Menu Close

महाराष्ट्र राज्यात राबवण्यात येणार्‍या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ आणि सुंदर बसस्थानक अभियाना’मध्ये ‘सुराज्य अभियाना’च्या सूचनांचा समावेश !

बसस्थानकांच्या स्वच्छतेचा आढावा घेण्यासाठी अधिकार्‍यांची नियुक्ती !

मुंबई – राज्यात राबवण्यात येत असलेल्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ आणि सुंदर बसस्थानक अभियानामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानाकडून सुचवण्यात आलेल्या सूचनांचा समावेश करण्यात आला आहे. सुराज्य अभियानाकडून करण्यात आलेल्या मागणीनुसार महामंडळाने  बसस्थानकांच्या स्वच्छतेसाठी उत्तरदायी अधिकार्‍यांची, तर स्वच्छतेचे परीक्षण करण्यासाठीही अधिकार्‍यांची नियुक्ती केली आहे.

राज्यशासनाने १ मे २०२३ या दिवशी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ आणि सुंदर बसस्थानक अभियान’ राबवण्याची घोषणा केली. त्यापूर्वी १० एप्रिल या दिवशी सुराज्य अभियनाच्या शिष्टमंडळाने एस्.टी. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांची भेट घेऊन बसस्थानके कायम स्वच्छ ठेवण्याच्या दृष्टीने उपाययोजना सुचवल्या होत्या. त्याविषयीचे निवेदनही देण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन विभाग यांना सुराज्य अभियानाकडून याविषयीचे निवेदन देण्यात आले होते.

या निवेदनातील अन्य मागण्यांनुसार एस्.टी. महामंडळाकडून कार्यवाही करण्यात आली आहे. यामध्ये बसस्थानकांच्या स्वच्छतेची कार्यपद्धत निश्‍चित करण्याची, तसेच यासाठी प्रत्येक बसस्थानकावर उत्तरदायी व्यक्तीची नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार जिल्हा, तसेच विभागीय पातळीवर ही पहाणी करण्यासाठी अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासह ‘स्वच्छता मोहिमेची कार्यवाही परिणामकारकपणे व्हावी, यासाठी व्यवस्थापकीय संचालकांनी सर्व विभागीय नियंत्रकांची आठवड्यातून एकदा ‘ऑनलाईन’ बैठक घेऊन मोहिमेचा आढावा घ्यावा’, अशी मागणी सुराज्य अभियानाकडून करण्यात आली होती. त्यानुसार विभागीय आयुक्तांकडून थेट एस्.टी. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक बसस्थानकांच्या स्वच्छतेचा आढावा घेणार आहेत. सुराज्य अभियानाकडून व्यवस्थापकीय संचालकांसह विभागीय नियंत्रकांनी आठवड्यातून एक दिवस बसस्थानकांवर अचानकपणे जाऊन पहाणी केल्यास सर्व अधिकारी आणि कर्मचारी स्वच्छतेविषयी दक्ष रहातील आणि राज्यातील नागरिकांमध्ये ‘महामंडळ स्वच्छतेची मोहीम गांभीर्याने घेत आहे’, असा संदेश जाईल, असे निवेदनात नमूद केले होते. त्यानुसार बसस्थानकांची पहाणी करण्यासाठी महामंडळाकडून अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सुराज्य अभियानाच्या सूचनेनुसार सामाजिक संस्थांनाही सहभागी करून घेणार !

‘सुराज्य अभियानाकडून बसस्थानक स्वच्छता मोहिमेमध्ये सामाजिक संस्था, महाविद्यालयांतील विद्यार्थी आणि समाजसेवक यांचे साहाय्य घेऊन प्रत्येक मासाला बसस्थानकांची एका दिवसाची स्वच्छता मोहीम घेण्यात यावी. यामध्ये नागरिकांनी सहभागी होण्याचे बसस्थानकांवर उद्घोषणेद्वारे आवाहन करण्यात यावे’, अशी मागणीही सुराज्य अभिनाकडून करण्यात आली होती. यानुसर बसस्थानके स्वच्छ राखण्याचा संदेश महामंडळाने यापूर्वीच प्रसारित केला आहे. एस्.टी. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी बसस्थानक स्वच्छता अभियानात सामाजिक संस्थांना सहभागी करून घेण्यासाठी परिपत्रक काढले असून ते सर्व विभागीय नियंत्रकांना पाठवण्यात आले असल्याचे दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला सांगितले.

बसस्थानकांवरील स्वच्छतेची पहाण्यासाठी अधिकार्‍यांची नियुक्ती ! – शेखर चन्ने, व्यवस्थापकीय संचालक, एस्.टी. महामंडळ

शेखर चन्ने

बसस्थानकांच्या स्वच्छतेसाठी जिल्हापातळीवर अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विभागीय नियंत्रक या अभियानाचा आढावा घेऊन त्याची माहिती देणार आहेत. बसस्थानकांच्या स्वच्छतेचे परीक्षणही केले जाणार आहे. हे अभियान आम्हाला केवळ काही दिवसांपुरते राबवायचे नसून बसस्थानके कायम स्वच्छ रहाण्याच्या दृष्टीने प्रयत्न करायचे आहे, असे एस्.टी. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना म्हणाले.

प्रथम बसस्थानकांची स्वच्छता, मग अस्वच्छता करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई !

‘मुळात एस्.टी. महामंडळाची बसस्थानकेच अस्वच्छ होती. अस्वच्छ असलेल्या ठिकाणी कुणीही घाण करते; मात्र स्वत: स्वच्छता राखली, तर घाण करतांना विचार केला जातो. त्यामुळे प्रथम आम्ही बसस्थानके स्वच्छ करण्यावर भर देणार आहोत. त्यानंतर बसस्थानके अस्वच्छ करणार्‍यांवर दंडात्मक कारवाईही केली जाईल’, असेही चन्ने यांनी स्पष्ट केले.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *