गड-दुर्गांच्या रक्षणासाठी संघटित लढा देण्याचा ऑनलाईन बैठकीत निर्धार !
मुंबई – महाराष्ट्रात प्रत्येक तालुका आणि जिल्हा येथे अनेक दुर्गप्रेमी संघटना आणि शिवप्रेमी कार्यरत आहेत. यांतील अनेक संघटनांनी अनेक वर्षांपासून प्रशंसनीय कार्य केले आहे आणि आजही करत आहेत. तरीही आज गड- दुर्गांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होणे, गड-दुर्गांची दुरवस्था होणे, गड-दुर्गांवर अपप्रकार होणे आदी चालूच आहे. पुरातत्त्व विभागाची या सर्वांच्या संदर्भात अनास्था दिसून येते. हे सर्व रोखण्यासाठी महाराष्ट्रातील समस्त दुर्गप्रेमी संघटना आणि शिवप्रेमी एकत्र आल्यास पुष्कळ मोठी ताकद निर्माण होऊन या सर्व समस्या लवकर सुटतील, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी येथे केले. महाराष्ट्रातील समस्त गड-दुर्ग प्रेमी संघटना, हिंदुत्वनिष्ठ संघटना, शिवप्रेमी यांची ‘ऑनलाईन’ बैठक २३ फेब्रुवारी या दिवशी पार पडली. त्या वेळी श्री. घनवट बोलत होते. महाराष्ट्र गड-दुर्ग रक्षण समितीने ३ मार्च या दिवशी दुपारी १२ वाजता मुंबई येथे राज्यव्यापी मोर्च्याचे आयोजन केले आहे. या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली.
महाराष्ट्र गड-दुर्ग रक्षण समिती आयोजित ….
?गड – दुर्ग रक्षण महामोर्चा?
?️ शुक्रवार,३ मार्च २०२३ | दुपारी १२ वा.
प्रारंभ:मेट्रो आयनॉक्स सिनेमा
सांगता स्थळ :आझाद मैदान, मुंबई
संपर्क : ७०२०३८३२६४
?गड -दुर्ग रक्षण मोहिमेत सहभागी होण्यासाठी फॉर्म भरा!https://t.co/FZJwx1jZxd pic.twitter.com/YJYE2RmyQC— Prachi Bhatkar (@prachi_bhatkar) February 24, 2023
या बैठकीस महाराष्ट्रातील दुर्गप्रेमी संघटना, हिंदुत्वनिष्ठ संघटना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदु जनजागृती समिती यांच्यासह शिवसेना, मनसे या पक्षांचे ८५ कार्यकर्ते उपस्थित होते. श्री. सुनील घनवट यांच्या वक्तव्याचे समर्थन करत बैठकीला उपस्थित समस्त दुर्गप्रेमी संघटना आणि शिवप्रेमी यांनी संघटित लढा देण्याचा निर्धार या वेळी केला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-दुर्गांचे रक्षण व्हावे, संवर्धन व्हावे, गड- दुर्गांवरील अतिक्रमण तात्काळ हटवावे आणि यासाठी स्वतंत्र महामंडळाची स्थापना करावी, या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. महाराष्ट्र गड-दुर्ग रक्षण समितीच्या वतीने ३ मार्च या दिवशी आयोजित मोर्च्यात मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे सर्व संघटना आणि पक्ष यांच्या प्रतिनिधींनी या वेळी सांगितले.