Menu Close

मुंबईमध्‍ये मशिदीवरील भोंग्‍यांकडे पोलिसांचे दुर्लक्ष !

दुर्लक्ष करणार्‍या पोलिसांना बोलावून मुंबई उच्‍च न्‍यायालयाने दिला कारवाईचा आदेश !

  • मशिदींवरील भोंग्‍यांवर कारवाई करण्‍यासाठी दुर्लक्ष करणारे पोलीस जनतेला कधी आपले वाटतील का ?
  • न्‍यायालयाच्‍या आदेशानंतरही मशिदींवरील अवैध भोंग्‍यांवर कारवाई करण्‍यास कचरणारे पोलीस हिंदूंच्‍या बाबतीत तत्‍परतेने कारवाई करतात, हे लक्षात घ्‍यावे ! -संपादक
( प्रतिकात्मक छायाचित्र )

मुंबई – मशिदीवरील भोंग्‍यामुळे होणार्‍या त्रासाच्‍या विरोधात पोलिसांकडे वारंवार तक्रार करूनही कारवाई न केल्‍याप्रकरणी मुंबई उच्‍च न्‍यायालयाने ३ मे या दिवशी पोलीस उपायुक्‍तांना न्‍यायालयात उपस्‍थित रहाण्‍याचा आदेश दिला. तक्रार असलेल्‍या मशिदीवरील भोंग्‍यावर न्‍यायालयाने तत्‍परतेने कारवाई करण्‍याचा आदेश न्‍यायालयाने दिला. या वेळी कारवाई न झाल्‍याप्रकरणी पोलिसांनी न्‍यायालयाची क्षमा मागून कारवाईचे आश्‍वासन दिले. न्‍यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्‍यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्‍या खंडपिठापुढे ही सुनावणी झाली.

कांदिवली (पूर्व) येथील ठाकूर गाव परिसरातील मशिदीवरील भोंग्‍याच्‍या विरोधात अधिवक्‍ता रिना रिचर्ड यांनी न्‍यायालयात याचिका केली आहे. सुनावणीच्‍या वेळी पोलिसांनी भोंगा असलेली मशीद शांतताक्षेत्रात येत नसल्‍याचे स्‍पष्‍टीकरण दिले. त्‍यावर याचिकाकर्त्‍या अधिवक्‍ता रिना रिचर्ड यांनी येथील रुग्‍णालयापासून मशीद ९० मीटर अंतरावर असल्‍याचे न्‍यायालयाच्‍या निदर्शनास आणून दिले. ध्‍वनीप्रदूषण प्रतिबंधाच्‍या नियमानुसार शांतताक्षेत्राच्‍या १०० मीटर परिसरात ध्‍वनीवर्धकाला प्रतिबंध आहे.

२ मे या दिवशी झालेल्‍या सुनावणीच्‍या वेळी न्‍यायालयाने संबंधित पोलीस उपायुक्‍तांना न्‍यायालयात उपस्‍थित रहाण्‍याचा आदेश दिला होता. त्‍यानुसार पोलीस अधिकारी न्‍यायालयात उपस्‍थित राहिले होते. अधिवक्‍ता रिना रिचर्ड यांनी येथील समतानगर पोलीस ठाण्‍यात मशिदीवरील भोंग्‍यामुळे होत असलेल्‍या ध्‍वनीप्रदूषणाच्‍या विरोधात वारंवार तक्रार केली होती. मशिदीपासून ९० मीटर अंतरावर रुग्‍णालय आहे. शांतताक्षेत्राच्‍या १०० मीटर अंतरावर ध्‍वनीवर्धकाला प्रतिबंध आहे. मशिदीवरून भोंग्‍याद्वारे दिल्‍या जाणार्‍या अजानमुळे परिसरातील, तसेच रुग्‍णालयातील रुग्‍णांना मोठा त्रास सहन करावा लागत लागतो, हे याचिकेत नमूद केले आहे. पोलिसांकडून वारंवार तक्रार करून कारवाई होत नसल्‍याचेही अधिवक्‍ता रिना यांनी न्‍यायालयाच्‍या निदर्शनास आणून दिले. या प्रकरणाची पुढील सुनावणी १२ जून या दिवशी होणार आहे.

अन्‍यथा न्‍यायालयाच्‍या आदेशाचा भंग झाल्‍याची तक्रार करणार ! – अधिवक्‍ता रिना रिचर्ड

न्‍यायालयाच्‍या आदेशानुसार पोलिसांनी तत्‍परतेने कारवाई करावी. ही कारवाई होत आहे ना, याची मी निश्‍चिती करणार आहे. कारवाई न झाल्‍यास न्‍यायालयाच्‍या आदेशाचा भंग झाल्‍याची तक्रार करीन, असे अधिवक्‍ता रिना रिचर्ड यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्‍या प्रतिनिधीशी बोलतांना म्‍हटले.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *