Menu Close

उज्जैन सिंहस्थातील अंतिम अमृत स्नान उत्साहात !

Amrut-Snan-Ujjain
क्षिप्रा नदीत तिसरे अमृत स्नान करतांना नागा साधू

उज्जैन – येथील हिंदूंच्या वैश्‍विक सिंहस्थपर्वातील तिसरे आणि शेवटचे अमृत (शाही) स्नान आज कृतज्ञतेच्या वातावरणात संपन्न झाले. शंकराचार्य, संत, महात्मे आणि साधू यांच्या चरणस्पर्शाने पावन झालेल्या क्षिप्रामाईने जणू सर्व भक्तांना प्रेमाने आपल्या कुशीत घेऊन त्यांच्यावर चैतन्याची उधळण केली. भाविकांनी चैतन्याने ओले चिंब होत क्षिप्रा मैयाकी जय, जय जय महाकाल अशी क्षिप्रामाईविषयी कृतज्ञता व्यक्त करत होते. पहाटे ३ वाजल्यापासून हर हर महादेव, जय जय महाकालचा जयघोष करत सर्व शैव आणि वैष्णव यांच्या १३ आखाड्यांनी तिसरे अमृत स्नान केले. यात नागा संन्यासी, आखाड्यांचे प्रमुख, महंत, महामंडलेश्‍वर, संत आणि अन्य साधू सहभागी झाले होते.

१. अमृत स्नानाचा प्रारंभ दत्त आखाडा घाटावर शैव पंथांचे जुना आखाड्याचे पीठाधीश्‍वर महंत स्वामी अवधेशानंदगिरी महाराज यांच्यासह सहस्रो नागा साधूंच्या स्नानाने झाला. त्याच वेळी दुसर्‍या तीरावर अर्थात् रामघाटावर वैष्णव पंथीय निर्वाणी अनी आखाड्याने झाला. या वेळी जय जय सियाराम, जय श्रीरामचा जयघोष करत अमृत स्नान केले.

२. त्यानंतर निर्मोही आणि दिगंबर आखाडे स्नानासाठी आले. दत्त आखाडा घाटावर आवाहन, अग्नि, आनंद, निरंजनी, अटल शंभू, तर रामघाटावर बडा उदासिन, नया उदासिन आणि निर्मल आखाड्यांनी अमृत स्नान केले. क्षिप्रा नदीच्या दोन्ही तिरांवर साधू-संत उत्साहपूर्वक स्नान करून अलौकिक आंनद घेतला. स्नानासाठी येतांना हत्ती, घोडे, उंट, रथ यांच्यावर स्वार होऊन शंखनाद करत संत-महात्मे येत होते. हातात तलवारी, भाले, त्रिशूल, परशू, डमरू, वाद्ये घेऊन नागासाधू आले होते. स्नान झाल्यावर नागासाधूंनी सर्वांगाला भस्मलेपन करून घाटावर ध्यानमग्न झाले होते. या वेळी मध्यप्रदेशचे प्रभारीमंत्री भूपेंद्र सिंह यांनी सर्व आखाड्यांचे पुष्पहार घालून स्वागत केले.

३. उज्जैन कुंभमध्ये पहिल्या-दुसर्‍या अमृत स्नानानंतर २५ लक्ष लोक प्रतिदिन येत असल्याची पोलिसांची माहिती होती. २० मे या दिवसापर्यंत ५ कोटींहून अधिक लोक आल्याचा दावा शासनाने केला होता. त्यामुळे शेवटच्या दिवशी अर्थात २१ मे या दिवशी सर्वाधिक लोक स्नानासाठी येऊन हा आकाडा ७ कोटीपर्यंत पोहोचेल, असा विश्‍वास मंत्री भूपेंद्र सिंह यांनी व्यक्त केले आहे.

४. अनेक ठिकाणी पोलिसांनी नागरिकांना मुख्य घाटावर येणारे मार्ग काही ठिकाणी बंद करून दुपारी २ नंतर नागरिकांना सोडणार, असे सांगून जनतेची अडवणूक केली.

५. सर्व स्नानामध्ये स्वामी परमहंस नित्यानंद यांची शोभायात्रा आणि स्नान सर्वांत उठून दिसत होते. अत्यंत श्रद्धेने आणि भक्तीने त्यांचे भक्त स्नान करत होते. चालतांना नामजप आणि शिस्त होती. त्यांच्या यात्रेत ४५ देशांतून आलेले विदेशी नागरिक सहभागी झाले होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *