Menu Close

वर्ष २०२५ चा गुढीपाडवा हिंदु राष्‍ट्रात साजरा करू – सुनील घनवट, महाराष्‍ट्र आणि छत्तीसगड राज्‍य संघटक, हिंदु जनजागृती समिती

खोपोली (रायगड) येथील हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेत पंचक्रोशीतील धर्मप्रेमींचा सहभाग !

डावीकडून दीपप्रज्‍वलन करतांना ह.भ.प. कृष्‍णाजी महाराज लांबे,सुनील घनवट, सौ. धनश्री केळशीकर आणि प्रसाद वडके

खोपोली – भारताची फाळणी धर्माच्‍या आधारावर झाली, मग हे राष्‍ट्र निधर्मी कसे ? हिंदु राष्‍ट्र असतांना भारताला ‘सेक्‍युलर’ (निधर्मी) घोषित करण्‍यात आले. धार्मिक अधिष्‍ठान असलेले राष्‍ट्र निधर्मी असू शकत नाही. हिंदु राष्‍ट्र हा आपला जन्‍मसिद्ध अधिकार आहे. देशाची वाटचाल हिंदु राष्‍ट्राकडे होत आहे. वर्ष २०२५ चा गुढीपाडवा आपण हिंदु राष्‍ट्रात साजरा करू, असा विश्‍वास हिंदु जनजागृती समितीचे महाराष्‍ट्र आणि छत्तीसगड संघटक श्री. सुनील घनवट यांनी खोपोली येथील हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेत व्‍यक्‍त केला. या सभेला खोपोली शहर आणि ग्रामीण पंचक्रोशीतील १ सहस्र ५०० हिंदु धर्मप्रेमी उपस्‍थित होते.

सभेला उपस्‍थित धर्मप्रेमी

समिती आणि समस्‍त धर्मप्रेमी यांच्‍या वतीने येथील श्री समर्थ मंगल कार्यालयात या सभेचे आयोजन करण्‍यात आले होते. या वेळी व्‍यासपिठावर सनातन संस्‍थेच्‍या सौ. धनश्री केळशीकर, समितीचे श्री. प्रसाद वडके उपस्‍थित होते. कोकण धर्मशाळेचे (देवाची आळंदी) संस्‍थापक आणि अध्‍यक्ष गुरुवर्य ह.भ.प. कृष्‍णाजी महाराज लांबे यांच्‍या शुभहस्‍ते सभेच्‍या प्रारंभी दीपप्रज्‍वलन झाले. श्री. राजेंद्र पावसकर यांनी समितीच्‍या कार्याविषयी माहिती दिली. सनातनच्‍या धर्मप्रचारक सद़्‍गुरु (कु.) अनुराधा वाडेकर, पू. (सौ.) संगीता जाधव यांची वंदनीय उपस्‍थिती सभेला लाभली. वेध सह्याद्री गडदुर्ग संवर्धन, श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थान, वारकरी संप्रदाय, श्री संप्रदाय आदी विविध संघटनांचे कार्यकर्ते-पदाधिकारी, संप्रदायांचे प्रतिनिधी यांसह पंचक्रोशीतील सरपंच-उपसरपंच, पंचायत समिती सदस्‍य आणि विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी या सभेला उपस्‍थित होते.

ह.भ.प. कृष्णाजी महाराज लांबे यांचा समितीच्या वतीने सन्मान

सुनील घनवट म्‍हणाले, ‘‘उल्‍हासनगर येथे सिंधी समाजातील लोकांचे मोठ्या प्रमाणात धर्मार्ंतर करण्‍यात आले आहे. एका ख्रिस्‍ती मिशनरीच्‍या आकडेवारीनुसार भारतात प्रतिवर्षी १८ लाख २५ सहस्र हिंदूंचे धर्मांतर केले जाते. हे रोखण्‍यासाठी समाजाला धर्मशिक्षण देणे आवश्‍यक आहे. देशात भूमी जिहाद चालू आहे. गडांवर धर्मांधांद्वारे अतिक्रमण होत आहेत, हे सर्व रोखण्‍यासाठी हिंदूंनी वेळीच संघटित होणे आवश्‍यक आहे.’’

हिंदु राष्‍ट्राची चळवळ पुढेनेण्‍यासाठी आध्‍यात्मिक बळ आवश्‍यक ! – सौ. धनश्री केळशीकर, सनातन संस्‍था

स्‍वत:मध्‍ये आध्‍यात्‍मिक बळ निर्माण करण्‍यासाठी भगवंताचे अधिष्‍ठान हवे. शारीरिक आणि मानसिक बळापेक्षा आध्‍यात्‍मिक बळ श्रेष्‍ठ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनीही तुळजाभवानीची उपासना करून हिंदवी स्‍वराज्‍याची स्‍थापना केली. आपणही धर्माचरण करून आध्‍यात्‍मिक बळ वाढवणे आवश्‍यक आहे. हिंदु राष्‍ट्राची चळवळ पुढे नेण्‍यासाठी आध्‍यात्‍मिक बळ आवश्‍यक आहे.

हिंदु राष्‍ट्राची मागणी राज्‍यघटनेला अनुसरूनच ! – प्रसाद वडके, हिंदु जनजागृती समिती

स्‍वातंत्र्यानंतर राज्‍यघटनेमध्‍ये १०० हून अधिक पालट करण्‍यात आले. राज्‍यघटनेत ‘सेक्‍युलर’ शब्‍द घालण्‍यात आला, तर ‘हिंदु राष्‍ट्र’ हा शब्‍द का घालू शकत नाही ? आणखी एक पालट करून भारत हे ‘हिंदु राष्‍ट्र’ म्‍हणून घोषित करावे. हिंदु राष्‍ट्राची मागणी राज्‍यघटनेला अनुसरूनच आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *