Menu Close

नागपूर येथील चार मंदिरांमध्ये भारतीय संस्कृतीनुसार वस्त्रसंहिता लागू – महाराष्ट्र मंदिर महासंघ

धंतोली, नागपूर येथील प्रसिद्ध श्री गोपालकृष्ण मंदिरातील पत्रकार परिषदेत डावीकडून सर्वश्री रामनारायण मिश्र, श्रीराम कुलकर्णी, दिलीप कूकडे, प्रसन्न पातुरकर, विषय मांडतांना श्री. सुनील घनवट, सौ. ममता चिंचवडकर, ईश्वर मिष्किन-पाटील, महादेव ढमाले, शैलेंद्र अवस्थी (मंदिराचे विश्वस्त आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाचे पदाधिकारी )

महाराष्ट्र शासनाने वर्ष 2020 मध्ये राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात वस्त्रसंहिता लागू केली आहे. इतकेच नव्हे, तर देशातील अनेक मंदिरे, गुरुद्वारा, चर्च, मशिदी आणि अन्य प्रार्थनास्थळे, खाजगी अस्थापने, शाळा-महाविद्यालय, न्यायालय, पोलीस आदी सर्वच क्षेत्रांत वस्त्रसंहिता लागू आहे. त्याच धर्तीवर मंदिरांचे पावित्र्य, शिष्टाचार, संस्कृती जपण्यासाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या बैठकीत नागपूर जिल्ह्यातील चार मंदिरांच्या विश्वस्तांनी त्या मंदिरांमध्ये भारतीय संस्कृती अनुरूप वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे, असे ‘महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी सांगितले. ते धंतोली, नागपूर येथील प्रसिद्ध श्री गोपालकृष्ण मंदिरात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. ते पुढे म्हणाले की, नागपूरनंतर महाराष्ट्रातील सर्वच मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यासाठी व्यापक अभियान राबवून भाविकांमध्ये वस्रसंहितेविषयी जागृती करण्यात येणार आहे.

नागपूर जिल्ह्यातील श्री गोपालकृष्ण मंदिर, धंतोली; श्री संकटमोचन पंचमुखी हनुमान मंदिर, बेलोरी, सावनेर; श्री बृहस्पती मंदिर, कानोलीबारा आणि श्री हिलटॉप दुर्गामाता मंदिर, मानवता नगर या चार मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय एकमुखाने घेण्यात आला. या वेळी श्री गोपालकृष्ण मंदिराचे विश्वस्त श्री. प्रसन्न पातुरकर, मंदिर कमिटी प्रमुख सौ. ममताताई चिंचवडकर आणि श्री. आशुतोष गोटे यांनी मंदिराचे पावित्र्यरक्षण आणि भारतीय संस्कृती यांचे पालन व्हावे, या उद्देशाने मंदिरामध्ये भाविकांनी येतांना अंगप्रदर्शन करणारे उत्तेजक तथा तोकडे कपडे घालून येऊ नये, तसेच भारतीय संस्कृतीचे पालन करून मंदिर प्रशासनात सहकार्य करावे, अशा प्रकारचे आवाहन केले. तसा फलकही मंदिराच्या दर्शनी भागात लावण्यात आला आहे. या वेळी श्री बृहस्पती मंदिराचे विश्वस्त श्री. रामनारायण मिश्र, फुटाळा येथील श्री हनुमान मंदिराचे श्री. शैलेंद्र अवस्थी, श्री संकटमोचन पंचमुखी हनुमान मंदिराचे श्री. दिलीप कुकडे, तसेच हिंदु जनजागृती समितीचे नागपूर समन्वयक श्री. अतुल अर्वेनला उपस्थित होते.

धंतोली, नागपूर येथील श्री गोपालकृष्ण मंदिराच्या बाहेर वस्त्रसंहितेचा फलक लावण्यात आल्यावर उभे असलेले मंदिराचे विश्वस्त आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाचे पदाधिकारी !

यापूर्वी जळगाव येथे 4 आणि 5 फेब्रुवारी 2023 मध्ये मंदिरे अन् धर्मपरंपरा यांच्या रक्षणार्थ झालेल्या राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदे’त उपरोक्त ठराव संमत करण्यात आला होता. त्याची कार्यवाही राज्यातील मंदिरांमध्ये करण्यात येत आहे. यापूर्वी जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील ‘श्री मंगळग्रह मंदिरा’त वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे.

आज मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू झाली की, काही पुरोमागी, आधुनिकतावादी, व्यक्तीस्वातंत्र्यवाले गळा काढून छाती बडवायला लागतात; मात्र पांढरा पायघोळ झगा घालणार्‍या ख्रिस्ती पाद्री, तोकडा पायजामा घालणारे मुल्ला-मौलवी वा काळा बुरखा घालणार्‍या मुसलमान महिला यांच्या वस्त्रांबद्दल ते आक्षेप घेत नाहीत. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले उज्जैनचे श्री महाकालेश्वर मंिदर, महाराष्ट्रातील श्री घृष्णेश्वर मंदिर, वाराणसीचे श्री काशी-विश्वेश्वर मंदिर, आंध्रप्रदेशचे श्री तिरुपती बालाजी मंदिर, केरळचे विख्यात श्री पद्मनाभस्वामी मंदिर, कन्याकुमारीचे श्री माता मंदिर अशा काही प्रसिद्ध मंदिरांमध्ये अनेक वर्षांपासून भाविकांसाठी सात्त्विक वस्त्रसंहिता लागू आहे. गोव्यातील बहुतांश मंदिरांसह बेसिलिका ऑफ बॉर्न जीसस आणि सी कैथ्रेडल या मोठ्या चर्चमध्येही वस्त्रसंहिता लागू आहे. महाराष्ट्र शासनाने ‘शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना ‘जीन्स पँट’, ‘टी-शर्ट’, भडक रंगांचे किंवा नक्षीकाम असलेले वस्त्र, तसेच ‘स्लीपर’ वापरण्यावर बंदी घातली आहे. मद्रास उच्च न्यायालयानेही ‘तेथील मंदिरांत प्रवेश करण्यासाठी सात्त्विक वेशभूषा असली पाहिजे’, हे मान्य करून 1 जानेवारी 2016 पासून राज्यात वस्त्रसंहिता लागू केली. तसेच मंदिरांमध्ये देवाच्या दर्शनासाठी तोकड्या वस्त्रांमध्ये किंवा परंपराहीन वेशभूषेत जाणे, हे ‘व्यक्तीस्वातंत्र्य’ असू शकत नाही. प्रत्येकाला ‘आपल्या घरी आणि सार्वजनिक ठिकाणी कोणते कपडे घालावेत’, याचे व्यक्तीस्वातंत्र्य आहे; मात्र मंदिर हे धार्मिकस्थळ आहे. तेथे धार्मिकतेला अनुसरूनच आचरण व्हायला हवे. तेथे व्यक्तीस्वातंत्र्य नव्हे, तर धर्माचरणाला महत्त्व आहे.

तसेच भारतीय वस्त्र पाश्चात्त्यांच्या तुलनेत अधिक सात्त्विक आणि सभ्यतापूर्ण आहेत. तसेच भारतीय वस्त्र घातल्याने आपल्या संस्कृतीचा प्रचार-प्रचार होण्यासह तिच्याविषयी युवा पिढीमध्ये स्वाभिमानही जागृत होईल. तसेच पाश्चात्त्यांच्या तुलनेत पारंपारिक वस्त्र निर्मिती करणार्‍या उद्योगाला चालना मिळेल. ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होईल. मंदिरातील सात्त्विकता अधिक प्रमाणात ग्रहण करायची असेल, तर आपले आचरण आणि वेशभूषा सात्त्विक असायला हवी, असेही श्री. घनवट यांनी सांगितले.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *