Menu Close

निर्माते विपुल शाह यांनी धर्मांतराला बळी पडलेल्या २६ पीडित मुलींना समाजासमोर आणले !

‘द केरल स्टोरी’ चित्रपटाच्या चमूकडून मुंबई येथे पत्रकार परिषद !

  • ‘द केरल स्टोरी’ला विरोध करणारे पत्रकार परिषदेतील पीडितांच्या अनुभवांविषयी काही बोलतील का ?
  • २६ पीडित मुली पत्रकार परिषदेच्या माध्यमातून समोर येणे, म्हणजे ‘धर्मांतर आणि आतंकवाद अस्तित्वात आहे’, हे सिद्ध होते !
  • पत्रकार परिषदेत उघड झालेले वास्तव पाहून आता तरी देशात तातडीने धर्मांतरबंदी कायदा लागू करायला हवा ! – संपादक

मुंबई – ‘द केरल स्टोरी’ या चित्रपटाच्या माध्यमातून खोटा प्रसार करण्यात येत असल्याचा आरोप आमच्यावर करण्यात येत आहे; पण प्रेक्षक या चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत. ज्या महिला खरोखर धर्मांतराला बळी पडल्या आहेत, अशांपैकी २६ पीडित मुलींची आम्ही आज ओळख करून देत आहोत. ही केवळ केरळची गोष्ट नाही, तर संपूर्ण भारतात असे चालू आहे. चित्रपटात ३ मुलींच्या माध्यमातून सहस्रो मुलींची कथा आम्ही समोर आणली आहे, असे प्रतिपादन ‘द केरल स्टोरी’ चित्रपटाचे निर्माते विपुल शाह यांनी केले. ‘द केरल स्टोरी’च्या चमूने येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी त्यांनी केरळमधून आलेल्या आणि धर्मांतराला बळी पडलेल्या २६ मुलींना सर्वांसमोर आणले.

पत्रकार परिषदेत पीडितांनी मांडलेले अनुभव !

१. पीडितांपैकी एक असणारी अनघा जयगोपाल म्हणाली, ‘‘दोन वर्षांपूर्वी माझे धर्मांतर झाले होते. चित्रपटात दाखवलेल्या शालिनीप्रमाणेच माझी अवस्था झाली होती. आमच्या वसतीगृहात चित्रपटात दाखवलेल्या असिफासारख्या अनेक मुली होत्या. त्या प्रत्येक संभाषणात धर्म मध्ये आणून आम्हाला गोंधळात टाकायच्या. धर्माचे ज्ञान नसल्याने मला माझी बाजू मांडता येत नव्हती. त्या सांगायच्या, ‘‘देव एकच आहे. तो म्हणजे अल्ला.’’ त्यांनी मला कुराणची हिंदी आवृत्ती दिली. ती वाचून मी त्यांच्या बोलण्याला बळी पडले. मी हिंदुविरोधी बनले. मी माझे कुटुंब सोडले आणि पूर्णपणे इस्लामचा स्वीकार केला. घरी पूजा असायची, तेव्हा मी गच्चीवर नमाज पढायचे. मी माझा राग माझ्या चुलत भावाच्या मुलीवर काढला होता; कारण ती मला नमाज पढू देत नव्हती.’’

२. पीडित मुलींपैकी दुसरी मुलगी चित्रा म्हणाली, ‘‘केवळ मुलीच नाहीत, तर मुलेही धर्मांतराला बळी पडली आहेत. ज्यांचे धर्मांतर झाले, त्यांनी आपले हिंदु कुटुंब पूर्णपणे सोडले. त्यांच्यात झालेला पालट कुटुंबियांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यांना आश्रमात आणले. आता त्यांना स्वतःची ओळख लपवायची आहे.’’

३. पीडित श्रुती म्हणाली, ‘‘आर्ष विद्या समाजाच्या अंतर्गत धर्मांतरित मुलींना साहाय्य केले जाते. वर्ष १९९९ ते २०२३ पर्यंत अनुमाने ७ सहस्र लोकांना मायदेशी पाठवण्यात आले आहे. त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला होता. धर्मांतरित ३०० मुलींना आर्ष विद्या आश्रमात सुविधा देण्यात येणार आहेत.’’ विपुल शहा यांनी या आश्रमाला ५१ लाख रुपयांची देणगी दिली होती. मुलींना कोणत्याही मार्गाने वाचवणे, हाच हा चित्रपट बनवण्याचा उद्देश असल्याचे विपुल यांनी सांगितले.

२६ मुलींपैकी दोन-तीन मुलींनी त्यांचे अनुभव सांगितले. काही मुलींनी ओळख लपवण्यासाठी चेहरा झाकला होता.

चित्रपटाचा हेतू कोणत्याही धर्माच्या भावना दुखावण्याचा नाही ! – दिग्दर्शक सुदीप्तो सेन

या चित्रपटाचा उद्देश कुणाच्याही धर्माच्या धार्मिक भावना दुखावण्याचा नाही. प्रत्येक संवाद आणि दृश्य हे वास्तवावर आधारित आहे. भारताव्यतिरिक्तही अनेक देशांत लव्ह जिहादचा कट रचला जातो. आतंकवाद इस्लाम धर्माला अपकीर्त करतो. इस्लाम धर्माच्या नावाचा कसा गैरवापर होत आहे ?, हे आम्ही या चित्रपटाद्वारे सांगितले आहे.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *