पुणे : दक्षिण आफ्रिकेत वंशविरोधी लढा देणारे नेेल्सन मंडेला यांना भारतरत्न पुरस्कार मिळतो. मात्र, स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाचा होम करणार्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना हा पुरस्कार का दिला जात नाही ? असा प्रश्न शिवसेना उपनेते, अभिनेते शरद पोंक्षे यांनी उपस्थित केला. शिवसेना कोथरूड मतदारसंघ बाणेर विभागातर्फे शिवसेना सुवर्ण महोत्सवी वर्ष व स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या सुवर्ण पुण्यतिथी वर्षानिमित्त ‘राष्ट्रीय स्वाहा’ या कार्यक्रमात ते बोलत होते.
राहुल गांधींना त्यांच्या आजीचा इतिहास तरी माहीत आहे का ? ‘महात्मा गांधी आमचे, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर तुमचे’ असे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी सांगतात. मात्र, त्यांच्या आजी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सावरकरांचे स्मारक व्हावे, यासाठी स्वतः वैयक्तिक पंधरा हजार रुपये दिले होते. हा त्यांच्या आजीचा इतिहास त्यांना माहीत आहे का ? असा प्रश्नही पोंक्षे यांनी राहुल गांधी यांना विचारला.
भगव्याची साथ सोडलेले आज ओळखूनही येत नाहीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू संत तुकाराम महाराज या संतांनी, तसेच छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनीही भगवा हाती घेऊन आपले काम सुरू ठेवले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी भगवा हाती घेतला. त्या भगव्याला निळी, पिवळी, हिरवी कमान दिली नाही. आहुती देण्याची हिम्मत आहे, अशांनीच भगवा हाती घ्यावा. गेली ५० वर्षे शिवसेनाप्रमुखांमुळे भगव्याचा दरारा आज कायम आहे. ज्यांनी भगव्याची साथ सोडली ते आज तुरूंगात बसले असून, ओळखूनही येत नाहीत, असा टोलाही पोंक्षे यांनी भुजबळ यांचे नाव न घेता त्यांना लगावला.
संदर्भ : सामना