Menu Close

…ही तर हिंदूंची चाचपणी; भविष्यातील धोका ओळखून हिंदूंनी सावध रहावे – महंत श्री सुधीरदासजी महाराज

‘चर्चा हिंदु राष्ट्र की’मध्ये त्र्यंबकेश्वर मंदिरातील घटनेवर आधारित ‘विशेष संवाद’ !

महंत श्री सुधीरदासजी महाराज

नुकतेच संदलच्या निमित्ताने 15-16 मुसलमानांच्या समुहाने हिंदूंचे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री त्र्यंबकेश्वर मंदिरात घुसण्याचा आणि हिरवी चादर चढवण्याचा केलेला प्रकार ही एकप्रकारची हिंदूंची चाचपणी होती. अशी कृती केल्यावर हिंदू काय प्रतिक्रिया देतात, ते मुसलमानांना पाहायचे होते. भविष्यात यातून मोठे षड्यंत्र आखले जाऊ शकते. त्यामुळे हिंदूंनी आपल्या मंदिरांचे रक्षण करण्यासाठी आतापासून सावध असायला हवे, असे आवाहन नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध ‘श्री काळाराम मंदिरा’चे आचार्य महामंडलेश्वर महंत श्री सुधीरदासजी महाराज यांनी केले. ते हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘मूर्तीपूजेला विरोध करणार्‍या मुसलमानांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात घुसण्याचा प्रयत्न का केला ?’ या विषयावरील विशेष संवादात बोलत होते.

या वेळी महंत श्री सुधीरदासजी महाराज पुढे म्हणाले की, सौदी अरेबियात कुठेही मजार नाही, कुठेही संदल निघत नाही. हा प्रकार केवळ भारतात वाढत चालला आहे. त्यातून देशभरात लँड जिहाद चालू आहे. आता हिंदूंच्या मंदिरात घुसून गोंधळ घातला जात आहे. एकीकडे हे लोक मूर्तीपूजा मानत नाही. दुसरीकडे मात्र त्याच मंदिरांच्या नावाने स्वत: व्यवसाय करायचा हा दुटप्पीपणा आहे. त्यामुळे हिंदूंनी अशा लोकांकडून पूजा-प्रसादाचे साहित्य का विकत घ्यावे ? त्यांच्या पूजासाहित्यावर बहिष्कार का घालू नये ? याविषयी हिंदूंनी चिंतन करायला हवे.

या वेळी ‘श्री त्र्यंबकेश्वर पुरोहित संघा’चे अध्यक्ष श्री. मनोज थेटे गुरुजी म्हणाले की, त्र्यंबकेश्वरमध्ये मुसलमानांची संदल अनेक वर्षांपासून चालू आहे; पण मंदिराच्या आत जाऊन धूप दाखवणे वा चादर चढवण्याची प्रथा कधीच नव्हती. ते लोक रस्त्यावरून जातांना धूप दाखवत असतील, म्हणून ती मंदिराची परंपरा होत नाही. या संदर्भात त्र्यंबकेश्वर नगर परिषदेत बोलावलेल्या ग्रामसभेत संबंधित मुसलमानांनी झालेल्या चुकीबद्दल जाहीर क्षमायाचना केली आहे.

या वेळी ‘हिंदु जनजागृती समिती’चे समन्वयक श्री. आनंद जाखोटिया म्हणाले की, या घटनेवरून काही प्रसिद्धीमाध्यमे ‘हिंदूंनी या प्रथा-परंपरेचे स्वागत केले आहे; मात्र काही कट्टर हिंदू जाणीवपूर्वक विरोध करत आहेत’ असा एक ‘नॅरेटिव्ह’ सेट करत आहेत; पण ही माध्यमे हिंदूंच्या धार्मिक भावनांचा विचार करत नाहीत. जर मुसलमानांमध्ये खरेच श्री त्र्यंबकेश्वराविषयी एवढी श्रद्धा असेल, तर राममंदिरासाठी हिंदूंना 500 वर्षे का लढावे लागले ? काशी आणि मथुरा येथील मंदिरे ते हिंदूंच्या स्वाधीन का करत नाहीत ? ‘अहिंदूंना प्रवेश नाही’, असा स्पष्ट सूचनाफलक मंदिराबाहेर लावलेला असतांना त्याचे पालन मुसलमान करत नसतील, तर ते कोणत्या प्रथा-परंपरेविषयी बोलत आहेत ? हाच जमाव जर 15-16 पेक्षा खूप मोठा असता आणि सुरक्षा रक्षकांनी त्यांना अडवले नसते, तर काय झाले असते, याचा शासनाने आणि हिंदूंनी गांभीर्याने विचार करायला हवा.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *