Menu Close

हिंदूंच्या सर्व समस्यांची नोंद विधानसभेत घेतली जाईल, अशा प्रकारची आंदोलने जिल्ह्यात करण्याचा हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार !

चिपळूण येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हास्तरीय हिंदु राष्ट्र अधिवेशन

डावीकडून श्री. मनोज खाडये, दीपप्रज्वलन करतांना सद्गुरु स्वाती खाडये, ह.भ.प. दादा रणदिवे आणि सद्गुरु सत्यवान कदम

चिपळूण, २९ एप्रिल (वार्ता.) – हिंदूंवर आघात करणार्‍या लव्ह जिहाद, हलाल जिहाद, वक्फ बोर्ड  धर्मांतरण आदी समस्या हिंदु धर्म आणि भारत देश यांच्या मुळावर उठल्या आहेत. या समस्या मुळापासून उखडून टाकण्यासाठी हिंदु संघटनांचे प्रभावी संघटन होणे आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २९ एप्रिल या दिवशी येथील ‘स्वामी मंगल हॉल’मध्ये येथे जिल्हास्तरीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले. या अधिवेशनात हिंदूंच्या सर्व समस्यांची नोंद विधानसभेत घेतली जाईल, अशा प्रकारची आंदोलने जिल्ह्यात करण्याचा निर्धार हिंदुत्वनिष्ठांनी व्यक्त केला.

अधिवेशनाचा प्रारंभ सनातन संस्थेचे श्री. ज्ञानदेव पाटील यांनी केलेल्या शंखनादाने झाला. त्यानंतर सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. या कार्यक्रमाला सनातनचे संत पू. श्रीकृष्ण आगवेकर यांची वंदनीय उपस्थिती लाभली. अधिवेशनाचे सूत्रसंचालन श्री. परेश गुजराथी यांनी केले. या अधिवेशनानिमित्त हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्थान परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आशीर्वादरूपी संदेशाचे वाचन सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम यांनी केले. या अधिवेशनाला अनेक हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.

सत्कार आणि सन्मान

१. ह.भ.प. दादा रणदिवे यांचा सन्मान श्री रामवरदायीनी देवस्थान, निरबाडेचे विश्वस्त श्री. दिलीप महाडिक यांनी केला.

२. सद्गुरु सत्यवान कदम यांचा सन्मान हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचे श्री. महेश मयेकर यांनी केला.

३. सद्गुरु स्वाती खाडये यांचा सन्मान जीवनसाथी वधू-वर सूचक मंडळाच्या संचालिका सौ. रागिणी भुवड यांनी केला.

४. पू. श्रीकृष्ण आगवेकर यांचा सन्मान सनातन संस्थेचे श्री. महेंद्र चाळके यांनी केला.

५. हिंदु जनजागृती समितीचे श्री. मनोज खाडये यांचा सत्कार रत्नागिरी येथील हिंदुत्वनिष्ठ श्री. संजय पावसकर यांनी केला.

जिल्हास्तरीय हिंदु राष्ट्र अधिवेशनातील मान्यवरांचे विचार !

हिंदुत्वनिष्ठांनी समस्यांचा प्राधान्यक्रम ठरवून संघटितपणे लढणे, ही काळाची आवश्यकता ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

लव्ह जिहाद, धर्मांतरण, वक्फ बोर्ड आणि हलाल जिहाद या मोठ्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. देशात हिंदु बहुसंख्यांक आहेत. हिंदुत्वनिष्ठ संघटनाही अनेक आहेत. या सर्वांनी एकत्रित येणे आवश्यक आहे. सङ्घे शक्तिः कलौ युगे ।

आपण संघटित झाल्यास शासनावर आपल्या मागण्यांसाठी दबाव टाकून त्या मान्य करून घेऊ शकतो. आपल्या बांधवांचे होणारे धर्मांतरण, ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून हिंदु मुलींचे उद्ध्वस्त होणारे आयुष्य, ‘हलाल जिहाद’मधून देशाची कमकुवत होणारी अर्थव्यवस्था, ‘वक्फ बोर्ड कायद्या’मुळे हिंदूंच्या भूमीवर होणारे अतिक्रमण या सर्वांवर सध्या आपण करत असलेली उपाययोजना ही तात्कालिक स्वरूपाची आहे. ‘घरवापसी करणे’, या  उपाययोजनेसमवेत धर्मांतरण होऊ नये; म्हणून प्रयत्न करायला हवेत. लव्ह जिहाद रोखण्यासाठी धर्मशिक्षणाची नितांत आवश्यकता आहे. हलाल जिहादपासून वाचण्यासाठी सतर्कता आवश्यक आहे. प्रभावी हिंदूसंघटन आणि हिंदु राष्ट्राची स्थापना हा सर्व समस्यांवरील मूलभूत उपाय आहे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, गोवा, कोकण, गुजरात राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी केले.

स्वराज्याचे सुराज्य करण्याचे दायित्व आपले आहे ! – ह.भ.प. दादा रणदिवे

डावीकडून श्री. मनोज खाडये, मार्गदर्शन करतांना ह.भ.प. दादा रणदिवे, सद्गुरु सत्यवान कदम आणि सद्गुरु स्वाती खाडये

पूर्वी घरांमधून आपल्याला धर्मपरंपरा शिकवल्या जायच्या; मात्र आता त्याचा अभाव आढळतो. हिंदुत्वासाठी स्वत:चे सर्व सोडून मी येऊ शकतो, अशी आपली विचारप्रक्रिया हवी. ‘सर्व हिंदू एका बिंदूमध्ये यावेत’, ही संकल्पना अमलात आणण्यासाठी हे सर्व प्रयत्न चालू आहेत. ‘टीव्ही’वरील काल्पनिक मालिका बघून हिंदु राष्ट्र येणार नाही.  हिंदुत्वाचे काम केल्यास हिंदु राष्ट्र येणारच आहे. आपल्याला स्वराज्य मिळाले आहे, त्याचे सुराज्य करण्याचे दायित्व आपले आहे.

धर्मरक्षणाचे खरे कार्य धर्माचरणी व्यक्तीच करू शकते ! – सनातनचे धर्मप्रचारक सदगुरु सत्यवान कदम

धर्माचरण आणि साधना केल्याने हिंदु धर्माच्या श्रेष्ठत्वाची अनुभूती येते आणि खरा धर्माभिमान निर्माण होतो. धर्माभिमानामुळे समाज राष्ट्र यांचे हित साधण्यासाठी प्रयत्न होतात. धर्माचरण आणि साधना केल्यामुळे व्यक्ती धर्मनिष्ठ होते. धर्मनिष्ठ व्यक्ती हिंदु धर्माची हानी स्वतः करत नाही आणि अन्य व्यक्तीकडून हानी होत असेल, तर ती त्याला विरोध करते. धर्मरक्षणाचे खरे कार्य धर्माचरण आणि साधना करणारी व्यक्तीच करू शकते.

हिंदुत्वाचे कार्य करतांना आध्यात्मिक बळ आवश्यक ! – सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये

धर्मशिक्षणाच्या अभावामुळे ‘लव्ह जिहाद’ फोफावत आहे. यामुळेच हिंदूंची मंदिरे सरकारच्या कह्यात आहेत. हिंदुत्वाचे कार्य करतांना आध्यात्मिक बळ आवश्यक ठरते. मावळे मूठभर होते; मात्र त्यांना घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी आध्यात्मिक बळावर हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. पाच पांडवांच्या पाठीशी भगवान श्रीकृष्ण होते; म्हणून  कौरवांचा नाश होऊ शकला. आपण साधना केली, तर आपल्यामध्ये आध्यात्मिक बळ निर्माण होईल आणि हिंदु राष्ट्राचे हे दैवी कार्य आपल्याकडूनही घडेल.

धर्मकार्य संघटित राहून अखंडपणे करायला हवे ! – शशिकांत मोदी, शिवसेना, नगरसेवक, चिपळूण

श्री.शशिकांत मोदी

आपल्यातील मुलगी जेव्हा ‘लव्ह जिहाद’ला बळी पडते, तेव्हा आपण ‘ती या  जातीची आहे’, असे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करतो. तसे न करता ‘ती हिंदु आहे’, हे लक्षात घेऊन आपण आपल्या परीने तिला वाचवण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत. आपण धर्म म्हणून एकत्र यायला पाहिजे. फसवल्या गेलेल्या मुलीची ‘संपत्ती मिळेल’, असा धर्मांधांचा स्वार्थ असतो. हे धर्मकार्य करतांना प्रारंभी आपली हेटाळणी होणार आहे, असे गृहीत धरून धर्मकार्य न सोडता संघटित राहून ते अखंडपणे करायला हवे.

धर्मांतर होणार्‍या व्यक्तीची व्यवस्थित माहिती घेऊया ! – महेश सातपुते, धर्मजागरणचे खेड तालुका संयोजक

श्री.महेश सातपुते

धर्मांतर रोखण्यासाठी आपण थेट कृती न करता प्रारंभी ज्या व्यक्तीचे जिथे धर्मांतर  होत आहे, ती माहिती आपण घेऊया. तो कोण आहे ? हे बघून त्याच्या माहितीतील प्रतिष्ठित व्यक्तींना भेटून त्यांना त्याची कल्पना देऊया. जेणेकरून सर्व प्रक्रिया सुलभ मार्गाने घडेल.

 

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *