परमाचार्य डॉ. देवकरण शर्मा यांच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘देवप्रवाह’ या अभिनंदन ग्रंथाचे विमोचन
उज्जैन (मध्यप्रदेश) – ‘वयम् अमृतस्य पुत्रा:’। म्हणजेच आम्ही अमृत, म्हणजे अविनाशी ईश्वराचे पुत्र आहोत. त्या ईश्वरी तत्त्वाचा आणि अमृतत्वाचा अनुभव हा अमृत महोत्सव आहे. जेव्हा देहबुद्धी अल्प झाल्यावर व्यक्ती आत्मबुद्धीमध्ये स्थिर होते, तेव्हा ती ‘मी अविनाशीचा अंश आहे’, याचा अनुभव घेते. आचार, विचार आणि व्यवहार यांनी परमाचार्य डॉ. देवकरण यांची अमृतत्वाकडे वाटचाल होत आहे.
सत्य, त्रेता, द्वापर आणि कलि असा युगांचा क्रम असतो; परंतु जेव्हा व्यक्ती धर्माचरण किंवा साधना करते, तेव्हा ती हळूहळू मागील युगामध्ये म्हणजे परमात्म्याकडे प्रवास करते. या अमृत महोत्सवानिमित्त परमाचार्य डॉ. देवकरण शर्मा द्वापरयुगाकडून सत्ययुगाकडे प्रवास करत आहेत, असे वाटते.
उत्तम गृहस्थाश्रमानंतर एक संन्यस्थ जीवनासमवेत गुरुकुल, मंथन, चिंतन आणि लेखन यांच्या माध्यमातून समाजाला नवीन दिशा देण्याचे त्यांचे कार्य हा पुरावा आहे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले. ‘सप्तर्षि गुरुकुल’चे संस्थापक परमाचार्य डॉ. देवकरण शर्मा यांच्या अमृत महोत्सवानिमित्त कालिदास अकादमीमध्ये त्यांचा सन्मान आणि ‘देवप्रवाह’ या अभिनंदन ग्रंथाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी सद्गुरु डॉ. पिंगळे मार्गदर्शन करत होते. याप्रसंगी सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी डॉ. देवकरण शर्मा यांना भगवान श्रीकृष्णाची प्रतिमा देऊन सत्कार केला.
या वेळी व्यासपिठावर रामानुज पीठाधीश्वर श्री रंगनाथाचार्यजी महाराज, महामंडलेश्वर श्री अतुलेशानंद महाराज, मध्यप्रदेश शासनाचे उच्च शिक्षणमंत्री डॉ. मोहन यादव, विक्रम विश्वविद्यालयाचे कुलपती श्री. अखिलेश कुमार पांडेय, माजी कुलपती डॉ. मोहन गुप्त, ‘देवप्रवाह’चे मुख्य संपादक श्री. शिव चौरसिया उपस्थित होते.
‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ हाच माझ्या जीवनाचा संकल्प ! – परमाचार्य डॉ. देवकरण शर्मा‘भारताला पुन्हा जगद्गुरुपदी बसवणे’, हे माझ्या जीवनाच्या संकल्पाचे सार आहे. मेकॉलेच्या शिक्षणव्यवस्थेत परिवर्तन करून नैतिक, धर्मनिष्ठ, भारतीय जीवन दर्शन आणि मूल्ये यांनी ओतप्रोत असलेली शिक्षणव्यवस्था निर्माण करणे, हे माझे ध्येय आहे. सध्या शिक्षण संस्था घोड्यांचे तबेले झाले आहेत. तेथे नैतिकता, भारतीयत्व, आत्मीयता, चारित्र्य आणि स्वाभिमान यांचा अभाव असून केवळ उपभोग शिकवला जात आहे. त्याऐवजी विद्यार्थ्यांना धर्माचे शिक्षण द्यावे लागेल. संतांनी मला केवळ शतायुषी होण्याचा आशीर्वाद दिला आहे. त्यामुळे आता माझी उर्वरित २५ वर्षे राष्ट्र्र, धर्म, संस्कृती आणि हिंदु राष्ट्र यांना समर्पित आहेत. माझा वारसा संपत्ती किंवा शेती यांचा नाही. भारताला हिंदु राष्ट्र बनवणे, ही माझी इच्छा आहे. मेकॉलेच्या शिक्षणव्यवस्थेच्या ऐवजी भारतीय शिक्षणव्यवस्था स्थापन करायची आहे. |
कार्यक्रमाच्या प्रारंभी ‘सरस्वती वंदना’ दीप्ती शर्मा यांनी म्हटली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ‘नई दुनिया’चे वृत्त संपादक श्री. ईश्वर शर्मा यांनी केले. डॉ. देवकरण शर्मा यांचे पुत्र आणि मध्यप्रदेश उच्च शिक्षण विभागाचे आयुक्त डॉ. कर्मवीर शर्मा यांनी स्वागतपर भाषण, तर ज्येष्ठ पुत्र आणि राज्य कर विभागाचे संयुक्त आयुक्त डॉ. धर्मपाल शर्मा यांनी आभार प्रदर्शन केले.
परमाचार्य डॉ. शर्मा यांची अमृतत्वाकडे वाटचाल होण्याची चिन्हे ! – सद्गुरु डॉ. पिंगळेगुरुवार, दिनांक १३ या दिवशी अमृत महोत्सव होत आहे. अमरत्व जाणण्यासाठी गुरूंची कृपा आवश्यक आहे. १३ (तेरा) ही दिनांक ‘सर्वकाही तुझे आहे, माझे काही नाही’, असे सूचित करते.
परमाचार्यजींचे जीवनही असेच आहे. सभागृहात प्रवेश करताच ते संतांच्या चरणांना स्पर्श करून नतमस्तक झाले. त्यांच्या या वागण्यावरून ‘विद्या विनयेन शोभते’ ही म्हण त्यांच्या जीवनात रुजली आहे. यासमवेतच कार्यक्रमाच्या प्रारंभी वरुण देवाचे आशीर्वाद प्राप्त झाले. या सर्व गोष्टी परमाचार्यजींचा अमृतत्वाकडे प्रवास होत असल्याचे दर्शवतात. |
संत आणि मान्यवर यांनी केलेले मार्गदर्शन
१. श्री रंगनाथाचार्यजी महाराज, रामानुज पीठाधीश्वर : परमाचार्य डॉ. देवकरण शर्मा हे सतत ईश्वराच्या साधनेमध्ये मग्न असतात. त्यांची योग्यता असतांनाही ते साधेपणाने रहातात. तसेच ते संस्कृती आणि संस्कार यांचे रक्षण, तसेच राष्ट्रोत्थान यांच्या कार्यात व्यस्त असतात.
२. महामंडलेश्वर श्री अतुलेशानंदजी महाराज : ज्या प्रकारे मुळांना पाणी दिल्याने वृक्षाच्या फांद्या बहरतात, त्याप्रमाणे कुटुंब आणि समाज यांचे मूळ डॉ. देवकरण शर्मा आहेत.
३. डॉ. मोहन यादव, उच्च शिक्षणमंत्री आणि प्रमुख अतिथी : देवकरण यांनी दुसर्यांना शिक्षण देण्याचे व्रत अंगिकारले आहे.
या कार्यक्रमामध्ये माजी कुलपती डॉ. मोहन गुप्त, विक्रम विश्वविद्यालयाचे कुलपती अखिलेश कुमार पांडेय, श्री. गजेंद्र शर्मा, डॉ. ईश्वर शर्मा, आमदार रामलाल मालवीय, श्री. पिंग्लेश कचोले, डॉ. पिलकेंद्र अरोरा, श्री. हर्षवर्धन शर्मा, आयुषी शर्मा, श्री. अशोक भंडारी, श्री. शरद नागर यांनीही समायोचित विचार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये ‘महर्षि पाणिनि संस्कृत विश्वविद्यालया’चे कुलपती विजय कुमार, प्रा. हरिमोहन बुधौलिया, श्री. सूरज नागर आदींनी सहभाग घेतला.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात