Menu Close

कांगडा (हिमाचल प्रदेश) येथे संकटाची सूचना देतो लाल भैरव !

lal_bhairav_temple

शिमला : देवभूमी हिमाचल प्रदेशमध्ये अनेक मंदिरे आहेत आणि देवतांच्या अनेक कथाही येथे ऐकायला मिळतात. अशीच कथा शक्तीपीठ ब्रजेश्‍वरी मंदिराविषयीही सांगितली जाते.

कांगडा भागात असलेल्या या मंदिराच्या आवारात लाल भैरवाचे मंदिर आहे. या मंदिरातील मूर्ती ५ सहस्र वर्ष प्राचीन असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे कांगडा भागावर काही संकट येणार असेल, तर या मूर्तीच्या डोळ्यांतून अश्रू येतात आणि अंगाला घाम येतो. अनेकदा हा चमत्कार घडला आहे. त्यानंतर तेथील पुजारी देवी ब्रजेश्‍वरी पुढे होमहवन करून आणि मूर्तीला अभिषेक करून संकट निवारण व्हावे, यासाठी प्रार्थना करतात. त्यामुळे संकट टळते, अशी भाविक आणि स्थानिक यांची श्रद्धा आहे.

स्थानिक लोक सांगतात, वर्ष १९७७ मध्ये मूर्तीला घाम आला आणि डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यावेळी कांगडा बाजारात मोठे अग्नीतांडव झाले आणि तेथील अनेक दुकाने भस्मसात झाली. तेव्हापासून येथे प्रत्येक नोव्हेंबर-डिसेंबर मासांमध्ये भैरव जयंती साजरी केली जाते. त्यावेळी पूजा, होमहवन केले जाते. ब्रजेश्‍वरी हे पार्वतीचे शक्तीपीठ असून येथे सतीदेवीचा उजवा स्तन पडला होता, असा समज आहे. येथे धर्माचे प्रतीक म्हणून सती देवीच्या ३ पिंडींची पूजा केली जाते. त्यातील एक ब्रजेश्‍वरी, दुसरी भद्रकाली आणि तिसरी मां एकादशी असल्याची भावना आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Tags : Hinduism

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *