Menu Close

कुख्यात गुंड अतिक अहमद याचा मुलगा असद पोलीस चकमकीत ठार

उत्तरप्रदेशमधील कुख्यात गुंड अतिक अहमद (उजवीकडे) याचा मुलगा असद (डावीकडील) हा पोलीस चकमकीत ठार

झाशी ( उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशमधील कुख्यात गुंड अतिक अहमद याचा मुलगा असद हा पोलीस चकमकीत ठार झाला. त्याच्यासह गुलाम नावाचा गुंडही मारला गेला आहे. उत्तरप्रदेशच्या विशेष कृती दलाने झाशी येथे ही कारवाई केली. हे दोघेही जण उमेश पाल हत्याकांडातील पसार आरोपी होते. त्यांच्यावर प्रत्येकी ५ लाख रुपयांचे बक्षिस होते. उमेश पाल हत्याकांडातील उस्मान आणि अरबाज यांनाही यापूर्वीच पोलिसांनी चकमकीत ठार केले आहे. आणखी एक आरोपी बमबाज गुड्डू मुस्लिम याला पोलिसांनी घेरले असल्याचे वृत्त आहे. असद आणि गुलाम हे अतिक याला घेऊन जाणार्‍या पोलिसांच्या ताफ्यावर आक्रमण करून त्याची सुटका करण्याच्या प्रयत्नात होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. या दोघांकडून विदेशी बनावटीची पिस्तुले जप्त करण्यात आली.

२४ फेब्रुवारी २०२३ या दिवशी उमेश पाल यांची त्यांच्या घरात घुसून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. उमेश पाल हे राजू पाल हत्याकांडातील एकमेव साक्षीदार होते. राजू पाल यांच्या हत्येच्या प्रकरणी अतिक याला अटक करण्यात आलेली आहे. अतिक आणि त्याचा भाऊ अश्रफ, पत्नी शाईस्ता यांच्यावर उमेश पाल हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे.

अश्रफ याला अटक करण्यात आलेली आहे. पत्नी शाईस्ता पसार आहे. अतिकचा मोठा मुलगा उमर हा लक्ष्मणपुरी येथील, तर दुसर्‍या क्रमांकाचा अली हा नैनी येथील कारागृहात अटकेत आहे. ४ आणि ५ क्रमांकांचे अल्पवयीन मुले बालसुधारगृहात आहेत.

मुलाला ठार केल्याची माहिती मिळाल्यावर रडू लागला अतिक !
प्रयागराज – अतिक अहमद याला येथील न्यायालयात खटल्याच्या प्रकरणी उपस्थित करण्यात आले होते. त्या वेळी त्याला त्यांच्या मुलाला पोलिसांनी चकमकीत ठार केल्याची माहिती दिल्यावर तो भूमीवर बसला आणि रडू लागला. त्याच्या समवेत उपस्थित त्याचा गुंड भाऊ अश्रफ याने अतिकला संभाळले. या वेळी न्यायालयात उपस्थित अधिवक्ते आणि नागरिक यांनी ‘योगी आदित्यनाथ झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या.

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांचा थयथयाट !

(म्हणे) ‘या चकमकीची चौकशी करण्यात यावी !’

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी या चकमकीविषयी एक ट्वीट करत त्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

यादव यांनी म्हटले आहे, ‘खोट्या चकमकी घडवून भाजप सरकार खर्‍या सूत्रांवरील लक्ष दुसरीकडे भरकटवत आहे. भाजपवाल्यांचा न्यायालयावर विश्वास नाही. आजची आणि नुकत्याच झालेल्या चकमकी यांची सखोल चौकशी झाली पाहिजे. दोषींना सोडू नये. योग्य आणि अयोग्य यांचा निर्णय घेण्याचा अधिकार सत्ताधार्‍यांना असत नाही.

खुन्यांनी शिक्षा होणे अपेक्षित होते ! – उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य

उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य म्हणाले की, खुन्यांना शिक्षा होणे अपेक्षित होते. गुन्हेगारांसमवेत अशाच प्रकारे वागले पाहिजे.

आज मनाला शांतता लाभली ! – उमेश पाल यांची पत्नी जया पाल

न्यायाला प्रारंभ झाला आहे. जे झाले, ते चांगले झाले. आता मनाला शांतता मिळाली. अतिक यालाही चकमकीत ठार केले, तर खरा न्याय मिळेल.

योगीजी यांना धन्यवाद ! – उमेश पाल यांची आई शांतीपाल

आम्ही आधीपासूनच गुंडांना चकमकीत ठार करण्याची मागणी करत होतो. योगी आदित्यनाथ यांना धन्यवाद त्यांनी गुंडांना ठार केले. पोलिसांनी कर्तव्य पार पाडले. त्यांनी असेच केले पाहिजे.

स्रोत : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *