राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला धर्मांध ठरवण्याचे षड्यंत्र !
मुंबई – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बनावट ‘लेटरहेड’ सिद्ध करून प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या नावे मुसलमान मुलींना हिंदु धर्मात आणण्याचे आवाहन करणारे बनावट पत्र सामाजिक माध्यमांवरून प्रसारित करण्यात आले आहे. ‘लव्ह जिहाद’मध्ये ज्या प्रमाणे हिंदु युवतींना धर्मांध मुसलमानांकडून फसवले जाते, त्याप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने येनकेन प्रकारेण मुसलमान युवतींना हिंदु धर्मात आणण्याचे आवाहन केले असल्याचा अपप्रचार या पत्रात करण्यात आला आहे.
या पत्रामध्ये मुसलमान मुलींना आकर्षित करण्याच्या विविध क्लृप्त्या देण्यात आल्या आहेत. मुसलमान युवतींना प्रेमाच्या जाळ्यात फसवणे, विवाहपूर्व शारीरिक संबंध प्रस्थापित करणे आणि त्यांच्याशी विवाह करणे, असे आवाहन या पत्रात करण्यात आले आहे. यामध्ये आवश्यक कायदेविषयक आणि भौतिक साहाय्य देण्याचे, तसेच विवाहानंतर ५ लाख रुपये देण्यात येतील, असे नमूद करण्यात आले आहे. हे सर्व प्रकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या नावे खपवण्यात आले आहेत. या पत्राची प्रत अखिल भारतीय हिंदु समाज, बजरंग दल, हिंदु सेना, हिंदु युवा वाहिनी आणि समस्त हिंदु समाज यांना पाठवण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. ‘ट्विटर’वर ‘#bhagwalovetrap’ या ‘हॅशटॅग’च्या (एकाच विषयावर चर्चा घडवून आणण्याच्या) माध्यमातून हे बनावट पत्र प्रसारित करण्यात आले आहे.
हा आमची अपकीर्ती करण्याच प्रयत्न ! – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नावाने इंटरनेटवर मोठ्या प्रमाणावर प्रसारित केले जाणारे पत्र खोटे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अपकीर्ती करण्याच हा प्रयत्न आहे. असे कोणतेही पत्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून प्रसारित करण्यात आलेले नाही किंवा कोणत्याही बैठकीत त्या सूत्रांवर चर्चा झालेली नाही. ‘लेटरहेड’ स्कॅन करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नावाने हे बनावट पत्र सिद्ध केले असण्याची शक्यता आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सह प्रचारप्रमुख श्री. नरेंद्रकुमार यांनी व्यक्त केली आहे.
स्रोत : दैनिक सनातन प्रभात