आकार डीजी ९ या यू-ट्यूब वाहिनीवरील मुलाखत !
मुंबई – छत्रपती शिवाजी महाराजांनी इस्लामी जाचातून आपली मुक्तता करून हिंदवी स्वराज्य स्थापन केले. जे गड आणि दुर्ग यांच्या माध्यमांतून त्यांनी हे कार्य केले, तेच ऊर्जास्रोत आज इस्लामी आणि इतर अतिक्रमणांच्या विळख्यात सापडले असून समाज याकडे दुर्लक्ष करत आहे. यामुळे महाराष्ट्रातील समस्त शिवप्रेमी, दुर्गप्रेमी यांनी एकत्रित येत महाराष्ट्र गड-दुर्ग रक्षण समितीची स्थापना केली असून जोपर्यंत महाराष्ट्रातील एकूण एक गड अतिक्रमणमुक्त होत नाही, तोपर्यंत संघर्ष करत रहाणार असल्याचा निर्धार या वेळी महाराष्ट्र गड-दुर्ग रक्षण समितीचे समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी व्यक्त केला.
(सौजन्य : aakar DIGI9)
आकार डीजी ९ या यू-ट्यूब वाहिनीवर श्री. प्रभाकर सूर्यवंशी यांनी महाराष्ट्र गड-दुर्ग रक्षण समितीचे समन्वयक तथा हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांची मुलाखत घेतली. या वेळी ज्या अधिकार्यांच्या कारकीर्दीत गड-दुर्गांवर अतिक्रमणे झाली त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अतिक्रमण करणार्यांना इतर ठिकाणी विनामूल्य जागा देऊ नये, अशीही आमची मागणी असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.
आज महाराष्ट्रातील अनेक किल्ले भुईसपाट होण्याच्या मार्गावर असून प्रशासन, पुरातत्व विभाग, वनविभाग याविषयी सुस्त असून शिवप्रेमीही उदासीन आहेत. गड-दुर्ग म्हणजे पर्यटनाची ठिकाणे नसून ती पवित्र स्थाने आहेत. त्यांची स्वच्छता आणि निगा राखणे आपले कर्तव्य समजले पाहिजे. इतरांनासुद्धा याविषयी प्रेमाने सांगावे, असे घनवट यांनी या वेळी सांगितले.
हा व्हिडिओ आतापर्यंत ३० सहस्रांहून अधिक दर्शकांनी पाहिला असून ३ सहस्रांहून अधिक लाईक (लाईक म्हणजे व्हिडिओ आवडला असल्यास दाबायचे चिन्ह) या व्हिडिओला आतापर्यंत मिळाले आहेत.