|
जमशेदपूर (झारखंड) – येथे झालेल्या धार्मिक हिंसाचाराच्या प्रकरणात हिंदुत्वनिष्ठांना अटक केल्याच्या प्रकरणात निवेदन सादर करण्यासाठी पोलीस अधीक्षकांना भेटायला गेलेल्या एका अधिवक्त्यासह ८ हिंदु कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर खुनाच्या प्रयत्नासह अवैध शस्त्रे आणि स्फोटके बाळगल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांना कारावासात पाठवण्यात आले आहे. जमशेदपूर पोलिसांच्या या कारवाईवर जिल्हा न्यायालयातील अधिवक्त्यांनी अप्रसन्नता व्यक्त केली आहे. याविषयी आंदोलनाची चेतावणीही त्यांनी दिली आहे.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार अधिवक्ता चंदन चतुर्वेदी यांच्या नेतृत्वाखाली हिंदु संघटनांचा एक गट जमशेदपूरच्या वरिष्ठ पोलीस अधीक्षकांना त्यांच्या कार्यालयात भेटायला गेला होता. अधिवक्त्याच्या म्हणण्यानुसार विश्व हिंदु परिषदेच्या काही कार्यकर्त्यांना कडमा येथून पोलिसांनी पकडून नेले होते. त्याविषयी निवेदन देण्यासाठी ते पोलीस कार्यालयात गेले होते. जमशेदपूर न्यायालयातील अधिवक्त्यांनी पोलिसांच्या या कारवाईवर अप्रसन्नता व्यक्त केली. अधिवक्त्यांनी न्यायालयात काम बंद पाडून ‘पोलीस प्रशासनाने शुद्धीवर यावे’ अशा घोषणा दिल्या. (पोलिसांची झुंडशाही ! रामनवमीच्या वेळी हिंसाचार घडवून दुकाने आणि वाहने यांची जाळपोळ करणारे धर्मांध मोकाट, तर त्याविषयी निवेदन देण्यासाठी गेलेल्या हिंदु संघटनांच्या कार्यकर्त्यांना मात्र अटक, हे संतापजनक ! – संपादक दैनिक सनातन प्रभात)
स्रोत : दैनिक सनातन प्रभात