…तर मग राहूल गांधींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार का ? – हिंदु जनजागृती समितीचा जातीय द्वेष्ट्यांना प्रश्न
खारघर येथे झालेल्या घटनेप्रकरणी ज्येष्ठ निरुपणकार पू. डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार्यांनी काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांच्या ‘भारत-जोडो’ यात्रेत पंजाबमधील काँग्रेस खासदार संतोषसिंह चौधरी, महाराष्ट्रातील काँग्रेस सेवा दलाचे महासचिव कृष्णकांत पांडे यांच्यासह अनेकांचा मृत्यू झाला होता, तेव्हा राहूल गांधींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली होती का ?, असा प्रश्न हिंदु जनजागृती समितीने केला आहे. तसेच ही मागणी निवळ जातीयद्वेषातून करण्यात आली असल्याचेही समितीने म्हटले आहे.
खारघर येथील घटनेत 14 श्री सेवकांचा मृत्यू झाल्याप्रकरणी ज्येष्ठ निरुपणकार पू. डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी काही ब्रिगेडी आणि तथाकथित इतिहास संशोधकांनी केली आहे. त्याचा समिती तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करते. प्रत्येक घटनेकडे जातीय द्वेषातून आणि राजकीय लाभातून पाहणार्या या संघटनांचा इतिहास नेहमीच वादग्रस्त आहे. ठाणे येथे नुकत्याच एका पक्षाच्या आंदोलनाच्या वेळीही एका महिला कार्यकर्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. इतकेच नव्हे, तर अनेक राजकीय पक्षाच्या आंदोलनात वा कार्यक्रमाच्या वेळी असे दुर्दैवी प्रकार घडतात. त्या वेळी अशी मागणी कोणी करत नाही. मात्र प्रचंड मोठे सेवाकार्य करणार्या आध्यात्मिक संस्थेला लक्ष्य करण्यासाठी तिच्या प्रमुखांना अटक करण्याची मागणी हा जातीयद्वेषच आहे. खारघर येथे झालेल्या प्रकाराविषयी स्वत: ज्येष्ठ निरुपणकार पू. धर्माधिकारी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. तसेच राज्य सरकारनेही अशा घटना पुन्हा घडू नयेत, म्हणून विविध उपाययोजना करण्यास प्रारंभ केलेला आहे. शासनाने या प्रकरणी चौकशी समितीही नेमली आहे. यावेळी आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा सकारात्मक रीतीने साहाय्य काय करू शकतो, यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे, असेही समितीने म्हटले आहे.