हिंदु जनजागृती समितीकडून देवतांचे विडंबन रोखण्यासंदर्भात बँक व्यवस्थापकांचे प्रबोधन
सिन्नर (नाशिक) : येथील नगरपालिकेच्या अखत्यारित असलेल्या महाराष्ट्र बँकेच्या इमारतीच्या जिन्यामध्ये देवतांचे चित्र असलेल्या टाईल्स लावण्यात आल्या होत्या. हे पाहून हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी बँकेच्या व्यवस्थापकांचे प्रबोधन केले आणि नगरपालिका अन् तहसील कार्यालय यांना निवेदनही दिले.
सिन्नर येथील नगरपालिकेच्या अखत्यारीत येणार्या महाराष्ट्र बँकेच्या इमारतीच्या जिन्यामधील कोपर्यांमध्ये हिंदु देवता आणि साधू-संत यांचे चित्र असलेल्या टाईल्स लावल्या आहेत. जिन्यातील कोपर्यामध्ये कुणी थुंकू नये; म्हणून या टाईल्स लावण्यात आल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात मात्र या टाईल्सवरच थुंकल्याचे निदर्शनास आले. हा गंभीर प्रकार लक्षात येताच हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री ज्ञानेश्वर भगुरे आणि अविनाश पवार यांनी बँकेचे व्यवस्थापक राकेश कुमार यांना बाहेर बोलावून हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला, तसेच सदर टाईल्स काढून टाकण्याची विनंतीही केली. यावर व्यवस्थापकांनी ‘लोकांनी येथे थुंकू नये म्हणूनच टाईल्स लावल्याचे सांगून तुम्हीच थुंकणार्या लोकांचे प्रबोधन करा’, असे उर्मट उत्तर दिले. (असे उद्धटपणे बोलण्याचे धाडस बँक व्यवस्थापकांनी अन्य धर्मियांच्या बाबतीत केले असते का ? – संपादक) यावर श्री. भगुरे यांनी, ‘सर्वधर्मसमभाव असलेल्या आपल्या देशात याच चित्रांजवळ चांदतारा, मशीद आणि क्रॉसचे चित्र लावण्याची तुमची हिंमत आहे का’, असे विचारल्यावर राकेश कुमार यांनी, ‘ही जागा नगरपालिकेची असून आम्ही भाडेतत्त्वावर वापरत असल्याने तुम्ही नगरपालिकेस निवेदन द्या’, असे सांगितले.
त्यानंतर ‘येत्या आठ दिवसांत देवी-देवता आणि साधु-संतांची विटंबना होणारा हा प्रकार थांबावा आणि या टाईल्स सन्मानपूर्वक काढाव्यात’, या मागणीचे निवेदन नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय जाधव, तसेच सिन्नरचे नायब तहसीलदार यांना देण्यात आले. या निवेदनावर शिवसेनेचे सर्वश्री विष्णू गोजरे, पिराजी पवार, पंकज मोरे, भाजपचे सर्वश्री बाळासाहेब हांडे, पदमाकर गुजराथी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्वश्री राजेंद्र वाघे पाटील, चेतन पुरोहित, हिंदवी स्वराज्य संघाचे सर्वश्री दौलत गोसावी, रवींद्र गोजरे आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. ज्ञानेश्वर भगुरे यांनी स्वाक्षरी केली. ‘या टाईल्स काढण्याचा आदेश संबंधित यंत्रणेला त्वरित देण्यात येतील’, असे आश्वासन हे निवेदन स्वीकारतांना नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय जाधव यांनी दिले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात