हुतात्मा शिवराम हरी राजगुरु जन्मस्थळ परिसराच्या विकास समितीची बैठक पार पडली !
मुंबई – हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान मोलाचे आहे. आपले भाग्य आहे की, असे महान पुरुष आपल्या मातीत जन्माला आले आहेत. त्यांनी ज्या भूमीतून इतिहास घडवला, अशा स्थळांचा विकास होणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांच्या जन्मस्थळाचा विकास करतांना तरुणांना त्यांचे बलिदान नेहमीच स्मरणात राहील, असे वीरता आणि शूरता यांचे, तसेच ऊर्जा देणारे स्मारक उभारण्यात येईल, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे केले.
लवकरच राजगुरूनगर येथे प्रत्यक्ष स्मारकाच्या जागेला समितीसह भेट देणार आहे. स्मारकाच्या पुढील योजनेला लवकरच आकार देण्यात येईल. pic.twitter.com/0tsJoUwZUS
— Sudhir Mungantiwar (@SMungantiwar) March 17, 2023
१७ मार्च या दिवशी मंत्रालयीन दालनात हुतात्मा शिवराम हरी राजगुरु जन्मस्थळ परिसराचा विकास होण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या बैठकीस दूरदृष्यप्राणालीद्वारे प्रधान सचिव विकास खारगे, पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, तसेच या समितीचे सदस्य उपस्थित होते.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात