नायब तहसीलदार लक्ष्मण फोवकांडे यांच्या तक्रारीनुसार पोलिसांची कारवाई
वेंगुर्ला – तालुक्यातील रेडी येथील यशवंतगडाच्या तटबंदीनजीक अवैध उत्खनन आणि बांधकाम केलेल्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी शिवप्रेमींनी ८ दिवस बेमुदत उपोषण केले होते. त्या वेळी प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानुसार नायब तहसीलदार लक्ष्मण महादेव फोवकांडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी ५ जणांच्या विरोधात येथील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.
येथील शिवप्रेमी तथा भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेच्या कोकण प्रांताचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजन रेडकर आणि भूषण मांजरेकर यांनी हे उपोषण केले होते. त्यानंतर ‘संबंधितांवर नियमानुसार उचित कारवाई करण्यात येईल’, असे आश्वासन प्रशासनाने दिल्यानंतर शिवप्रेमींनी उपोषण स्थगित केले. त्यानंतर नायब तहसीलदार फोवकांडे यांनी पोलीस ठाण्यात सागर कृष्णा सावंत, प्रदीप विनायक दळवी, सदानंद विनायक दळवी, निळकंठ विनायक दळवी (सर्व रहाणार रेडी, वेंगुर्ला) आणि श्रीमती प्रीती श्रीवास्तव (रहाणार वाकड, पुणे, महाराष्ट्र) या ५ जणांच्या विरोधात भूमी सर्वेक्षण क्रमांक ३४ मधील खासगी भूमीत अवैधरित्या विनाअनुमती बांधकाम केल्याच्या प्रकरणी महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन आणि नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ५२, ५३ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.