Menu Close

बांगलादेशियांची घुसखोरी हा भारताला जडलेला कर्करोग ! – (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन

पुणे येथे हिंदु जनजागृती समिती आयोजित प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात कृतीशील होण्याचा हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार !

(डावीकडून) सद्गुरु स्वाती खाडये, दीपप्रज्वलन करतांना श्री. मनोज खाडये आणि श्री. विद्याधर नारगोलकर

पुणे – भारताची ४ सहस्र ५०० कि.मी. लांबीची सीमा बांगलादेशाशी जोडलेली आहे. सिलिगुडी कॉरिडॉरमध्ये घुसखोरी करून ईशान्य भारत मुसलमान बहुसंख्य करण्याचे प्रयत्न देशाच्या स्वातंत्र्यापासून चालू आहेत. आसामचे स्वातंत्र्यसैनिक आणि पूर्व मुख्यमंत्री गोपीनाथ बोर्डोलोई यांनी ईशान्य भारताचा प्रदेश पाकिस्तानला देण्याच्या विरोधात लढा उभा केला. केवळ त्यामुळे आज ईशान्य भारताची ७ राज्ये स्वतंत्र भारताचा भाग आहेत. अन्य देशांमध्ये घुसखोरीसाठी १२ वर्षे किंवा आजीवन कारावासापासून ते बंदुकीने ठार मारण्यापर्यंत शिक्षा आहेत; पण भारतात घुसखोरी केली, तर आधारकार्ड, रेशनकार्ड यांपासून ते मंत्री होण्यापर्यंत सुविधा मिळतात. बांगलादेशींची घुसखोरी रोखण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती निर्माण झाली आणि कायद्याची कठोर कार्यवाही झाल्यास बांगलादेशी घुसखोरीचा हा कर्करोग समूळ नष्ट होऊ शकतो, असे परखड विचार ब्रिगेडियर (निवृत्त) हेमंत महाजन यांनी मांडले. हिंदु जनजागृती समिती आयोजित प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात ते बोलत होते.

ब्रिगेडियर (निवृत्त) हेमंत महाजन

या वेळी पुणे आणि सातारा जिल्ह्यांतील १३० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. येथील इंद्रप्रस्थ मंगल कार्यालय येथे हा कार्यक्रम पार पडला. शंखनाद आणि वेदमंत्रपठणाने कार्यक्रमाला आरंभ झाला. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती प्रतिष्ठानचे महामंत्री श्री. विद्याधर नारगोलकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. या वेळी सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये आणि हिंदु जनजागृती समितीचे पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण, गुजरात आणि गोवा राज्याचे समन्वयक श्री. मनोज खाडये उपस्थित होते.

या वेळी हिंदु जनजागृती समितीचे पुणे जिल्हा समन्वयक श्री. पराग गोखले यांनी अधिवेशनाचा उद्देश सांगितला, तर श्री. महेश पाठक यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी अधिवेशनानिमित्त दिलेल्या संदेशाचे वाचन केले. सनातनच्या १२३ व्या संत पू. (सौ.) मनीषा पाठक यांनी भावी आपत्काळातील साधनेचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. स्वातंत्र्यवीर सावरकर युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नीलेश लोणकर, हिंदु जनजागृती समितीच्या सातारा जिल्हा समन्वयक सौ. भक्ती डाफळे, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र अन् छत्तीसगड संघटक श्री. सुनील घनवट, अधिवक्ता नीलेश सांगोलकर, हिंदुत्वनिष्ठ श्री. रवींद्र पडवळ, हिंदु जनजागृती समितीच्या कु. प्राची शिंत्रे, श्री. मनीष चाळके इत्यादी मान्यवरांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

अधिवेशनात झालेल्या गटचर्चेत सर्व हिंदुत्वनिष्ठांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि कृतीशील होण्याचा निर्धार केला. या कार्यक्रमाला ह.भ.प. दत्तात्रय चोरघे महाराज, ह.भ.प. सुभाष बडदे, विश्‍व हिंदु परिषदेचे श्री. महेंद्र देवी, गोसेवा परिषदेचे श्री. राजेंद्र लुंकड, श्री श्री रविशंकर प्रतिष्ठानचे श्री. शेखर मुंदडा, महाराष्ट्र ट्रेडिंगचे माजी अध्यक्ष श्री. दिलीप कुंभोजकर इत्यादी मान्यवरांची उपस्थिती लाभली. संपूर्ण वन्दे मातरम् म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कार्यरत रहाण्याची प्रतिज्ञा केली.

सनातन प्रभात वाचल्याविना झोप घ्यायची नाही, असे ठरवूया ! – विद्याधर नारगोलकर

श्री. विद्याधर नारगोलकर यांनी उपस्थितांना आवाहन केले की, नवनवीन विषय घेऊन हिंदु जनजागृती समिती कार्य करत आहे. आपल्याला सनातन प्रभातच्या माध्यमातून हिंदु धर्मावरील आघात लक्षात येतात. सनातन प्रभात वाचल्याविना झोप घ्यायची नाही, असे ठरवूया. हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी एकत्र या ! भगवंताने सर्वांना एकच गोष्ट समान दिली आहे ती म्हणजे २४ घंटे ! त्याचा योग्य उपयोग करा !

कृतीशील असलेले मूठभर हिंदुच हिंदु राष्ट्र आणतील ! – सद्गुरु स्वाती खाडये

अन्य धर्मीय सातत्याने हिंदु धर्मावर आघात करत आहेत. राष्ट्र हे केवळ संख्येने नव्हे, तर संस्कृती, धर्म, भाषा या माध्यमांतून उभे रहाते; म्हणूनच कृतीशील असलेले मूठभर हिंदुच हिंदु राष्ट्र आणतील ! वर्ष २०२५ मध्ये संपूर्ण विश्‍वात हिंदु राष्ट्र येणारच आहे. त्यासाठी ईश्‍वरी अधिष्ठान हवे. यासाठी सर्वांनी साधना करून हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सिंहाचा वाटा उचलूया.

एक समानसूत्री कार्यक्रम सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांना सिद्ध करून अवलंबावा लागेल ! – मनोज खाडये

श्री. मनोज खाडये

संघटित लढा का हवा ?, तर आंतरराष्ट्रीय मिशनरी संघटना मोठ्या प्रमाणात करत असलेले धर्मांतर, वक्फ बोर्डाला दिलेले पाशवी अधिकार, हलाल जिहाद या सर्वांपासून आपल्या धर्माचे रक्षण करायचे असेल, तर एक समानसूत्री कार्यक्रम सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांना सिद्ध करून अवलंबावा लागेल. गेल्या ११ वर्षांत ४५० संघटनांना एकत्रित करून कार्य करायला आरंभ झाला आहे. हे अधिवेशन पुढे नेतृत्व करणारे आहे. आपण प्रभावी जनजागृती करून सामान्य हिंदूंना त्यात सहभागी व्हावेसे वाटेल, असा लढा उभा करायचा आहे. त्याचे नेतृत्व आणि संघटन या प्रांतीय अधिवेशनाच्या माध्यमातून करायचे आहे.

स्रोत : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *