हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचा नेपाळ दौरा
काठमांडू (नेपाळ) – पाश्चात्त्यांसह विश्वभरातील लोक आनंदाच्या शोधासाठी स्वतःहून सनातन धर्म आणि संस्कृती यांच्याकडे आकर्षिले जात आहेत. याउलट हिंदु आपल्या अंधबौद्धीक गुलामगिरीमुळे पाश्चात्त्य विकृतीकडे वळत आहेत. आधुनिक विज्ञानापेक्षा सनातन संस्कृतीचे श्रेष्ठत्व आजच्या युवकांना सांगण्याची आवश्यकता आहे. आधुनिक विज्ञानासह वैद्यकीय, खगोल, स्थापत्य, धातूकर्म, गणित इत्यादी सर्वांचे मूळ आपल्या वेदांत सापडते. आधुनिक विज्ञानाच्या अगोदरपासून आपल्याकडे सोन्याचे दागिने, तांब्याची भांडी इत्यादी बनवणे सामान्य होते. त्यामुळे हिंदु धर्माचे ज्ञान आजच्या युवा पिढीसमोर योग्य पद्धतीने मांडले, तर सनातन धर्माचे श्रेष्ठत्व त्यांच्या लक्षात येईल, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले. येथील ‘नेपाल टिव्ही’, ‘न्यूज २४’ आणि ‘प्राईम टिव्ही’ या स्थानिक वाहिन्यांनी सद्गुरु डॉ. पिंगळे यांची मुलाखत घेतली. त्या वेळी ते मार्गदर्शन करत होते.
वैशिष्ट्यपूर्ण
‘महाशिवरात्री’विषयी सद्गुरु डॉ. पिंगळे यांनी मार्गदर्शन केले होते. ते ऐकून धर्म आणि अध्यात्म यांविषयी एवढ्या सोप्या भाषेत केलेल्या मार्गदर्शनाचा लाभ अधिक लोकांना व्हावा; म्हणून नेपाळमधील धर्मप्रेमी श्रीमती कविता राणा यांनी स्वतःहून एका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन अन् ‘प्राईम टिव्ही’वर मुलाखतीचे आयोजन केले.
नेपाळ दौर्यात सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी घेतली विविध हिंदुत्वनिष्ठांची भेट !‘नेपाल ज्योतिष परिषदे’चे सदस्य ज्योतिषाचार्य श्री. लक्ष्मण पंथी आणि श्री. जनार्दन न्यौपाने, बौद्ध गुरु लामा घ्याछो रिम्पोछे, ‘कालिका एफ्.एम्.’च्या संचालिका श्रीमती रिना गुरुंग, ‘दैनिक समाचार नया पत्रिका’चे वरिष्ठ संपादक श्री. परशुराम काफ्ले, ‘स्पिरिच्युअल टुरिझम’ आस्थापनाचे संचालक प्रा. भरत शर्मा, ‘ओंकार टिव्ही’चे संस्थापक श्री. मुकुंद शर्मा, ‘त्रिचंद्र विश्वविद्यालया’चे प्रा. डॉ. गोविंद शरण, ‘त्रिभुवन विश्वविद्यालया’चे प्रा. निरंजन ओझा, ‘संस्कृत विश्वविद्यालया’चे पूर्व संचालक (डायरेक्टर) प्रा. डॉ. काशीनाथ न्यौपाने, ‘फार्माक्लॉजी विभागा’चे प्रमुख डॉ. सम्मोदाचार्य कौडिण्य, ‘लिडरशिप अकादमी’चे श्री. संतोष शहा आणि श्रीमती आर्या शहा, ‘लोकतांत्रिक समाजवादी पक्षा’चे श्री. मनिष मिश्रा, ‘मानव धर्म सेवा’चे श्री. सागर कटवाल अन् श्री. प्रेम कैदी अशा विविध हिंदुत्वनिष्ठांच्या सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी भेटी घेतल्या. देवघाट येथील महर्षि महेश आश्रमालाही सदगुरु डॉ. पिंगळे यांनी भेट दिली.
|
द्वेष आपल्या विनाशाचे कारण बनतो ! – सद्गुरु डॉ. पिंगळे
धर्मपरंपरेला वाचवले, तर संप्रदाय वाचेल. संप्रदायाला श्रेष्ठ कराल, तर जशी फांदी झाडापासून वेगळी केली, तर फांदीच नष्ट होते. वेदांविषयी सोप्या भाषेत सांगायचे झाले, तर परमात्म्याचे जे ज्ञान आपण शब्दांत व्यक्त करू शकतो, त्याला ‘वेद’ म्हणतात; पण परमात्मा शब्दांच्या पलीकडे आहे, असे मार्गदर्शन सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले. ‘स्वधर्म टिव्ही’चे श्री. सुवास आगम यांनी सदगुरु डॉ. पिंगळे यांना जिज्ञासेने कर्म, तीर्थक्षेत्र, कुंभमेळा, शिवलिंग, ब्राह्मण, अग्निहोत्र आदी विविध विषयांवर मुलाखत घेतली. त्या वेळी ते मार्गदर्शन करत होते.
सदगुरु डॉ. पिंगळे पुढे म्हणाले की,
१. कर्माच्या उद्देशावर फळ अवलंबून असते. धर्मसंमत कर्तव्य हेच कर्म आहे. पूर्वजन्माचे पुण्यकर्म या जन्मात भाग्य बनून येते आणि पूर्वजन्माचे पापकर्म दु:ख बनून येते. एकतर्फी द्वेष केल्याने हाच द्वेष आपल्या विनाशाचे कारण बनतो.
२. जिथे पवित्रता आणि दिव्यता प्राप्त होते, ते तीर्थ होय. कर्म करतांना स्वार्थी बुद्धी ठेवली आणि गंगेत डुबकी घेऊन ‘ती पाप नष्ट करणार’, असा भाव ठेवला, तर महापाप लागेल.
३. भाषाशास्त्रानुसार एका शब्दाचे अनेक अर्थ असतात. शिवलिंगामधील ‘लिंग’ या शब्दाचा अर्थ प्रतीक, म्हणजेच शिवाचे प्रतीक असल्याचे म्हटले आहे. आपल्या ज्ञान परंपरेच्या अपयशामुळे लोक चुकीचा अर्थ लावतात.
स्वतःतील गुणवृद्धी करणे हेच खरे ज्ञान ! – सद्गुरु डॉ. पिंगळे
विद्यार्थ्यांनी स्वतःच्या क्षमतेचे आकलन करून ध्येय निश्चित केले पाहिजे. क्षमतेपेक्षा अधिक अपेक्षा केले की, ताण येतो. जीवनातील अडचणींचा अभ्यास करून प्रयत्न केले, तर यश प्राप्त होते. निश्चयात्मक बुद्धी आणि स्वयंसूचना देऊन आळस दूर करता येतो. जीवनातील अडचणींचे अध्ययन करून त्या स्विकारल्या पाहिजेत. दैनंदिन जीवनातील अडचणी आणि अपयश यांचा सामना करण्यासाठी आध्यात्मिक उर्जा आवश्यक आहे. यासाठी कुलदेवता किंवा उपास्यदेवतेचे नामस्मरण केले पाहिजे. स्वतःतील गुणवृद्धी करणे हेच खरे ज्ञान आहे, असे मार्गदर्शन सद्गुरु डॉ. पिंगळे यांनी केले. ‘ग्लेन बड्स स्कूल’च्या १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी सदगुरु डॉ. पिंगळे यांचे ‘यशस्वी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर मार्गदर्शन आयोजित केले होते. त्या वेळी ते मार्गदर्शन करत होते. मार्गदर्शनाच्या प्रारंभी विद्यालयाचे संचालक श्री. राजेश महाराजन यांनी सदगुरु डॉ. पिंगळे यांचे स्वागत केले.
सद्गुरु डॉ. पिंगळे यांनी विविध हिंदुत्वनिष्ठांच्या भेटीत केलेले मार्गदर्शन
१. शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक, असे युद्धाचे ३ स्तर असतात. भूसंपादनासाठी केलेले युद्ध शारीरिक, कूटनीती युद्ध, मानसिक युद्ध आणि सध्या चालू असलेले युद्ध अहंसाठीचे म्हणजेच आध्यात्मिक स्तरावर पोचले आहे.
२. नेपाळमध्ये तंत्रसाधनेविषयी अधिक आकर्षण असल्याचे दिसून येते. तंत्राचा उद्देश परमात्म्याची प्राप्ती आहे. चित्त शुद्धीनंतर तंत्र साधना केली, तर भक्ती निर्माण होते. वेदांचा उद्देश सोडून तंत्राचा उद्देश वेगळा ठेवला, तर विकृती निर्माण होते.
३. धर्म परंपरेच्या गोष्टी बोलतांना मानसिक स्तरावर बोलू नये. सत्याशी जोडून राहिले, तर कुणाशी तर्कवितर्क करावे लागत नाही.
सद्गुरु डॉ. पिंगळे यांच्या मार्गदर्शनातील उद्बोधक वाक्ये१. जे स्वतःच्या विचारांखेरीज इतरांचे विचार स्वीकारू शकत नाही ते अज्ञान ! |
हिंदुत्वनिष्ठांचे अभिप्राय
१. श्री. प्रेम कैदी, मानव धर्म सेवा – तुम्ही जेवढ्या चांगल्या पद्धतीने भारतात कार्य करतात, तसे नेपाळमध्ये कुणी करत नाही.
२. श्री. परशुराम काफ्ले, वरिष्ठ संपादक, दैनिक समाचार नया पत्रिका – तुम्ही सांगत असल्यप्रमाणे जगात स्थिती पालटत आहे.
३. प्रा. भरत शर्मा, संचालक, स्पिरिच्युअल टुरिझम – मी प्रतिदिन माझ्या कार्यालयात भीमसेनी कापूर वापरतो. त्यामुळे इथे येणारा प्रत्येक जण म्हणतो की, तुमच्या कार्यालयात शांत वाटते आणि येथून जावेसे वाटत नाही.