत भाषेचा प्रसार-प्रचार करण्‍यामध्‍ये मोठे योगदान देणार्‍या वेदपाठशाळांना संस्‍कृत भाषेच्‍या संवर्धनासाठी निधी उपलब्‍ध करून द्यावा.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *