|
वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक दैनिक सनातन प्रभात
मुंबई – प्रभु श्रीराम यांच्यावर आधारित ‘आदिपुरुष’ या आगामी चित्रपटाच्या भित्तीपत्रकात प्रभु श्रीराम आणि लक्ष्मण यांना जानव्याअभावी, तर सीतामातेला तिच्या भांगामध्ये कुंकवाअभावी दाखवण्यात आले आहे. त्यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्यावरून संजय तिवारी नावाच्या व्यक्तीने सदर चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकार यांच्या विरोधात साकीनाका पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे. तिवारी यांनी अधिवक्ता आशिष राय आणि अधिवक्ता पंकज मिश्रा यांच्यामाध्यमातून ही तक्रार केली आहे. हा प्रकार जाणीवपूर्वक करण्यात आल्याचा आरोप तिवारी यांनी तक्रारीत केला आहे.
श्रीरामनवमीच्या दिवशी ‘आदिपुरुष’ या चित्रपटाचे भित्तीपत्रक प्रसारित करण्यात आले. या चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत, तर निर्माते भूषणकुमार हे आहेत. चित्रपटात ‘रामचरितमानस’मधील ज्या व्यक्तीरेखा निर्मात्यांनी घेतल्या आहेत, त्यांचे चुकीचे चित्रण करण्यात आले आहे. त्यामुळे हिंदु धर्मियांच्या भावना दुखावल्याप्रकरणी भादंवि २९५(अ), २९८, ५०० आणि ३४ अन्वये गुन्हा नोंदवण्यात यावा, अशी मागणी तिवारी यांनी केली आहे.
या चित्रपटाचा ‘ट्रेलर’ (चित्रपटाचा संक्षिप्त भाग) वर्ष २०२२ च्या शेवटी प्रसारित करण्यात आला होता, तसेच चित्रपटाच्या प्रदर्शनाचा दिवसही घोषित करण्यात आला होता; मात्र ‘टे्रलर’मध्ये पात्रांना आधुनिक पद्धतीमध्ये, तसेच रावणाला मोगल आक्रमकाप्रमाणे दाखवल्याच्या कारणावरून सामाजिक माध्यमांवर या चित्रपटावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाचा दिनांक पुढे ढकलण्यात आला होता. आता १६ जून या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.