Menu Close

कलियुगात ‘नामस्मरण’ ही सर्वश्रेष्ठ साधना आहे ! – सौ. राजश्री देशमुख, हिंदु जनजागृती समिती

लातूर येथे ‘वेद प्रतिष्ठान’च्या वतीने आयोजित कार्यक्रमात ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयी व्याख्यान !

सौ. राजश्री देशमुख यांचा सत्कार करतांना डॉ. (सौ.) माया कुलकर्णी

लातूर – अनेकजण पंचज्ञानेंद्रिय, मन आणि बुद्धी यांद्वारे मिळणार्‍या सुखालाच आनंद समजतात; पण खरा आनंद हा अध्यात्माचे आचरण केल्यानेच प्राप्त होतो. जीवनातील ८० टक्के समस्यांचे मूळ कारण हे आध्यात्मिक असते. त्यामुळे समस्या दूर करण्यासाठी आध्यात्मिक उपाय म्हणजे ‘साधना’च आवश्यक असते. सध्या कलियुगात ‘नामस्मरण’ ही सर्वश्रेष्ठ साधना आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या सौ. राजश्री देशमुख यांनी केले. १ एप्रिल या दिवशी ‘वेद प्रतिष्ठान’च्या वतीने कै. गुरुशांतप्पा नागप्पा लातुरे स्मृती सभागृह येथे आयोजित ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावरील व्याख्यानात त्या बोलत होत्या. ‘वेद प्रतिष्ठान’च्या अध्यक्षा डॉ. (सौ.) माया कुलकर्णी यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

या वेळी सौ. राजश्री देशमुख यांनी पितृदोषाच्या निवारणासाठी दत्ताचा नामजप का करावा ? येणार्‍या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी साधनेचे बळ कसे वाढवावे ? याविषयी अवगत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. वैशाली दुरुगकर यांनी केले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली.

कार्यक्रमात बोलतांना सौ. राजश्री देशमुख आणि उपस्थित वेद प्रतिष्ठानचे कार्यकर्ते

अध्यात्माविषयीची सूत्रे आम्हाला दीपस्तंभाप्रमाणे वाटली ! – डॉ. (सौ.) माया कुलकर्णी

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी अध्यक्षा डॉ. (सौ.) माया कुलकर्णी म्हणाल्या, ‘‘प्रत्येकाने स्वतःच्या धर्माचे आचरण हे करायलाच हवे. आजच्या मार्गदर्शनातील काही सूत्रे आम्हाला अध्यात्मातील दीपस्तंभाप्रमाणे वाटली. आम्ही अध्यात्माविषयीच्या मार्गदर्शनानुसार आचरण करण्याचा प्रयत्न करू.’’

क्षणचित्रे – काही महिलांनी साधना करतांना येणार्‍या अडथळ्यांविषयी उत्स्फूर्तपणे प्रश्न विचारून शंकानिरसन करून घेतले.

स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *