भारतातील आणि भारताबाहेरील खलिस्तानी चळवळ शासनकर्त्यांनी समूळ नष्ट करावी, ही राष्ट्रप्रेमींची अपेक्षा !
वारिस पंजाब दे’ या संघटनेचा प्रमुख खलिस्तानी अमृतपाल सिंह याला पकडण्यासाठी पंजाबमध्ये अभूतपूर्व शोधमोहीम चालू आहे. राज्यातील इंटरनेट सेवा २० मार्चपर्यंत बंद करण्यात आल्या आहेत. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या १५ हून अधिक तुकड्या पंजाबमध्ये आल्या आहेत. संपूर्ण पंजाबला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. ‘जालंधर येथे पंजाब पोलिसांनी केलेल्या कारवाईत त्याला अटक झाली’, अशा बातम्या १८ मार्चला रात्री माध्यमांमध्ये होत्या; मात्र काही वेळेनंतर ‘अटकेचे प्रयत्न चालू आहेत’, ‘अद्याप अटक झालेली नाही’, अशा बातम्या माध्यमांमध्ये आल्या. या वेळी पोलीस आणि अमृतपाल सिंहचे साथीदार यांच्यात झालेल्या चकमकीमध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत करण्यासह ७८ जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने अमृतपालला आर्थिक साहाय्य पुरवणार्यासह आणखी ४ जणांना अटक केली आहे. एका खलिस्तानवाद्याला नेस्तनाबूत करण्यासाठी पंजाब पोलिसांनी केंद्राच्या साहाय्याने हाती घेतलेली मोहीम ही चांगली घटना आहे. या वेळी पोलिसांनी ‘अमृतपाल सिंहला लवकरच अटक करू’, असा विश्वास दाखवला आहे.
खलिस्तान्यांच्या मुठीत पंजाब
खलिस्तान हे पाकच्या पैशांवर पोसलेले भारताविरुद्धचे एक षड्यंत्र आहे. केवळ भारताला अस्थिर आणि अशांत ठेवण्यासाठीच पाकच्या आय.एस्.आय. या संघटनेने निर्माण केलेले हे भूत आहे. घरभेदींना धरून आणि त्यांना पैशांची लालूच दाखवण्यात येऊन भारतविरोधी कारवाया करण्यासाठी चिथावण्यात येत आहे. पंजाबमध्ये पोलिसांसमोर ‘खलिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देण्यात येतात. खलिस्तानच्या समर्थनार्थ फेर्या काढण्यात येतात. त्यामुळे तेथे उघड उघड खलिस्तानचे समर्थन करण्याचे प्रकार चालू आहेत. खलिस्तानवादी जनतेमध्येच रहात असल्यामुळे त्यांना ओळखणेही अवघड आहे.
खलिस्तानसाठी अनेक संघटना कार्यरत आहेत. अमृतपाल सिंह ज्या संघटनेचा प्रमुख आहे, ती खलिस्तानी समर्थक जर्नेलसिंह भिंद्रनवाले याच्याशी संबंधित आहे. सुवर्ण मंदिरात दडून बसलेल्या याच भिंद्रनवालेला इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधानपदी असतांना भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ राबवत ठार मारले होते. खलिस्तानी चळवळ त्यानंतरही फोफावत गेली. आता खलिस्तानी पाकमध्ये बसून भारतविरोधी कारवाया करत आहेत, तर काही जण कॅनडा येथून कार्यरत आहेत.
नेभळट पंजाब पोलीस
पंजाब पोलिसांची यापूर्वीची भूमिका पाहिली, तर ती अतिशय नेभळट आणि घाबरट अशी होती. पोलिसांनी खलिस्तानवाद्यांपुढे नांगी टाकल्याचे चित्र होते. अगदी काही दिवसांपूर्वी पंजाबमधील अजनाला पोलीस ठाण्यावर आक्रमण करून खलिस्तानवाद्यांनी त्यांच्या साथीदारांची सुटका केली होती. या वेळी पोलीस अधिक संख्येत असूनही त्यांनी खलिस्तानवादी जमावाला विशेष विरोध केला नाही. पोलिसांची शस्त्रेही आक्रमणकर्त्यांनी पळवली. खलिस्तानवाद्यांचे एका पोलीस ठाण्यावर आक्रमण ही गोष्ट केवळ पंजाबसाठीच नव्हे, तर संपूर्ण देशासाठी धक्कादायक होती. यामुळे खलिस्तानवाद्यांचे मनोबल वाढले.
त्यापूर्वी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या हत्येची अमृतपाल सिंहने जाहीर धमकी दिली होती. कॅनडास्थित खलिस्तानवाद्यांनी ‘पंजाब आणि हरियाणा हे भारताचा भाग नसून ते खलिस्तानचा भाग झाले आहेत’, असे घोषित केले. तसेच ‘पंजाब आणि हरियाणा येथील हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या करू’, अशीही धमकी दिली होती. खलिस्तानवाद्यांवर पंजाबच्या कणाहीन शासनकर्त्यांमुळे कुठलाही अंकुश नसल्यासारखे होते. भगवंत मान यांना जिवे मारण्याची धमकी मिळाल्यावर त्यांनी लागलीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे धाव घेतली आणि नंतर घडलेल्या या सर्व घडामोडी आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. या वेळी अमित शहा यांनी पंजाब पोलिसांच्या साहाय्याला केंद्रीय राखीव पोलीस दल दिल्यामुळे पंजाब पोलिसांचे मनोधैर्य वाढले आहे. काल-परवा पोलिसांना न घाबरणारे खलिस्तानवादी आता अटकेच्या भीतीमुळे पसार झाले आहेत, लोकांना पोलिसांपासून वाचवण्याची भाषा करत आहेत, हे चांगले लक्षण आहे. देहलीत शेतकरी आंदोलनाच्या वेळी लाल किल्ल्यावर तिरंगा काढून खलिस्तानचा ध्वज फडकावण्याचे दु:साहस खलिस्तानवाद्यांनी केले, तेव्हाच खरे तर पंजाबमध्ये घुसून खलिस्तानी चळवळीचा बीमोड केला पाहिजे होता. असो. ‘आताही प्रभावीपणे मोहीम राबवून खलिस्तानी चळवळ मुळासह नेस्तनाबूत करावी’, अशी भारतियांची अपेक्षा आहे.
विदेशी खलिस्तानवाद्यांना ठेचा !
देशात ज्याप्रमाणे खलिस्तानचे समर्थक, हस्तक, अर्थपुरवठादार आहेत, तसे विदेशातही आहेत. अगदी काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियातील मंदिरात आयोजित केलेल्या कीर्तनात भारतीय हिंदु कीर्तनकाराला बोलावल्यामुळे आयोजकांना धमकावण्यात आले. तेथे भारताच्या राष्ट्रध्वजाचा अवमान करण्यात आला. कॅनडामध्ये ‘सीख फॉर जस्टिस’चा गुरुपतवंतसिंह पन्नू हा सातत्याने भारताला धमकावत आहे, स्वत:च्या शक्तीच्या फुशारक्या मारत आहे. अशांना भारत सरकारने इस्रायलप्रमाणे कठोर नीती अवलंबत विदेशात जाऊन धडा शिकवणे आवश्यक आहे. भारतातील आणि भारताबाहेरील खलिस्तानवाद्यांची नांगी ठेचल्यास उर्वरित घरभेद्यांना एक निर्णायक संदेश जाईल. भारत त्याच्या शत्रूंवर कधीही आणि कुठेही कारवाई करू शकतो, याची एकदा का जरब बसली, तर भारतविरोधी कारवाया, वक्तव्ये करण्यास संबंधित १० वेळा विचार करतील. यासाठी शासनकर्त्यांनी खलिस्तानवाद्यांना लवकरात लवकर नष्ट करावे, ही अपेक्षा !
स्रोत: दैनिक सनातन प्रभात