Menu Close

भारतात मुसलमानांवर अत्याचार होत असते, तर त्यांची लोकसंख्या वाढली असती का ?

वॉशिंग्टन (अमेरिका) – भारतात मुसलमान असुरक्षित आहेत, हे चित्र अशा लोकांनी निर्माण केले आहे, जे कधी भारतातही आले नाहीत. भारतात मुसलमानांच्या विरोधात हिंसाचार झाला असता, तर त्यांची लोकसंख्या एवढी वाढली असती का ? जगातील दुसर्‍या क्रमांकाची मुसलमानांची लोकसंख्या भारतात आहे, असे विधान भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी येथील ‘पीटरसन इन्स्टिट्यूट फॉर इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स’च्या संवादात भारतातील आर्थिक वाढीविषयी बोलतांना केले.

१.  इन्स्टिट्यूट फॉर इंटरनॅशनल इकॉनॉमिक्सचे अध्यक्ष अ‍ॅडम पोसेन यांनी प्रश्‍न विचारला की, भारताविषयीच्या काही धारणा गुंतवणुकीवर परिणाम करत आहेत का ? यावर सीतारामन् म्हणाल्या की, याचे उत्तर त्या गुंतवणूकदारांकडून मिळू शकते, जे भारतात आले आहेत आणि येत आहेत. जर कुणाला गुंतवणूक करायची असेल, तर मला एवढेच सांगायचे आहे की, भारतात काय होत आहे ते पहा. अशा लोकांची मते ऐकू नका जे कधीही भारताच्या भूमीत आलेले नाहीत; पण तरीही भारताविषयी मत व्यक्त करत असतात.

२. अर्थमंत्री सीतारामन् पुढे म्हणाल्या की, पाकिस्तानमधील अल्पसंख्याकांची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. त्यांची संख्या दिवसेंदिवस अल्प होत आहे. त्यांच्यावर किरकोळ आरोप केले जातात आणि त्यांना फाशीची शिक्षाही दिली जाते. बहुतांश घटनांमध्ये ईशनिंदा ही वैयक्तिक सूड उगवण्यासाठी केली जात आहे. अशा प्रकरणात पीडितांना तात्काळ दोषी ठरवले जाते. त्यांचे ना अन्वेषण व्यवस्थित होते, ना न्यायालयात खटला चालवला जातो.’

३. अर्थमंत्री निर्मला सीतारामन् म्हणाल्या की, जेव्हा भारताची फाळणी झाली, तेव्हा पाकिस्तानचीही निर्मिती झाली. पाकिस्तानने स्वतःला ‘इस्लामी देश’ घोषित केले. त्या वेळी ‘अल्पसंख्यांकांना संरक्षण दिले जाईल’, असेही सांगितले. आज तेथे सर्वच अल्पसंख्यांक समुदायांची संख्या अल्प होत आहे. ते मारले जात आहेत, तेथे काही मुसलमान वर्गही आहेत, ज्यांना मारले जात आहे. मुहाजिर, शिया आणि मुख्य प्रवाहात न स्वीकारण्यात आलेल्या प्रत्येक वर्गाविरुद्ध हिंसाचार होत आहे. दुसरीकडे तुम्हाला भारतात दिसेल की, मुसलमान त्यांचे व्यवसाय करत आहेत, तर त्यांची मुले शिक्षण घेत आहेत. सरकार त्यांना शिष्यवृत्ती देत आहे. जर संपूर्ण भारतभर मुसलमानांच्या विरोधात हिंसाचार झाला असता, तर त्यांना त्याचा फटका बसला असता. त्यामुळे हे चुकीचे विधान आहे, हे स्पष्ट आहे. भारतात मुसलमानांची लोकसंख्या अल्प  झाली आहे का ? कोणत्याही एका समुदायातील मृत्यूचे प्रमाण तरी वाढले आहे का ? जे असे अहवाल प्रसिद्ध करतात, त्यांना मी भारतात येऊन त्यांचे म्हणणे सिद्ध करण्याचे आवाहन करते.’

स्रोत : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *