Menu Close

‘ओ.टी.टी.ची वेब सिरीज कि अश्लीलतेचे माध्यम ?’ या विषयावर विशेष संवाद !

वेब सिरीज वर सरकारने नियंत्रण ठेऊन त्यासाठी सेन्सॉर बोर्ड लागू करावा ! – श्री. सतीश कल्याणकर, माजी सदस्य, केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळ

आज वेब सिरीज एक प्रभावी माध्यम झाले आहे. वेब सिरीज/ओ.टी.टी.ला कुठलीही सेन्सॉरशिप लागू केलेली नाही. सरकारने वेब सिरीजवर नियंत्रण ठेवले पाहिजे. वेब सिरीजसह वाहिन्यांवर दाखवण्यात येणार्‍या मालिका, कार्यक्रम यांच्यासाठीही सेन्सॉर बोर्ड लागू करावा, अशी मागणी ‘केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळा’चे माजी सदस्य श्री. सतीश कल्याणकर यांनी केली. ते हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘ओ.टी.टी.ची वेब सिरीज कि अश्लीलतेचे माध्यम ?’ या विषयावर आयोजित ऑनलाईन विशेष संवादात बोलत होते.

श्री. सतीश कल्याणकर पुढे म्हणाले, ‘सेन्सॉर बोर्डवर पूर्वीपासूनच योग्य आणि जाणकार व्यक्ती नेमलेल्या नाहीत. देश, समाज, संस्कृती यांविषयी आपली काय जबाबदारी आहे, यांविषयी काय कायदे आहेत, हे सेन्सॉर बोर्डवर असणार्‍या लोकांना माहीत आहे का ? मी यापूर्वीच केंद्र सरकारकडे याविषयी पत्रव्यवहार केला आहे. सेन्सॉर बोर्डवर नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींना प्रशिक्षण देण्याचे प्रावधान असतानाही त्यांना कुठलेही प्रशिक्षण दिले जात नाही, हे धक्कादायक आहे. सेन्सॉर बोर्डच्या प्रशिक्षणात उत्तीर्ण झालेल्यांना तिथे काम करण्याची अनुमती द्यावी.’

‘भारत वॉइस’च्या संस्थापिका गायत्री एन्. म्हणाल्या, ‘चित्रपटांसाठी सेन्सॉर बोर्ड आहे, मात्र वेब सिरीज/ओ.टी.टी.साठी हे लागू झालेले दिसत नाही. वेब सिरीजमधील संवादांत शिवराळ भाषा, दाखवण्यात येणारी हिंसा यांमुळे ते पाहून भारत आणि विदेशांतील लहान मुलेही त्याचे अनुकरण करत आहेत. हे थांबायला हवे.’

हिंदु जनजागृती समितीच्या प्रवक्त्या ॲड. अमिता सचदेवा म्हणाल्या, ‘आज वेब सिरीजमधून हिंसेला प्रोत्साहन दिले जात आहे. वेब सिरीजमध्ये हिंदु धर्म, देशाचे सैन्य आदींविषयी चुकीचे चित्रण दाखवले जाते, यांसाठी सेन्सॉर बोर्ड नाही. यासंदर्भात हिंदु जनजागृती समिती गेल्या काही वर्षांपासून न्यायालयीन लढा देत आहे. वेब सिरीजविषयी जोपर्यंत सरकार ठोस पावले उचलत नाही तोपर्यंत हा लढा चालूच राहील.’

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *