Menu Close

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला बळ मिळण्यासाठी श्री हनुमान जयंतीनिमित्त देशभरात 800 ठिकाणी गदापूजन !

हिंदूंमध्ये शौर्य जागरण करण्यासाठी गदापूजन आवश्यक ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

हिंदूंचा इतिहास हा शौर्यचा आणि पराक्रमाचा आहे; मात्र कित्येक वर्ष सशस्र लढा देऊन मिळवलेल्या स्वातंत्र्यानंतर ‘दे दी हमे आजादी बिना खड्ग बिना ढाल…’ अशा प्रकारे खोटा संदेश देऊन हिंदूंच्या भावी पिढ्यांना शौर्यापासून वंचित केले जात आहे. गेल्या 75 वर्षांत हिंदूंचे शौर्य जागृत होईल, असे कार्यक्रम होतांना दिसत नाहीत. या दृष्टीनेच हिंदूंमध्ये शौर्यजागरण व्हावे आणि प्रभु श्रीरामांच्या कृपेने रामराज्य अर्थात हिंदु राष्ट्र-स्थापनेला बळ मिळावे, यासाठी श्री हनुमान जयंतीच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने देशभरात 800 ठिकाणी ‘गदापूजन’ करण्यात आले.

या वेळी शंखनादाने कार्यक्रमाला आरंभ करण्यात आला. त्यानंतर सामूहिक प्रार्थना, ‘गदापूजन’ विधी, श्री हनुमानाची आरती, स्तोत्र आणि ‘श्री हनुमते नम:’ हा सामूहिक नामजप करण्यात आला. तसेच ‘धर्मसंस्थापनेसाठी मारुतीरायांचे गुण कसे आत्मसात करावेत’ याविषयी मार्गदर्शनही करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रतिज्ञा’ करण्यात आली.

हिंदूंच्या प्रत्येक देवतेचे रुप पाहिले असता, देवतेचा केवळ एक हात आशीर्वाद देणारा, तर अन्य सर्व हातांमध्ये विविध प्रकारची अस्त्रे-शस्त्रे आहेत. त्या दृष्टीने देवतांच्या शस्त्रांचे पूजन केल्यास हिंदूंमध्ये शौर्य जागृत होण्यास साहाय्य होईल. या वर्षी श्रीरामनवमीच्या मिरावणुकांवरती अनेक राज्यांत भीषण आक्रमणे झाली. हिंदूंना लक्ष्य करून हिंदूंचे खच्चीकरण करण्यात आले आहे. या गदापूजनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा हिंदूंना बळ मिळावे. हिंदूंमधील शौर्य हे धगधगत राहावे, यासाठी सण-उत्सवाच्या वेळी प्रतिकात्मक शस्त्रपूजन झाले पाहिजे, अशी या कार्यक्रमामागील भूमिका हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी या वेळी मांडली.

समर्थ रामदासस्वामींनी स्थापन केलेल्या 11 मारुतीच्या ठिकाणीही गदापूजन करण्यात आले. यांसह महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, संभाजीनगर, नाशिक, धुळे, जळगाव, नागपूर आणि अमरावती; कर्नाटकात बागकोट, धारवाड, शिवमोग्गा, उडुपी, दक्षिण कन्नड, म्हैसूर, तुमकूर, बेंगळुरू आणि बेळगांव; गोव्यात फोंडा आणि साखळी; उत्तर प्रदेशात मधुरा यांसह दिल्ली आणि राजस्थान येथेही सामूहिक ‘गदापूजन’ उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमांना संतांची वंदनीय उपस्थिती लाभली, तसेच विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने युवावर्ग उपस्थित होता.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *