Menu Close

अश्‍लील विज्ञापन फलकांच्या विरोधात कृतीशील लढा देण्याचा महिलांचा निर्धार !

हिंदु जनजागृती समितीप्रणीत रणरागिणी शाखेच्या वतीने गोवा येथे महिला संघटन मेळावा

ranragini

म्हापसा, गोवा : गोव्यातील कॅसिनो संस्कृती, तसेच रस्त्याच्या बाजूने आणि दुकानांवर लावण्यात येणारे अश्‍लील विज्ञापनफलक यांच्या विरोधात सनदशीर मार्गाने लढा देणे, तसेचस्वत: धर्माचरण करण्याबरोबरच समाजावर धर्माचरणाचे महत्त्व बिंबवण्यासाठी विविध उपक्रम राबवणे, यांसह धर्मांतर आणि लव्ह जिहाद यांविषयी महिला अन् युवती यांच्यामध्ये जागृती करण्याचा निर्धार हिंदु धर्माभिमानी महिलांनी येथे केला. हिंदु जनजागृती समितीप्रणीत रणरागिणी शाखेच्या वतीने म्हापसा येथील वैश्य भवन सभागृह, ज्ञानप्रसारक विद्यालय, म्हापसा येथे २२ मे या दिवशी महिलासंघटन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात उपस्थित महिलांनी हा निर्धार केला. मेळाव्याला सौ. हेमश्री गडेकर, फोंडा येथील अधिवक्त्या कु. वंदना जोग, सनातन संस्थेच्या सौ. लता ढवळीकर, रणरागिणी शाखेच्या सौ. आनंदी वानखडे यांची प्रमुख उपस्थिती होती. मेळाव्याला १०० हिंदु धर्माभिमानी महिलांनी उपस्थिती लावली.

मेळाव्यात अश्‍लील विज्ञापनफलक, काश्मिरी विस्थापितांची समस्या, तसेच इसिसच्या गतीविधी आणि त्यांच्या भारतातील घडामोडी यांविषयी ध्वनीचित्रचकती दाखवण्यात आली. मेळाव्याच्या शेवटी अश्‍लील विज्ञापन फलक, मंदिरांमध्ये भारतीय वेशभूषा केलेल्यांनाच प्रवेश देणे, प्रथमोपचार आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्गांची आवश्यकता, धर्मशिक्षण वर्ग, धर्मांतर आदी विषयांवर उपस्थितांमध्ये गटचर्चा घेण्यात आल्यानंतर मेळाव्याची सांगता झाली.

अश्‍लील फलकाद्वारे महिलाच आपल्यावरील अत्याचारास आमंत्रण देत असतात ! – अधिवक्त्या कु. वंदना जोग

आधुनिकता गुणांनी प्रकट करायची असते. त्यासाठी अल्प कपडे घालण्याची आवश्यकता नाही. अश्‍लील फलकाद्वारे स्त्रियाच आपल्यावरील अत्याचारास आमंत्रण देत असतात.

प्रत्येक दैनंदिन कृती करतांना त्यामधून देवाची कृपा आपण कशी संपादन करू, हे गृहिणीने पहाणे आवश्यक ! – सौ. लता ढवळीकर, सनातन संस्था

आज गृहिणींना समाजात बोकाळलेला भ्रष्टाचार आणि अनैतिकता, पाश्‍चात्त्य संस्कृतीचे वाढलेले स्तोम, वाढलेली महागाई, घरात मानसिक क्लेश आदी अनेक समस्यांना तोंड देत संसार सांभाळावा लागत आहे. देवाची कृपा संपादन करून या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी महिलांनी प्रतिदिन किमान १ घंटा नामस्मरण केले पाहिजे.

स्त्रियांना शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या सबळ बनवून पुनश्‍च तेज:पुंज करण्यासाठी रणरागिणी शाखा कटीबद्ध ! – सौ. आनंदी वानखडे

आज हिंदु स्त्री पाश्‍चात्त्य संस्कृतीमुळे आलेली धर्मसंस्कारहीनता आणि झाशीच्या राणीच्या वीरतेच्या आदर्शाचे विस्मरण यांमुळे अबला झाली आहे. तिला शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या आणि आध्यात्मिकदृष्ट्या सबळ बनवून पुनश्‍च तेज:पुंज करण्यासाठी रणरागिणी शाखा कटीबद्ध आहे. वीर आणि तपस्वी हिंदु स्त्रियांचा आदर्श घेऊन हिंदु स्त्रीला धर्मशिक्षित करण्यासाठी आणि राष्ट्र-धर्म रक्षणार्थ कृतीशील बनवण्यासाठी रणरागिणी शाखेने महिलासंघटन चालू केले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *