Menu Close

गौरी लंकेश यांच्या हत्येच्या प्रकरणात हिंदुत्वनिष्ठांच्या बाजूने खटला लढवणारे अधिवक्ता पी. कृष्णमूर्ती यांच्यावर गोळीबार !

  • आक्रमणातून थोडक्यात बचावले

  • गौरी लंकेश यांच्या हत्येच्या प्रकरणात हिंदुत्वनिष्ठांच्या बाजूने लढत आहेत खटला !

अधिवक्ता पी. कृष्णमूर्ती

बेंगळुरू – राज्यातील प्रसिद्ध हिंदुत्वनिष्ठ वकील आणि साम्यवादी पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या प्रकरणात गोवण्यात आलेल्या हिंदुत्वनिष्ठांच्या बाजूने खटला लढवणारे अधिवक्ता पी. कृष्णमूर्ती यांच्यावर प्राणघातक आक्रमण करण्यात आले. १२ एप्रिलच्या रात्री विश्‍व हिंदु परिषदेची बैठक संपवून ते मडिकेरी येथून चेट्टळ्ळी येथे जात असतांना अब्बीयालच्या जवळ ही घटना घडली. ते चारचाकी गाडीतून प्रवास करत असतांना आक्रमणकर्त्यांनी त्यांच्या दिशेने झाडलेली गोळी त्यांच्या गाडीला लागली. सुदैवाने त्यांना काही झाले नाही. मडिकेरी ग्रामीण पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन् यांनी घटनास्थळी भेट दिली. कोडगू पोलिसांनी अन्वेषण चालू केले आहे. अधिवक्ता पी. कृष्णमूर्ती हे विश्‍व हिंदु परिषदेचे कोडगु येथील जिल्हाध्यक्षही आहेत.

देवाचे कृपेने प्राण वाचले ! – पी. कृष्णमूर्ती

कोडगूचे पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करतील, याचा मला विश्‍वास आहे. गाडीला हानी झाली आहे; पण देवाच्या कृपेने मी थोडक्यात वाचलो.

मडिकेरी अधिवक्ता संघाच्या अधिवक्त्यांचे कामकाज थांबवून आंदोलन !

हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्याच्या मागे ठामपणे उभे राहाणारे अधिवक्ते हीच हिंदु धर्माची शक्ती !

या घटनेचा मडिकेरी अधिवक्ता संघाने तीव्र विरोध केला आहे. गोळीबार करणार्‍याला त्वरित अटक करण्याची मागणी करत अधिवक्त्यांनी कामकाज थांबवून न्यायालयासमोर आंदोलन केले. त्या नंतर अधिवक्ता संघाचे अध्यक्ष के.डी. दयानंद यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.

आक्रमणाच्या मागे ‘पी.एफ्.आय’ कि नक्षलवादी, याचा शोध घ्या ! – श्री. मोहन गौडा, कर्नाटक प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

गौरी लंकेश हत्येच्या प्रकरणात गोवण्यात आलेल्या हिंदुत्वनिष्ठांच्या बाजूने खटला लढवणार्‍या अधिवक्त्यावर प्राणघातक आक्रमण होणे, हे अत्यंत गंभीर आणि संशयास्पद आहे. गौरी लंकेश यांचा नक्षलवाद्यांशी संपर्क होता, असे त्यांनी स्वतः सांगितले होते, तसेच त्यांच्या मृत्यूनंतर नक्षलवाद्यांनीही निषेध व्यक्त केला होता. या पार्श्‍वभूमीवर हे आक्रमण म्हणजे ‘या प्रकरणातील अधिवक्त्यावर एकप्रकारे दबाव आणण्याचा प्रयत्नच आहे का ?’, अशी शंका येते. अधिवक्ता कृष्णमूर्ती हे या आक्रमणातून बचावले असले, तरी त्यांच्यावर पुन्हा आक्रमण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांना सशस्त्र पोलीस संरक्षण देण्याची आवश्यकता आहे. या पूर्वीही अधिवक्ता कृष्णमूर्ती यांना ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पी.एफ्.आय.) या आतंकवादी संघटनेकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यामुळे या आक्रमणामागे पी.एफ्.आय.सारखी जिहादी संघटना आहे कि गौरी लंकेश समर्थक शहरी नक्षलवादी आहेत, याचे अन्वेषण होणे अत्यावश्यक असल्याची मागणी हिंदु जनजागृती समितीचे कर्नाटक राज्याचे प्रवक्ते श्री. मोहन गौडा यांनी प्रसिद्धीपत्रक काढून केली आहे.

या आक्रमणाचा हिंदु जनजागृती समिती तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करते. ‘अधिवक्ता कृष्णमूर्ती यांचे कुणाशी वैर नव्हते. ते हिंदुत्वाच्या क्षेत्रातही सक्रीय आहेत. त्यामुळे याच कारणामुळे त्यांच्यावर आक्रमण झाल्याची दाट शक्यता आहे. यामागील ‘मास्टरमाइंड’चा शोध घ्यावा, अशी मागणी कर्नाटकचे पोलीस महासंचालक यांची भेट घेऊन त्यांच्याकडे करणार आहोत’, असेही श्री. गौडा यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

हा नेमका कुणाचा पराभव ? – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

आतंकवादी अजमल कसाब याच्या बाजूने खटला लढवणारे अधिकवक्ता आजही शांततेत जीवन जगत आहेत; मात्र साम्यवादी गौरी लंकेश यांच्या हत्येच्या प्रकरणात गोवण्यात आलेल्या हिंदुत्वनिष्ठांच्या बाजूने खटला लढवणार्‍या अधिवक्त्यांवर  प्राणघातक आक्रमण झाले आहे. हा नेमका कुणाचा पराभव आहे ? संविधान कुणाचे रक्षण करत आहे ? हिंदु विधीज्ञ परिषदेने या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घातले आहे.

स्रोत : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *