पिंपरी : ‘या देशात बहुसंख्य माणसे हिंदू असतील; तर तार्किकदृष्ट्या हे हिंदूराष्ट्र आहे, हे सांगायला ब्रह्मदेवाची गरज नाही. हा देश जेव्हा अधिकृतरीत्या हिंदूराष्ट्र म्हणून घोषित होईल; तेव्हाच या देशातील अहिंदू सुखात राहतील,’ असे मत सुप्रसिद्ध अभिनेते आणि व्याख्याते शरद पोंक्षे यांनी व्यक्त केले.
संभाजी चौक निगडी प्राधिकरण येथे शनिवारी (२१ मे) जयहिंद मित्र मंडळ ट्रस्ट आयोजित (कै. अशोक शाळू स्मरणार्थ) पाच दिवसीय जयहिंद लोकजागर व्याख्यानमालेत ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या विषयावर ते बोलत होते. खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते व्याख्यानमालेचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी नगरसेविका सुलभा उबाळे, आर. एस. कुमार, राहुल कलाटे, नंदा ताकवणे, भारती फरांदे, शाहीर प्रकाश ढवळे, प्रमोद कुटे आदी उपस्थित होते.
शरद पोंक्षे म्हणाले, ‘निधर्मी या शब्दाला कोणताच अर्थ नाही. बहुसंख्य हिंदू नागरिक असलेला हा हिंदुस्थान देश आहे, असे कट्टर हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे मत होते. गाय ही बैलाची माता आहे; माणसाची नाही. अशा प्रखर विचारांसह पन्नास वर्षे पुढील काळातही धक्कादायक वाटेल असा विज्ञानवादी दृष्टिकोन अंगीकारल्याने सावरकर हे समकालीन नेत्यांपेक्षा वेगळे ठरतात. सावरकरवाद आणि गांधीवाद या दोन भिन्न विचारशैलींवर आपला देश उभा आहे. सावरकर हे भारतमातेच्या आजारावर उपचार करणारे एकमेव डॉक्टर होते; पण त्यांचे विचार आपण कधीच अंमलात आणले नाहीत, असेही त्यांनी सांगितले.
संदर्भ : महाराष्ट्र टाइम्स