Menu Close

सोलापूर येथील १७ मंदिरांमध्‍ये भारतीय संस्‍कृतीनुसार वस्‍त्रसंहिता लागू – राजन बुणगे, सदस्‍य, महाराष्‍ट्र मंदिर महासंघ

महाराष्‍ट्रातील एकूण १३१ मंदिरांमध्‍ये वस्‍त्रसंहिता लागू

पत्रकार परिषदेला उपस्‍थित मंदिर विश्‍वस्‍त, उद्योजक, महाराष्‍ट्र मंदिर महासंघाचे सदस्‍य आणि अन्‍य

सोलापूर – महाराष्‍ट्र शासनाने वर्ष २०२० मध्‍ये राज्‍यातील सर्व शासकीय कार्यालयांत वस्‍त्रसंहिता लागू केली आहे. इतकेच नव्‍हे, तर देशातील अनेक मंदिरे, गुरुद्वारा, चर्च, मशिदी आणि अन्‍य प्रार्थनास्‍थळे, खासगी आस्‍थापने, शाळा-महाविद्यालय, न्‍यायालय, पोलीस आदी सर्वच क्षेत्रांत वस्‍त्रसंहिता लागू आहे. त्‍याच धर्तीवर मंदिरांचे पावित्र्य, शिष्‍टाचार, संस्‍कृती जपण्‍यासाठी ‘महाराष्‍ट्र मंदिर महासंघा’च्‍या माध्‍यमातून सोलापूर येथील १७ मंदिरांच्‍या विश्‍वस्‍तांनी मंदिरांमध्‍ये भारतीय संस्‍कृती अनुरूप वस्‍त्रसंहिता लागू करण्‍याचा निर्णय घेतला आहे, असे प्रतिपादन ‘महाराष्‍ट्र मंदिर महासंघा’चे सदस्‍य श्री. राजन बुणगे यांनी सांगितले. ते ११ जून या दिवशी सोलापूर येथील प्रसिद्ध श्री हिंगुलांबिका मंदिरात झालेल्‍या पत्रकार परिषदेत बोलत होते. ते पुढे म्‍हणाले की, सोलापूरप्रमाणेच यापूर्वी मुंबई, ठाणे, रायगड, जळगाव, अकोला, धुळे, नागपूर, नाशिक, अमरावती, अहिल्‍यानगर (नगर) यांसह कोकण विभागातील मिळून महाराष्‍ट्रातील एकूण १३१ मंदिरांमध्‍ये वस्‍त्रसंहिता लागू करण्‍यात आली आहे.

सोलापूर येथील श्री हिंगुलांबिका मंदिर, स्‍टेशन रोड येथील शनी मंदिर, पंचमुखी हनुमान मंदिर, तळेहिप्‍परगा येथील मश्रूम गणपति मंदिर, पूर्वभाग येथील श्रीराम मंदिर यांसह १७ मंदिरांमध्‍ये वस्‍त्रसंहिता लागू करण्‍याचा निर्णय एकमुखाने घेण्‍यात आला. या पत्रकार परिषदेला ‘श्री हिंगुलांबिकादेवी देवस्‍थान’चे अध्‍यक्ष आणि उद्योजक श्री. किशोर कटारे, विश्‍वस्‍त श्री. श्रीकांत अंबुरे सर, श्री. विजय पुकाळे, स्‍टेशन रोड येथील शनी मंदिराचे विश्‍वस्‍त श्री. कलैय्‍या स्‍वामी, पंचमुखी हनुमान मंदिराचे विश्‍वस्‍त आणि उद्योजक श्री. सत्‍यनारायण गुर्रम, मल्लिकार्जुन मंदिराचे पुजारी श्री. मनोज हिरेहब्‍बू, बसवण्‍णा चौक येथील मारुति मंदिराचे विश्‍वस्‍त श्री. श्रीनिवास गुर्रम, महालक्ष्मी मंदिराचे विश्‍वस्‍त श्री. प्रभाकर बुरा, अधिवक्‍ता मुकुंद कुलकर्णी, श्री. नागदेव गुंडला, सनातन संस्‍थेचे श्री. हिरालाल तिवारी आदी उपस्‍थित होते.

या वेळी श्री. राजन बुणगे म्‍हणाले, ‘‘मंदिरे ही पर्यटनाची आणि प्रणयाची स्‍थळे नव्‍हेत. त्‍यामुळे सरकारच्‍या अधिपत्‍याखाली असलेल्‍या तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर, पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिर यांसह राज्‍यातील अन्‍य मंदिरांमध्‍येही वस्‍त्रसंहिता लागू करण्‍याचा मंदिर महासंघाच्‍या माध्‍यमातून आम्‍ही प्रयत्न करणार आहोत.’’

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *