Menu Close

नवीन संसद भवनाच्‍या उद़्‍घाटनासाठी तमिळनाडूहून आलेल्‍या विविध अधीनम्‌च्‍या (मठाच्‍या) स्‍वामींचे हिंदु जनजागृती समितीच्‍या कार्यास शुभाशीर्वाद !

मदुराई अधीनम्‌चे मठाधिपती श्री ला श्री हरिहर ज्ञानसंबंध देसिक स्‍वामी यांना ग्रंथ भेट देतांना सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे आणि मागच्‍या बाजूला श्री. संतोषकुमार पाला

देहली – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन संसद भवनात ‘सेंगोल’ (धर्मदंड) स्‍थापन करण्‍यासाठी तमिळनाडूमधील विविध अधीनम्‌च्‍या स्‍वामीजींना (मठाधिपतींना) आमंत्रित केले होते. या ऐतिहासिक सोहळ्‍याला २१ प्रमुख मठाधिपतींची वंदनीय उपस्‍थिती लाभली. संसद भवनाच्‍या उद़्‍घाटन सोहळ्‍यानंतर हिंदु जनजागृती समितीचे राष्‍ट्रीय मार्गदर्शक सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी प्रमुख मठाधिपतींचा त्‍यांच्‍या निवासाच्‍या ठिकाणी जाऊन शाल आणि ग्रंथ भेट देऊन सन्‍मान केला. या वेळी सद़्‍गुरु डॉ. पिंगळे यांनी स्‍वामीजींना समितीच्‍या कार्याची संक्षिप्‍त माहिती सांगितली.

१. १ सहस्र ३०० वर्षांहून अधिक प्राचीन अशा मदुराई अधीनम्‌चे २९३ वे मठाधिपती श्री ला श्री हरिहर ज्ञानसंबंध देसिक स्‍वामी यांनी समितीच्‍या कार्यास आशीर्वाद दिले.

पेरूर अधीनम्‌चे मठाधिपती पू. डॉ. शांतलिंगम् मरूदशाला स्‍वामी यांना ग्रंथ भेट देतांना सद़्‍गुरु डॉ. पिंगळे आणि मागच्‍या बाजूला उभे असलेले श्री. संतोषकुमार पाला

२. पेरूर अधीनम्‌चे मठाधिपती तथा श्री दक्षिणामूर्ती मठाचे ६ वे मठाधिपती पू. डॉ. शांतलिंगम् मरूदशाला स्‍वामी यांना समितीचे ‘हिंदु राष्‍ट्र स्‍थापने’चे कार्य ऐकून ‘विशेष आनंद झाला’, असे गौरवोद़्‍गार काढले. तसेच त्‍यांनी हिंदु जनजागृती समिती आयोजित गोवा येथे होणार्‍या ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’स आशीर्वाद दिले. स्‍वामीजींची व्‍यस्‍तता असतांनाही त्‍यांनी ‘मी प्रत्‍यक्ष एक दिवस तरी ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’त उपस्‍थित रहाण्‍याचा निश्‍चित प्रयत्न करीन’, असे सांगितले.

३. कुंड्रकुडी अधीनम्‌चे मठाधिपती, तसेच स्‍वामी वेदांतानंद यांचाही सन्‍मान करण्‍यात आला.

विशेष

हिंदु जनजागृती समिती आयोजित अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशनास तमिळनाडू येथून प्रतिवर्षी उपस्‍थित रहाणारे युवा हिंदुत्‍वनिष्‍ठ सर्वश्री संतोषकुमार पाला, सतीश कण्‍णा उपस्‍थित होते. वर्ष २०२२ मध्‍ये झालेल्‍या दशम अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र्र अधिवेशनात श्री. संतोष यांनी स्‍वतःच्‍या भाषणात ‘सेंगोल’विषयीची माहिती सांगितल्‍याचे सांगितले आणि त्‍याविषयीचा व्‍हिडिओ या वेळी स्‍वामीजींना दाखवण्‍यात आला.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *