पुणे – धर्मशिक्षणाच्या अभावी सण-उत्सव यांमागील मूळ उद्देशच लोप पावत चालला असून अपप्रकारांचा शिरकाव झाला आहे. धूलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी रासायनिक रंग लावून खडकवासला जलाशयात अंघोळीसाठी येणे, हा या अपप्रकारांमधीलच एक भाग ! यामुळे पुणे शहराला पाणीपुरवठा करणारा जलस्रोत प्रदूषित होतो. त्यामुळेच हिंदु जनजागृती समिती, खडकवासला येथील ग्रामस्थ आणि अन्य समविचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने गेली २० वर्षे ‘खडकवासला जलाशय रक्षण’ मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेच्या अंतर्गत यंदाचे हे २१ वे वर्ष असून ७ मार्च (धूलिवंदन) आणि १२ मार्च (रंगपंचमी) या दोन्ही दिवशी प्रबोधनात्मक फलक हातात धरून सकाळी ९ पासून सायंकाळी ७ पर्यंत खडकवासला जलाशयाच्या भोवती मानवी साखळी करण्यात येणार आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांनी ४ मार्च या दिवशी पुणे येथील पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला रणरागिणी शाखेच्या कु. क्रांती पेटकर, ‘जैन सोशल ग्रुप महाराष्ट्र प्रदेश’चे उपाध्यक्ष दिलीपभाई मेहता यांनीही संबोधित केले.
महिलांनो, सण-उत्सवांमधील अपप्रकार रोखण्यासाठी सज्ज व्हा ! – कु. क्रांती पेटकर, रणरागिणी शाखा
रंगपंचमीच्या निमित्ताने महिलांची छेडछाड करणे, त्यांच्यावर घाणेरड्या पाण्याचे फुगे फेकून मारणे, अशा अपप्रकारांचा शिरकाव झाला आहे. हे सगळे अपप्रकार रोखण्यासाठी रणरागिणी शाखेच्या वतीने रंगपंचमीच्या काही दिवस आधीपासून प्रबोधन करते, तसेच २० वर्षांपासून प्रतिवर्षी ‘खडकवासला जलाशय रक्षण’ मोहिमेमध्ये सहभागी होत आहे. या वर्षी रणरागिणी शाखेच्या युवतींसह वयस्कर महिलाही सहभागी होणार आहेत. ‘आपणही या मोहिमेमध्ये सहभागी व्हा’, असे आवाहन रणरागिणी शाखेच्या कु. क्रांती पेटकर यांनी सर्व महिलांना केले.