Menu Close

गड-दुर्ग रक्षणासाठी ३०० कोटी रुपयांची तरतूद !

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२३-२०२४

महाराष्ट्राचा सांस्कृतिक आणि धार्मिक संवर्धन करणारा अर्थसंकल्प २०२३-२४ विधीमंडळात सादर !

  • ‘महाराष्ट्र गोसेवा आयोगा’च्या स्थापनेची घोषणा !

  • सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन, २५ लाख हेक्टर क्षेत्रात सेंद्रीय शेती करणार !

  • महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना १२ सहस्र रुपयांचा सन्माननिधी

  • महिलांना एस्.टी. प्रवासात सरसकट ५० टक्के सवलत

मुंबई, ९ मार्च (वार्ता.) – विधानसभेत अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेत मंत्री दीपक केसरकर यांनी ९ मार्च या दिवशी महाराष्ट्र शासनाचा वर्ष २०२३-२०२४ साठीचा १६ सहस्र १२२ कोटी रुपये महसुली तुटीचा, महाराष्ट्राचे सांस्कृतिक आणि धार्मिक संवर्धन करणारा अर्थसंकल्प सादर केला. विशेष म्हणजे आज तुकाराम बीज असल्याने ‘संत तुकाराम यांच्या स्वप्नींही दुःख कोणी न देखे डोळा…हीच त्यांची रामराज्याची संकल्पना होती’, असा अभंग म्हणून दोन्ही मंत्र्यांनी अर्थसंकल्पातील माहिती देण्यास प्रारंभ केला. अर्थसंकल्प सादर केला.

या अर्थसंकल्पाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे गड-दुर्गांच्या रक्षणासाठी ३०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून गोवंशियांच्या संवर्धनासाठी ‘महाराष्ट्र गोसेवा आयोगा’ची स्थापना करण्यात येणार आहे. ‘राज्याचा अर्थसंकल्प पंचामृत ध्येयांवर आधारित आहे’, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. महाराष्ट्राचे सांस्कृतिक आणि धार्मिक संवर्धन करून त्यावर पंचामृताचे स्नान घालणारा अमृत महोत्सवातील पहिला अर्थसंकल्प (अमृतमय अर्थसंकल्प) विधीमंडळात सादर करण्यात आला.

१. अर्थसंकल्पात ‘महात्मा फुले जन आरोग्य योजने’ची मर्यादा २ लाख रुपयांवरून  ५ लाख रुपये करण्यात आली आहे, तसेच अंगणवाडी सेविकांचे मानधन १० सहस्र रुपये, तर आशा स्वयंसेविकांचे मानधन ५ सहस्र रुपये करण्यात आले आहे, महिलांना तिकिटात ५० टक्के सवलत, राज्यात ‘मराठी भाषा विद्यापीठ’ स्थापन करणे, शेतकर्‍यांना ६ सहस्र रुपयांचा सन्मान निधी यासह अन्य अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत.

२. शाश्‍वत शेती-समृद्ध शेतकरी, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास, भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास, रोजगार निर्मिती, सक्षम, कुशल, रोजगारक्षम युवा आणि पर्यावरणपूरक विकास या ५ ध्येयांवर राज्याचा अर्थसंकल्प आधारित असून या अर्थसंकल्पात सरकारने स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून अनेक घोषणा केल्या आहेत.

३. अर्थसंकल्पामध्ये एकूण व्ययासाठी ५ लाख ४७ सहस्र ४५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे, तर महसुली जमा ४ लाख ४९ सहस्र ५२२ कोटी रुपये आणि महसुली व्यय ४ लाख ६५ सहस्र ६४५ कोटी रुपये अंदाजित केला आहे.

४. अर्थसंकल्पात आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत १५ सहस्र १५० कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेतही तरतूद १ सहस्र ८१० कोटी रुपयांनी अधिक आहे. अर्थसंकल्पात राजकोषीय तूट ९५ सहस्र ५०० कोटी ८० लाख रुपये आहे.

अर्थसंकल्पाविषयी ७ दिवसांत अनुमाने ४० सहस्र सूचना प्राप्त !

अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे हा जनभागीदारी असलेला अर्थसंकल्प आहे. राज्यातील जनतेकडून त्यांच्या मनातील अर्थसंकल्पाविषयीचा सूचना मागवण्यात आल्या होत्या. त्यानुसार ७ दिवसांत जनतेच्या एकूण ४० सहस्र सूचना प्राप्त झाल्या.

अर्थसंकल्प सादर करतांना संत ज्ञानेश्‍वरांचे अभंग म्हटले !

अर्थसंकल्प सादर करतांना देवेंद्र फडणवीस आणि दीपक केसरकर यांनी ज्ञानोबा माऊली यांचा अभंग वाचून दाखवून संत ज्ञानेश्‍वर माऊली यांच्या ‘दुरितांचे तिमिर जावो । विश्‍व स्वधर्म सूर्ये पाहो । जो जे वांछिल तो ते लाहो । प्राणिजात ॥’ हा या अर्थसंकल्पाचा प्रासादिक संदेश आहे आणि तीच आमची प्रामाणिक भावना आहे, असे या वेळी सांगितले.

सरकारचे ‘पंचामृत’ ध्येय !

१. शाश्‍वत शेती-समृद्ध शेतकरी
२. महिला, आदिवासी, मागासवर्ग, तसेच ओबीसी यांच्यासह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास
३. भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास
४. रोजगारनिर्मिती : सक्षम, कुशल, रोजगारक्षम युवा
५. पर्यावरणपूरक विकास आणि शेती

 

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *